आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उद्या, म्हणजेच 14 जून रोजी होणाऱ्या जागतिक ऑनलाइन योग कार्यक्रमाद्वारे, यूट्यूब लाइव्ह योग प्रक्षेपणाच्या सर्वाधिक प्रेक्षकसंख्येचा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट


130 हून अधिक देशांतील सहभागी या जागतिक उपक्रमात सामील होण्याची अपेक्षा

नोंदणीकृत सहभागींना व्हॉट्सॲपद्वारे डिजिटल सहभाग प्रमाणपत्रे मिळतील

प्रविष्टि तिथि: 13 JUN 2026 8:13PM by PIB Mumbai

 

येत्या 'आंतरराष्ट्रीय योग दिन 2026' च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून, भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि 'हाबिल्ड' (Habuild) यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जून 2026 रोजी एका अभूतपूर्व जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील योगसाधक आणि आरोग्यप्रेमींना एकाच डिजिटल मंचावर एकत्र आणून, 'युट्यूब लाईव्ह योग कार्यक्रमात सर्वाधिक प्रेक्षक' असण्याचा एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या उपक्रमात सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानावरूनच हे सर्व जण सामूहिकरीत्या या मोहिमेत सामील होतील; स्वतःपासून सुरुवात करत योग आणि निरामय आरोग्याचा संदेश जनमानसात पोहोचवण्याचा आयुष मंत्रालयाचा हा एक दृढ संकल्प आहे.

योगाचे जागतिक महत्त्व आणि संपूर्ण आरोग्य व कल्याणासाठी एक प्रभावी साधन म्हणून त्याला मिळणारी मान्यता जगासमोर आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या भव्य सार्वजनिक सहभागाच्या माध्यमातून, योग ही भौगोलिक, सांस्कृतिक आणि भाषिक सीमांच्या पलीकडे जाणारी एक परिपूर्ण जीवनशैली आहे, हा संदेश दिला जाणार आहे.

हा ऑनलाईन योग वर्ग सकाळी 6:15 ते 7:35 (भारतीय प्रमाणवेळेनुसार) या वेळेत घेतला जाईल. यामध्ये 130 हून अधिक देशांतील नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून, डिजिटल माध्यमावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी जागतिक योग परिषद ठरेल. आरोग्य, सलोखा आणि उत्तम स्वास्थ्यासाठी वेगवेगळी पार्श्वभूमी, वयोगट आणि प्रांतांतील लोक या निमित्ताने एकत्र येतील.

हा कार्यक्रम 'आंतरराष्ट्रीय योग दिन 2026' च्या पूर्वतयारीसाठी राबवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. डिजिटल तंत्रज्ञान आणि जागतिक कनेक्टिव्हिटीचा प्रभावी वापर करून, योगाचा प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत करणे आणि जगभरातील नागरिकांना नियमित योगाभ्यासासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणारे नागरिक 1800-315-7008 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंवा https://moa.habit.yoga या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

जास्तीत जास्त नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि योगप्रेमींच्या या योगदानाचे कौतुक करण्यासाठी, नोंदणी करून कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व साधकांना व्हॉट्सॲप वर  एक डिजिटल सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

सर्व नागरिक, योगसाधक, शैक्षणिक संस्था, आरोग्य व कल्याणकारी संघटना, सामाजिक गट आणि जगभरात पसरलेल्या अनिवासी भारतीय बांधवांना या ऐतिहासिक जागतिक मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आयुष्य मंत्रालयाने केले आहे.

हा अभूतपूर्व सोहळा जागतिक पातळीवर आरोग्य आणि कल्याण चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या भारताचे स्थान अधिक बळकट करेल, तसेच एक सुदृढ, निरोगी आणि संकटसमयी खंबीरपणे उभा राहणारा समाज निर्माण करण्यासाठी योगाचे असलेले चिरंतन महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करेल, अशी अपेक्षा आहे.

नोंदणी आणि सहभागासाठी:

मिस्ड कॉल: 1800-315-7008

नोंदणी संकेतस्थळ : https://moa.habit.yoga

***

राधिका अघोर/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2272593) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , Gujarati , English , हिन्दी , Kannada