राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींची इंडियन मिलिटरी अकादमीत नियमित अभ्यासक्रमाच्या 158 व्या आणि तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाच्या 141 व्या 'पासिंग आऊट परेड'ला उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2026 11:13AM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 13 जून 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज (13 जून2026) डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये नियमित अभ्यासक्रमाची 158 वी आणि तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाची 141 वी 'पासिंग आऊट परेड' पार पडली.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी देशातील अत्यंत कठोर प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी एक असलेला हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अधिकारी छात्रांचे अभिनंदन केले. त्यांचे धैर्य आणि बुद्धिमत्ता हीच त्यांची खरी ताकद असेल, असे त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांमध्ये नऊ महिला छात्रांचाही समावेश असल्याचे पाहून आनंद झाला. हा आयएमएच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही केवळ भारताच्या संरक्षण दलांच्या इतिहासातील महत्त्वाची घटनाच नाही, तर सध्या महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या वाटचालीचेही हे प्रेरणादायी उदाहरण आहे. भविष्यात आणखीही अनेक महिला छात्र या अकादमीमध्ये सामील होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींनी यावेळी मित्र राष्ट्रांच्या छात्रांचेही अभिनंदन केले. आपल्या सेवेद्वारे आणि आयएमए मध्ये आत्मसात केलेल्या मूल्यांच्या जोरावर ते आपल्या सैन्य दलांचे आणि आपापल्या देशांचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आयएमए मधील परदेशी कॅडेट्सची उपस्थिती ही जगभरातील देशांशी मैत्री, सहकार्य आणि शांततापूर्ण संबंध वृद्धिंगत करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. या संस्थेतील प्रशिक्षणादरम्यान छात्रांमध्ये निर्माण होणारे परस्पर विश्वास, सामंजस्य आणि व्यावसायिक बंध, विविध देशांबरोबरचे संरक्षण सहकार्य बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रपतींनी अधिकारी छात्रांना, तुम्ही आपल्या देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता यांचे रक्षक असल्याचे सांगितले. तुम्ही 140 कोटींहून अधिक नागरिकांचा गाढ विश्वास बाळगून असता. 'सेवा हेच सर्वोच्च कर्तव्य आहे', हे नेहमी लक्षात ठेवावे, असा सल्लाही त्यांनी त्यांना दिला. वेगाने बदलत असलेली सुरक्षेसंबंधीची आव्हाने, तांत्रिक प्रगती आणि गुंतागुंतीची जागतिक परिस्थिती पाहता, भारतीय लष्कराने या परिस्थितीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच, तरुण अधिकाऱ्यांनी आयुष्यभर शिकत राहण्याची आस असलेले, धैर्याने निर्णय घेणारे आणि नैतिक मूल्ये जपणारे नेतृत्व बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपतींनी सांगितले की, लष्करी अधिकारी या नात्याने सैनिकांचे नेतृत्व करणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांची काळजी घेणे ही या अधिकारी छात्रांची जबाबदारी असेल. आपल्या सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करून संघभावनेने काम करण्याची आणि समर्पणाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी तुम्हाला स्वतःचे उदाहरण घालून देऊन नेतृत्व करावे लागेल. कामकाजात प्रभाव उमटवत असतानाच सैनिकांचे हित साधणे या दोन गोष्टींमध्ये समतोल साधून, विश्वासाचे नाते निर्माण करण्यासोबतच तुमच्या नेतृत्वाखालील तुकड्यांची लढण्याची क्षमता अधिक बळकट करता येईल, असे सांगत तुम्ही पुढे राहून नेतृत्व करत, आपल्या सैनिकांची काळजी घेऊन आपल्या सैन्य दलांच्या सर्वोत्तम परंपरांचे जतन आणि पालन करणे तुमच्याकडून अपेक्षित आहे, असेही त्या म्हणाल्या.



राष्ट्रपतींचे भाषण [इंग्रजी] पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
राष्ट्रपतींचे भाषण [हिंदी] पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
***
अंबादास यादव/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272432)
आगंतुक पटल : 20