शिक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ 14 जून 2026 रोजी फ्रान्समधील नीस येथे संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स 2026 चे उद्घाटन करणार
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2026 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हे 14 जून 2026 रोजी फ्रान्समधील नीस मध्ये पॅलेस डेस एक्स्पोझिशन्स येथे संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स 2026 चे उद्घाटन करणार आहेत. भारत सरकारकडून आयोजित करण्यात येत असलेला भारत इनोव्हेट्स 2026 हा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे. या कार्यक्रमात भारतातील 120 नवोन्मेषक, सुमारे 15 उच्च शिक्षण संस्था, आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्या आणि व्हेंचर कॅपिटल कंपन्यांसह 500 हून अधिक गुंतवणूकदार तसेच जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात प्रगत संगणन, सेमिकंडक्टर, अंतराळ तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्यसेवा आणि उत्पादन यांसह 13 महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असून, भारताची वाढती नवोन्मेष क्षमता आणि डीप टेक परिसंस्था अधोरेखित करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. भारत इनोव्हेट्स 2026 साठी भारतातील 120 स्टार्टअप्सची निवड करणाऱ्या तांत्रिक देखरेख समितीचे प्रमुख तसेच भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
भारत इनोव्हेट्स 2026 च्या पहिल्या आवृत्तीत नीस येथे भारतातील डीप टेक क्षेत्रातील नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सची ओळख जागतिक गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राला करून दिली जाणार आहे. भारत आणि जगभरातील भागधारक यांच्यात नवोन्मेषावर आधारित भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी हा कार्यक्रम एक प्रभावी व्यासपीठ ठरण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमादरम्यान डीप टेक, संशोधन आणि विकास, स्टार्टअप्सचा विस्तार तसेच परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्याची अधिक बळकट चौकट उभारण्यासंदर्भात फलनिष्पत्ती आणि अनेक महत्त्वाच्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
निलीमा चितळे/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272365)
आगंतुक पटल : 9