वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाणिज्य विभागाने मुंबई स्थित फार्मेक्सिलच्या प्रादेशिक कार्यालयात प्रादेशिक संपर्क कार्यक्रम आणि पत्रकार परिषदेचे केले आयोजन


गेल्या 12 वर्षांमधील भारताच्या निर्यातीत झालेली वाढ आणि औषध निर्मिती क्षेत्रातील उपलब्धी अधोरेखित करण्यात आल्या

प्रविष्टि तिथि: 08 JUN 2026 9:46PM by PIB Mumbai

मुंबई, 9 जून 2026

केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने, मुंबई स्थित  फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या (फार्मेक्सिल) प्रादेशिक कार्यालयात एक संपर्क कार्यक्रम आयोजित केला, ज्यात गेल्या 12  वर्षांमधील  विभागाची प्रमुख कामगिरी, सुधारणा आणि धोरणात्मक उपक्रम अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमाला इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स आणि इंटरनॅशनल फार्मास्युटिकल एक्सिपियंट्स कौन्सिल ऑफ इंडिया यांसारख्या प्रमुख उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एसीजी, एफडीसी लिमिटेड आणि इतर हितधारकांचे उद्योग प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते.

माध्यमांशी संवाद साधताना, वाणिज्य विभागाचे सहसचिव मोहित यादव यांनी भारताची मजबूत निर्यात प्रगती , बाजारपेठेतील वाढते वैविध्य आणि प्रमुख भागीदार देशांसोबत दृढ होत असलेले व्यापारी संबंध अधोरेखित केले.  ते म्हणाले की, निर्यात क्षमता मजबूत करण्यासाठी, स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी आणि भारताच्या आकारमान -आधारित निर्यातीकडून मूल्य-आधारित निर्यातीकडे होणाऱ्या संक्रमणात सहयोग करण्यासाठी सरकार उद्योगासोबत मिळून काम करत आहे.

सहसचिवांनी नमूद केले की, गेल्या 12  वर्षांमध्ये भारताचे  औषधनिर्माण क्षेत्र एक धोरणात्मक क्षेत्र आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत म्हणून उदयास आले आहे. आज भारताला ‘जगाची फार्मसी ’ म्हणून ओळखले जाते, ही प्रतिष्ठा त्याने मोठ्या प्रमाणावरील उत्पादन, गुणवत्ता, परवडणारी किंमत आणि विश्वसनीय पुरवठ्याच्या बळावर मिळवली आहे. हे क्षेत्र 2014 मधील सुमारे 20  अब्ज अमेरिकी डॉलरवरून 2026  मध्ये जवळपास 60 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढले आहे आणि 2030 पर्यंत 130  अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारताची औषध निर्यात 2015 या आर्थिक वर्षातील 14  अब्ज अमेरिकी डॉलरवरून 2026 मध्ये सुमारे 31 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढली आहे, ज्यात 7.4 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे आणि 2030 पर्यंत 50 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.

परवडणारी किंमत ही भारताची सर्वात मोठी  ताकद राहिली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतीय जेनेरिक औषधांमुळे जगभरातील लाखो लोकांना उपचार उपलब्ध झाले आहेत. भारत हा औषधनिर्मिती करणारा तिसरा सर्वात मोठा देश असून  जागतिक जेनेरिक औषधांच्या मागणीपैकी सुमारे 20 टक्के मागणी पूर्ण करतो आणि 200  हून अधिक देशांना औषधे  निर्यात करतो. भारताच्या औषध निर्यातीपैकी 60 टक्क्यांहून अधिक निर्यात अत्यंत कडक नियम असलेल्या बाजारपेठांमध्ये होते.

आज जग आरोग्यसेवा पुरवठा साखळीमध्ये गुणवत्ता, सातत्य आणि परवडणारी किंमत या तिन्ही बाबींच्या शोधात आहे आणि भारत या  तिन्ही बाबींची  प्रभावीपणे पूर्तता करतो,  असे सहसचिवांनी सांगितले. गुणवत्ता भारताच्या मजबूत नियामक व्यवस्थेतून दिसून येते. भारतात सुमारे 1,000 यूएस एफडीए-नोंदणीकृत केंद्र आहेत, जी अमेरिकेबाहेरील सर्वाधिक संख्या आहे. सातत्य, ही बाब कोविड महामारी आणि अलीकडील भू-राजकीय आव्हानांसारख्या व्यत्ययाच्या काळातही औषधे पोहोचवण्याच्या भारताच्या क्षमतेतून दिसून येते. परवडणारी किंमत ही भारतीय जेनेरिक औषधांच्या जागतिक पोहोचमधून दिसून येते.

भारताच्या औषधनिर्माण क्षेत्रातील प्रवासात महाराष्ट्राला एक विशेष स्थान आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, तारापूर आणि जवळपासची शहरे औषधनिर्माण, संशोधन, निर्यात आणि कुशल मनुष्यबळाची महत्त्वाची केंद्रे म्हणून उदयास आली आहेत. महाराष्ट्राच्या औषधनिर्माण उद्योगात फार्मासिस्ट, शास्त्रज्ञ आणि कुशल उत्पादन कामगारांसह 2,00,000 हून अधिक लोकांना रोजगार मिळत असून हा उद्योग भारताच्या औषध उत्पादन आणि निर्यातीमध्ये एक प्रमुख योगदानकर्ता देखील आहे.

व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आणि सोबतच निर्यात परिसंस्था मजबूत करण्यासाठी केंद्र  सरकारने गेल्या 12 वर्षांत केलेल्या प्रयत्नांची उद्योग प्रतिनिधींनी प्रशंसा केली. यामध्ये नोंदणी-सह-सदस्यता प्रमाणपत्रांचे डिजिटल वितरण, डिजिटल मूळ प्रमाणपत्रे, ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्म, निर्यातीसाठी व्यापार पायाभूत सुविधा योजना पोर्टल, निर्यात प्रोत्साहन अभियान, संशोधन आणि विकासाशी संबंधित सहाय्यक उपाययोजना, तसेच गुणवत्ता, अनुपालन आणि बाजारपेठ प्रवेश मजबूत करण्यासाठीच्या उपक्रमांचा समावेश आहे.

सहसचिवांनी 'बायोफार्मा शक्ती' (Biopharma SHAKTI) या उपक्रमावरही प्रकाश टाकला. या उपक्रमाचे औपचारिक नाव 'ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाद्वारे आरोग्यसेवा प्रगतीसाठीची रणनीती' असे आहे. भारताला जागतिक जैव औषध निर्मिती  केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून पुढील पाच वर्षासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचा उद्देश – जैविक औषधे (बायोलॉजिक्स) आणि जैव समतुल्य औषधे (बायोसिमिलर्स) यांच्या देशांतर्गत उत्पादनासाठी एक परिसंस्था निर्माण करणे, संशोधन आणि विकासाला चालना देणे, क्लिनिकल ट्रायलच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करणे, शिक्षण संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यात सहकार्याला प्रोत्साहन देणे, तसेच जागतिक जैविक औषध पुरवठा साखळीमध्ये भारताची स्पर्धात्मकता सुधारणे हा आहे.

भारत औषधनिर्माण ज्ञान सेवांचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. बहुराष्ट्रीय औषधनिर्माण कंपन्या भारतात अधिकाधिक जागतिक क्षमता केंद्रे स्थापन करत असून त्यात 1 लाखाहून अधिक व्यावसायिकांना रोजगार मिळत आहे, तसेच 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. ही केंद्रे विश्लेषण, क्लिनिकल ऑपरेशन, नियामक विज्ञान, औषध दक्षता, डिजिटल आरोग्य आणि संशोधन यांना साहाय्य करतात.

भारताचे प्रमुख भागीदारांसोबतचे व्यापार करार औषधनिर्माण क्षेत्रासाठी नवीन संधी निर्माण करतील, असे सहसचिवांनी सांगितले. संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन , युरोपिय महासंघ , ईएफटीए, ओमान सल्तनत आणि न्यूझीलंड यांसारख्या भागीदारांसोबतचे करार आणि उपक्रम बाजारपेठेतील प्रवेश, नियामकसंबंधी सहकार्य, गुंतवणूक भागीदारी आणि तंत्रज्ञान सहयोगाला साहाय्य करतील अशी अपेक्षा आहे. भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराला 15 वर्षांत 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या वचनबद्धतेचा पाठिंबा आहे. हा  करार आयुर्विज्ञान, संशोधन, उत्पादन आणि प्रगत आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध करून देतो.

विकासाचा पुढील टप्पा गुणवत्तेच्या दिशेने होणाऱ्या भारताच्या वाटचालीने निश्चित होईल. या क्षेत्राचा पाया जेनेरिक्स राहील, तर भविष्यातील वृद्धी ही बायोसिमिलर्स, बायोलॉजिक्स, जीन थेरपी, विशेष औषधे, लसी, कॉम्प्लेक्स जेनेरिक्स, कंत्राटी उत्पादन, वैद्यकीय उपकरणे आणि सक्रिय औषधीय घटक व प्रारंभिक साधनसामग्री यांमधील वाढत्या आत्मनिर्भरतेमुळे आकार घेईल, असे ते म्हणाले.

जागतिक आरोग्यसेवेमध्ये भारताने  व्याप्ती, कौशल्य, विज्ञान, मानके आणि सामाजिक बांधिलकी आणली  याचा सहसचिवांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, की भारताच्या व्यापार करारांचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी, नियामक आणि भू-राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, तसेच दर्जेदार औषधे, परवडणारी नवनिर्मिती आणि गुंतागुंतीच्या मौल्यवान औषधांसाठी प्रमुख जागतिक केंद्र बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला बळ देण्यासाठी वाणिज्य विभाग उद्योग क्षेत्रातील भागधारकांसमवेत  काम जारी राखेल  असे त्यांनी सांगितले.

 

निलीमा चितळे/सोनाली काकडे/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2270945) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada