सहकार मंत्रालय
राष्ट्रीय सहकार धोरण-2025 अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील धोरण अंमलबजावणी आणि देखरेख समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न
राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालये आणि सहकारी संस्था यांच्या समन्वयाने राष्ट्रीय सहकार धोरण-2025 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रोडमॅपवर चर्चा
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2026 7:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2026
राष्ट्रीय सहकार धोरण-2025 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील धोरण अंमलबजावणी आणि देखरेख समितीची पहिली बैठक आज अटल अक्षय ऊर्जा भवन, नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्रालयाचे सचिव आणि समितीचे अध्यक्ष डॉ. आशिष कुमार भुतानी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सहकार से समृद्धी” या दृष्टिकोनातून प्रेरित आणि केंद्रीय गृहमंत्री, तसेच सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाने सहकार क्षेत्राला बळकट आणि आधुनिक करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याच संदर्भात ही बैठक झाली. समितीने राष्ट्रीय सहकार धोरण-2025 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, संस्थात्मक बळकटीकरण, केंद्रीय मंत्रालये, विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय महासंघ/सहकारी संस्था यांच्याद्वारे डिजिटल परिवर्तन, क्षमतेत वाढ, सदस्यत्व विस्तार आणि सहकार क्षेत्र प्रणित समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासासाठी समन्वयित कृती यावर विशेष लक्ष केंद्रित करून रोडमॅपवर चर्चा केली.
डॉ.भुतानी यांनी राष्ट्रीय सहकार धोरण-2025 ची उद्दिष्टे तळागाळापर्यंत नेण्यासाठी सर्व संबंधितांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले. बळकट, पारदर्शक आणि आधुनिक सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देतील आणि विकसित भारत @2047 च्या ध्येयपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सहकार धोरण-2025 सहकारी संस्थांना पारदर्शक, तंत्रज्ञानात सक्षम, व्यावसायिकरित्या व्यवस्थापित आणि सदस्याभिमुख आर्थिक संस्था बनवण्यासाठी व्यापक रूपरेषा प्रदान करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
समितीने चर्चेदरम्यान राष्ट्रीय सहकार्य धोरण-2025 चे सहा धोरणात्मक स्तंभ, तसेच विविध मंत्रालये आणि विभागांशी समन्वित कृती आराखड्यावर चर्चा केली. या बैठकीत सहकार क्षेत्रातील नवोन्मेष, स्टार्टअप संस्कृतीला चालना, कौशल्य विकास आणि सहकार क्षेत्रात तरुण नेतृत्व निर्माण करण्याबाबतही चर्चा झाली.
सहकार क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी राष्ट्रीय सहकारी डेटाबेस, सहकारी रँकिंग फ्रेमवर्क, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डेटावर आधारित देखरेख यंत्रणा सक्षम करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.
सोनाली काकडे/पार्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2270891)
आगंतुक पटल : 29