पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षेला नवी चालना मिळाली आहे. याच दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते मंगळवार 9 जून 2026 रोजी नवी दिल्लीत 'लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम' (एलपीएमएस) चा प्रारंभ होणार आहे.
हा उपक्रम तंत्रज्ञान-आधारित उपायांद्वारे सीमापार व्यापार आणि प्रवासी वाहतुकीत कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सुरक्षा वाढवून स्मार्ट सीमा व्यवस्थापनाच्या मोदी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
या प्रसंगी, केंद्रीय गृहमंत्री मेघालयातील डाकी आणि त्रिपुरामधील श्रीमंतपूर येथील भू-बंदरांवर नव्याने विकसित केलेल्या हितधारक निवास सुविधांचे उद्घाटनही करतील. या सुविधांमुळे सीमा सुरक्षा कर्मचारी आणि इतर महत्त्वाच्या संबंधितांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याने सीमा व्यवस्थापन अधिक बळकट होईल.
एलपीएमएस’चा प्रारंभ हा भारताच्या आधुनिक, तंत्रज्ञान-सक्षम स्मार्ट सीमा व्यवस्थापन प्रणालीच्या दिशेने होणाऱ्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असेल, जो व्यापार सुलभता, संपर्क व्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि 2047 पर्यंत 'विकसित भारत' ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताच्या मजबूत धोरणात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.
एलपीएमएस हे एक अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ असून ते भू-बंदरांवरील कामकाज एका एकीकृत प्रणालीमध्ये जोडण्यासाठी तयार केले आहे. या व्यासपीठामुळे लॉजिस्टिक्स आणि नियामक माहितीची सुरक्षित, रिअल-टाइम देवाणघेवाण शक्य होणार असून भू-बंदरे विमानतळांवर आणि सागरी बंदरांवर कार्यरत असलेल्या डिजिटल प्रणालींच्या बरोबरीला येऊ शकतील.
ही प्रणाली मालवाहतूक आणि प्रवासी प्रक्रियेसाठी स्लॉट बुकिंग, पेमेंट, ट्रॅकिंग आणि सिंगल-विंडो क्लिअरन्स यासह संपूर्ण डिजिटल कार्यप्रवाह उपलब्ध करून देते. ही प्रणाली ICEGATE, ULIP आणि मोटार वाहन परिसंस्थेसारख्या प्रमुख राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मशी पूर्णपणे एकात्मिक करण्यात आली आहे. त्यामुळे परस्पर सुसंगत, कार्यक्षम आणि पारदर्शक सीमा व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2270121)
आगंतुक पटल : 10