युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अभिनेते विक्रांत मॅसीसह देशव्यापी जागतिक सायकल दिन उत्सवाचे केले नेतृत्व


स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याची आणि शाश्वततेला प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या या एकदिवसीय उपक्रमात देशभरातील हजारो ठिकाणी 4 लाखांहून अधिक नागरिक सहभागी

प्रविष्टि तिथि: 07 JUN 2026 4:30PM by PIB Mumbai

 

जागतिक सायकल दिनानिमित्त राष्ट्रीय राजधानीत आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते विक्रांत मॅसी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती मुष्टियोद्धा नुपूर श्योराण आणि प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदी यांनीही सहभाग घेतला.

 

नवी दिल्लीत 15,000 हून अधिक तंदुरुस्तीप्रेमींनी सायकल फेरीत भाग घेतला, तर देशभरातील हजारो ठिकाणी आयोजित या एकदिवसीय सायकल चालवण्याच्या उपक्रमात 4 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले. कारगिल आणि लेहपासून कन्याकुमारी आणि अलप्पीपर्यंत तसेच त्रिपुरापासून वडोदऱ्यापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सायकल चालवण्याच्या फायद्यांवर भर देताना डॉ. मांडविया म्हणाले, “आज ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’चा 77 वा उपक्रम साजरा होत आहे. सायकल चालविल्यामुळे आरोग्य सुधारते आणि मानसिक तंदुरुस्तीही टिकून राहते. तसेच इंधनाची बचत होते आणि पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होते. वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्येवरही सायकल चालवणे हा एक प्रभावी उपाय आहे. सायकल चालवणे एकाच वेळी अनेक आव्हानांवर उपाय ठरते. पंतप्रधान मोदी यांनीही दररोज किमान 30 मिनिटे तंदुरुस्तीसाठी देण्याचा सल्ला दिला आहे. या दैनंदिन तंदुरुस्तीच्या दिनक्रमात सायकल चालवण्याचा समावेश केल्यास आपल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अवलंब करावा. ‘संडेज ऑन सायकल’ उपक्रमात सहभागी व्हावे. नियमित सायकल चालवा, तंदुरुस्त राहा आणि पंतप्रधान मोदी यांच्या तंदुरुस्त भारत चळवळीला पुढे नेण्यासाठी योगदान द्या.”

 

लोकप्रिय चित्रपट अभिनेते विक्रांत मॅसी यांच्यासाठी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमाने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच वाढती बैठी जीवनशैली आणि स्क्रीनसमोर घालविल्या जाणाऱ्या अधिक वेळाच्या युगात उत्तम आरोग्य राखण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

 

80 किलो वजनी गटात विश्वचषक स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके जिंकलेल्या नुपूर श्योराण यांनी तंदुरुस्त भारत सारख्या उपक्रमांमुळे भारतीय नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबतची जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितले.

 

प्रसिद्ध तिहेरी उडीपटू प्राची तोमर आणि राष्ट्रीय स्तरावरील 3000 मीटर स्टीपलचेज खेळाडू शिवानी प्रधानिया यांनीही या सायकलथॉनमध्ये सहभाग घेतला.

 

कार्यक्रमस्थळी एक मनोरंजन विभागही उभारण्यात आला होता, जिथे नागरिकांना बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम आणि लूडो यांसारख्या खेळांचा अनुभव घेता आला. याशिवाय चमचा-लिंबू शर्यत, चेंडू खेळ, रस्सीखेच, स्क्वॅट आव्हान आणि पुश-अप आव्हान यांसारख्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.

***

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2270120) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Malayalam