श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईएसआयसीने शैक्षणिक सत्र 2026-27 साठी विमाधारक व्यक्तीच्या पाल्याच्या कोट्याअंतर्गत एमबीबीएस, बीडीएस आणि बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागविले अर्ज


ईएसआय अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देशभरातील 22 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 783 जागा राखीव

विमाधारक व्यक्तीच्या पाल्याच्या प्रमाणपत्रासाठीचे ऑनलाइन पोर्टल 21 जून, 2026 रोजी होणार बंद

प्रविष्टि तिथि: 05 JUN 2026 3:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2026

 

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएस आयसी) विमाधारक व्यक्तीच्या पाल्याच्या कोट्याअंतर्गत, शैक्षणिक सत्र 2026-27 साठी पदवीपूर्व वैद्यकीय आणि नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता अर्ज मागवले आहेत. ही प्रवेशाची संधी केवळ कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत समाविष्ट कामगारांच्या अवलंबून असलेल्या मुलांसाठी उपलब्ध आहे. देशभरातील विमाधारक कामगारांच्या कुटुंबांना महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा आणि शैक्षणिक लाभ देण्यासाठी ईएसआयसीची असलेली निरंतर वचनबद्धता यातून दिसून येते.

शैक्षणिक सत्र 2026-27 साठी विमाधारक व्यक्तींच्या पाल्यांसाठीच्या कोट्याअंतर्गत एकूण 783 जागा तात्पुरत्या स्वरूपात राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये 22 वैद्यकीय, दंत आणि नर्सिंग संस्थांमधील 695 एमबीबीएस जागा, 28 बीडीएस जागा आणि 60 बी.एस्सी. नर्सिंग जागांचा समावेश आहे. यामध्ये विविध राज्यांमधील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालये आणि निवडक राज्य सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य सेवा महासंचालनालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या मध्यवर्ती समुपदेशन प्रक्रियेद्वारे ही प्रवेश प्रक्रिया होईल.

विमाधारक व्यक्तीच्या पाल्यासाठी असलेला कोटा म्हणजे कामगारांच्या कुटुंबाच्या शैक्षणिक गरजांना पाठबळ  देण्यासाठीचा  कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैद्यकीय आणि नर्सिंग शिक्षण घेण्यासाठी अत्यंत सवलतीच्या दरात शुल्क आकारले जाते. या कोट्याअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रति वर्ष 24,000 तर बी.एस्सी. नर्सिंग साठी प्रतिवर्ष 10,000  रुपये शुल्क द्यावे लागते, यामुळे ईएसआयसी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दर्जेदार आणि परवडणारे वैद्यकीय शिक्षण उपलब्ध होते. या कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी कोणतेही प्रति व्यक्ती शुल्क किंवा देणगी स्वीकारली जात नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे पालक हे 30 सप्टेंबर2025 रोजी ईएसआय योजनेत सक्रियपणे योगदान देणारे नोंदणीकृत विमाधारक व्यक्ती असले पाहिजेत. अर्जदार हा NEET (UG) परीक्षेला बसलेला असावा तसेच विमाधारक व्यक्तीवर अवलंबून असलेला मुलगा किंवा मुलगी असणे आवश्यक असून त्याने पात्रतेच्या सर्व अटी आणि निकष पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. अर्जदार मुलगा असेल तर त्याचे वय 08 मार्च  2026 रोजी 21 वर्षांपेक्षा जास्त असू नये तर ईएसआय कायदा, 1948 च्या तरतुदींनुसार विमाधारक व्यक्तीवर अवलंबून असलेल्या अविवाहित महिला पाल्यासाठी वयोमर्यादा लागू नाही.  

आयपी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून 2026 आहे. अर्ज प्रक्रियेमध्ये ओटीपी-आधारित प्रमाणीकरणाचा समावेश असल्याने उमेदवारांनी विमाधारक व्यक्तीचा मोबाईल क्रमांक ईएसआयसी डेटाबेसमध्ये अचूकपणे अद्ययावत केलेला असल्याची खात्री करावी, असे सूचित केले जात आहे. त्याचप्रमाणे आयपी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, उमेदवारांनी केंद्रीकृत समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समिती (एमसीसी) पोर्टलवर स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

* * *

राधिका अघोर/नंदिनी मथुरे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2269287) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , Telugu , English , Gujarati , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Malayalam