इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेबाबत उद्योग क्षेत्राबरोबर एक उच्चस्तरीय बैठक घेतली
वास्तविक अनुभव, उद्योगाशी संलग्न शिक्षण, अध्यापन विकास आणि सामायिक पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर
Posted On:
28 MAY 2026 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2026
उदयोन्मुख तंत्रज्ञान कलाला अनुरूप कौशल्ये विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावीत, यासाठी केंद्र सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेसाठी उद्योग क्षेत्राबरोबर सहयोग करत आहे. या संदर्भात, नवी दिल्लीत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कृत्रिम अभ्यासक्रमासाठीच्या कृती दलासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
या कृतीदलाने भारतीय शैक्षणिक संस्थांमधील बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी (बीटेक), कम्प्यूटर सायन्स आणि समकक्ष पदव्यांसाठीच्या अभ्यासक्रमाचा पायाभूत अभ्यास केला आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर एन्ड सर्विस कम्पनिज(नॅसकॉम) यांच्या भागीदारीतून हा अभ्यास करण्यात आला.

या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की, देशातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम आता व्यापक झाला असला तरी त्यामध्ये काही कमतरता आहे. या उणिवा प्रामुख्याने अध्यापन पद्धती, पायाभूत सुविधा आणि जनरेटिव्ह एआय, मशीन लर्निंग ऑपरेशन्स व फाउंडेशनल मॉडेल डेव्हलपमेंट यांसारख्या क्षेत्रांमधील व्यवहारातील अनुभवाच्या बाबतीत आहेत.
कृती दलाने लक्ष केंद्रित केलेली क्षेत्रे
- उपयोग-केंद्रित अध्यापन पद्धती: केवळ व्याख्यानांवर आधारित शिक्षणाकडून, पहिल्या सत्रापासूनच प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील अनुप्रयोग शिक्षणाकडे वळणे.
- क्रेडिट-संलग्न अभ्यासक्रम एकत्रीकरण: कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम औपचारिक शैक्षणिक क्रेडिट प्रणालीमध्ये समाविष्ट करणे आणि त्याची शैक्षणिक सत्रानुसार व्यवस्थित अंमलबजावणी करणे.
- वर्धित व्यावहारिक अनुभव: पदवीचे स्वरूप आणि निवडलेली विशेष शाखा यानुसार सध्याचा 25-30 टक्के व्यावहारिक अनुभव, 40-75 टक्क्यांपर्यंत वाढवणे.
- उद्योगाशी जोडलेली अध्यापन पद्धती: कॅपस्टोन प्रकल्प, एन्ड-टू-एन्ड एआय सोल्यूशन इंजिनिअरिंग आणि लो-कोड आणि नो-कोड या साधनांच्या वापराद्वारे संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये थेट उद्योग क्षेत्रातील अनुभवाचा समावेश करणे.
- जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता एक अखंड सूत्र: जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासन यांना स्वतंत्र घटकांऐवजी, सर्व शैक्षणिक सत्रांमध्ये एकात्मिक स्वरूपात समाविष्ट करणे.
- प्रवेश आणि पूर्णत्वाचे विविध पर्याय: कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याचे व त्याच्या पूर्णत्वाचे विविध लवचिक पर्याय उपलब्ध करुन देणे ज्यानुसार पहिल्या वर्षानंतर प्रमाणपत्र, दुसऱ्या वर्षानंतर पदविका आणि तिसऱ्या वर्षानंतर एडव्हांस किंवा प्रगत पदविका मिळवता येईल.

अध्यापकांच्या विकासावर भर
अभ्यासक्रमातील सुधारणांना अध्यापकाच्या तयारीची जोड मिळणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन समुपदेशनामध्ये प्रस्तावित रुपरेषेच्या केंद्रस्थानी अध्यापकांची क्षमता बांधणी करण्यावर भर देण्यात आला. या शिफारसींमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- संरचित प्रशिक्षक-प्रशिक्षण कार्यक्रम,
- संरेखित अभ्यासक्रम आशय,
- मूल्यांकनाची प्रमाणित चौकट आणि
- सध्याच्या उद्योग साधनांशी आणि व्यासपीठांशी सुसंगत आधुनिक प्रयोगशाळा.
अनुभवी उद्योग व्यावसायिकांना संलग्न प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यासाठी विशेष हस्तक्षेपाची शिफारस देखील करण्यात आली आहे. नामांकित व्यवसायिक शिक्षण संस्थांच्या म़ॉडेलवर आधारित सखोल व्यावसायिक कौशल्य थेट वर्गात आणण्यासाठी हे प्रयोजन आहे.
* * *
सोनाली काकडे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266369)
अभ्यागत कक्ष : 14