वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचा महत्त्वपूर्ण कॅनडा दौरा संपन्न
हा दौरा भारत आणि कॅनडाच्या समाजाची दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आर्थिक संबंध पुढे नेण्यात आणि सीईपीए चर्चा पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा ठरला
गोयल यांनी टोरोंटो विद्यापीठातील मंक स्कूलला संबोधित केले, भारताचे आर्थिक परिवर्तन आणि भारत-कॅनडा भागीदारीचा विस्तार त्यांनी अधोरेखित केला
गोयल यांनी ऑन्टारियो सेंटर ऑफ इनोव्हेशन आणि कॅनडा-इंडिया टेक कनेक्ट यांच्याशी संपर्क साधून कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम कंप्युटिंग आणि डीप टेक क्षेत्रातील सहकार्यातील संधींवर प्रकाश टाकला
गोयल यांनी भारत-कॅनडा यांच्यातील व्यावसायिक सहकार्य आणि गुंतवणूक भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने तिथल्या प्रादेशिक चेंबर्सशी संवाद साधला
पियुष गोयल यांनी जागतिक गुंतवणूकदार आणि भारतीय ऊद्योगातील अग्रणी यांच्यामध्ये गुंतवणूक भागीदारी आणि भारताचा जागतिक आर्थिक ठसा मजबूत करण्याच्या उद्देशाने संवाद साधला
Posted On:
28 MAY 2026 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी 28 मे 2026 रोजीचा आपला तीन दिवसाचा कॅनडाचा दौरा, अत्यंत यशस्वी आणि ऐतिहासिक दृष्ट्या पूर्ण केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी टोरंटोमध्ये शिक्षण क्षेत्र,नवोन्मेष, प्रशासन, व्यावसायिक परिषदा, गुंतवणूकदार संस्था आणि अनिवासी भारतीय समुदाय अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घटकांसोबतच्या भेटीगाठींचा अत्यंत व्यग्र कार्यक्रम पार पाडला. या भेटीगाठींमुळे भारत-कॅनडा यांच्यातील आर्थिक भागीदारीला मिळालेली सातत्यपूर्ण गती अधिक वेगवान झाली. त्याचप्रमाणे भारत हे गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्य आणि दीर्घकालीन भागीदारीसाठीचे एक प्रमुख जागतिक केंद्र म्हणून पुढे येत असल्याचे अधोरेखित झाले.
दिवसाची सुरुवात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या टोरंटो विद्यापीठातील प्रतिष्ठित मंक स्कूल ऑफ ग्लोबल अफेअर्स अँड पब्लिक पॉलिसीचे प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसमोर झालेल्या भाषणाने झाली. मंक स्कूल हे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सार्वजनिक धोरणांच्या अभ्यासासाठी जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. आपल्या भाषणात गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने साध्य केलेली जलद आर्थिक प्रगती, संपूर्ण बदल घडवणाऱ्या सुधारणा आणि जागतिक स्तरावरील वाढते नेतृत्व यांविषयी विचार मांडले. भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि नागरिकांचा नागरिकांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी, शैक्षणिक क्षेत्र, उद्योग जगत आणि धोरणकर्ते यांच्यात सहकार्य निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
त्यानंतर पियुष गोयल यांनी ऑन्टारियो सेंटर ऑफ इनोव्हेशनला (ओसीआय) भेट दिली. यावेळी त्यांना नवोन्मेषाला प्रोत्साहन, स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासह उद्योग, शिक्षण आणि प्रशासन यांच्यात सहकार्य वाढवण्यासारख्या या केंद्राच्या व्यापक उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी कॅनडा-भारत टेक कनेक्ट, अर्थात तांत्रिक संपर्क याबरोबरच कृत्रिम बुद्धीमत्ता आणि क्वांटम कंप्युटिंगसह तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रांवरील चर्चेतही भाग घेतला. यावेळी उपस्थितांसमोर बोलताना गोयल यांनी भारतात भरभराट होत आलेल्या स्टार्टअप आणि नवोन्मेष परिसंस्थेवर प्रकाश टाकला आणि या वेगाने वाढणाऱ्या या क्षेत्रांमध्ये कॅनडा कशाप्रकारे अर्थपूर्ण भागीदारी करू शकतो याची रूपरेषा मांडली. यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता, स्वच्छ व पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, कृषीतंत्रज्ञान आणि डीप टेक या दोन्ही देशांकडे पूरक सामर्थ्य असलेल्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या प्रचंड क्षमतेवरही जोर दिला.
पियुष गोयल यांनी भारत-कॅनडा कॉरिडॉरमध्ये कार्यरत असलेल्या प्रादेशिक वाणिज्य मंडळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याकडून, व्यावसायिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या आणि गुंतवणुकीचा ओघ वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी रचनात्मक अभिप्राय मिळाला. त्यांनी दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि नागरिकांचा नागरिकांशी थेट संबंध वृद्धिंगत करण्यात या प्रतिनिधींनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले. त्याचप्रमाणे द्विपक्षीय संबंधांना मिळालेली नवी गती आणि सध्या सुरू असलेल्या सीईपीए वाटाघाटींमधून निर्माण होत असलेल्या महत्त्वपूर्ण संधींना अधोरेखित केले.
एका महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय भेटीदरम्यान, पीयूष गोयल यांनी ऑन्टारियोचे प्रीमियर सन्माननीय डग फोर्ड यांची भेट घेतली आणि भारत व ऑन्टारियो यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या संधींवर चर्चा केली. दोन्ही बाजूंसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या — उत्पादन, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा, अन्न प्रक्रिया आणि दुर्मिळ खनिजे, या क्षेत्रांमधील सहकार्याच्या विविध मार्गांचा या दोन्ही नेत्यांनी यावेळी आढावा घेतला; तसेच द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी मजबूत करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पीयूष गोयल यांनी बिझनेस कौन्सिल ऑफ कॅनडाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोल्डी हैदर यांच्याशी एक फलदायी बैठक घेतली. या बैठकीत भारत-कॅनडा यांच्यातील व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यावर, तसेच तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे आणि प्रगत उत्पादन क्षेत्र यामध्ये उद्योगांच्या पुढाकाराने होणाऱ्या भागीदारीला चालना देण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी, दोन्ही देशांमधील व्यवसाय-ते-व्यवसाय (बीटूबी) संबंध अधिक व्यापक करण्यात भारत-कॅनडा सीईओ फोरम बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबतही वैचारिक देवाणघेवाण केली.
पीयूष गोयल यांनी ऑन्टारियो टीचर्स पेन्शन प्लॅनच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जो टेलर यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, वित्तीय सेवा, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्ये भारतात उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. यावेळी मंत्र्यांनी भारताची गतीशील वाढीची क्षमता आणि भारतीय उद्योगांशी भागीदारी करण्याच्या महत्त्वपूर्ण संधी अधोरेखित केल्या; यामध्ये उत्पादन क्षेत्रासह शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीला चालना देण्यावरही भर दिला.
पियुष गोयल यांनी सीपीपी इन्व्हेस्टमेंट्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ग्रॅहम यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पायाभूत सुविधा, मालवाहतूक, लॉजिस्टिक्स, नवीकरणीय ऊर्जा, वाहतूक, वित्तीय सेवा आणि डिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये भारतात दीर्घकालीन संस्थात्मक गुंतवणुकीचा विस्तार करण्याबाबत चर्चा केली. पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता आणि वित्तीय सेवा या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण गुंतवणुकीद्वारे सीपीपी इन्व्हेस्टमेंट्सने भारताच्या विकासाच्या कथेवर जो सातत्यपूर्ण विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी त्यांचे स्वागत केले; हा विश्वास भारताती आर्थिक मूलभूत घटक आणि भविष्यातील क्षमता यांवर जागतिक स्तरावर असलेला भक्कम विश्वासच अधोरेखित करतो.
पीयूष गोयल यांनी, भारताचा जागतिक स्तरावरील आर्थिक प्रभाव अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, आपल्या दौऱ्यादरम्यान सोबत असलेल्या भारतीय व्यापारी शिष्टमंडळाशी फलदायी चर्चा केली. त्यांनी विविध उद्योगांना स्वच्छ ऊर्जा, हवाई क्षेत्र , अन्न प्रक्रिया, महत्त्वपूर्ण खनिजे, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये भागीदारी व गुंतवणुकीच्या संधींचा सक्रियपणे शोध घेण्यास प्रोत्साहित केले कारण या क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास आणि नाविन्यासाठी प्रचंड क्षमता दडलेली आहे. गोयल यांनी यावर भर दिला की, भारताची वाढती जागतिक आर्थिक प्रतिष्ठा भारतीय उद्योगांसाठी जगभरात नव्या संधींचे मार्ग खुले करत आहे. तसेच, भारताच्या विकासाची गाथा जगासमोर मांडण्याच्या कार्यात उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास भारत सरकार ठामपणे कटिबद्ध आहे.
पीयूष गोयल यांनी कॅनडा-भारत फाउंडेशनच्या सदस्यांशी साधलेल्या एका मनमोकळ्या संवादाने आपल्या तीन दिवसांच्या कॅनडा दौऱ्याचा समारोप केला. अधिक दृढ व्यावसायिक संबंध आणि नागरिकांचा नागरिकांशी थेट संपर्क स्तरावरील संबंधांच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रांना एकमेकांच्या अधिक जवळ आणण्यात, भारतीय आणि कॅनडाच्या समुदायाने दिलेल्या अमूल्य योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
पियुष गोयल यांनी कॅनडा दौऱ्यावर गेलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या 100 हून अधिक भारतीय कंपन्यांच्या अग्रणींचा समावेश असलेल्या व्यावसायिक शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले. भारत-कॅनडा आर्थिक संबंधांच्या पूर्ण पुनरुज्जीवनाच्या दिशेने त्यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. 25 मे रोजी ओटावा आणि 26 ते 28 मे या कालावधीत टोरंटोचा समावेश असलेल्या या तीन दिवसीय दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय व्यापार व आर्थिक संबंधांना चालना देणे हा होता, यामध्ये भारत-कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला.
सध्याचा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका असताना, तो 2030पर्यंत 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत विस्तारण्याच्या आपल्या सामायिक आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाप्रती दोन्ही सरकारे कटिबद्ध आहेत.
* * *
हर्षल आकुडे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266339)
अभ्यागत कक्ष : 7