शिक्षण मंत्रालय
नीट (युजी) फेरपरीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे आयोजित करण्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे राज्यांना पत्राद्वारे आवाहन
Posted On:
25 MAY 2026 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2026
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशभरातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून, 21 जून 2026 रोजी होणाऱ्या नीट (यूजी) फेरपरीक्षेच्या सुरळीत, निष्पक्ष आणि यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करण्यास सांगितले आहे. सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती लक्षात घेता, केंद्रीय मंत्र्यांनी परीक्षार्थींच्या सोयी आणि आरोग्यासाठी परीक्षा केंद्रांवर सर्व आवश्यक मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचेही आवाहन केले आहे.
“सध्या उष्णतेच्या लाटेची परिस्थिती लक्षात घेता, परीक्षार्थींच्या सोयीसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्य, तसेच केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा प्राधिकरणांना आणि परीक्षा आयोजित करणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर संस्थांना योग्य सूचना जारी करण्याची विनंती करत आहे. यामध्ये पिण्याचे पाणी, पुरेशी आसन-व्यवस्था, पंखे/कुलर्स, स्वच्छ स्वच्छतागृहे, सावली असलेली प्रतीक्षा व्यवस्था, अखंड वीजपुरवठा आणि आवश्यकतेनुसार पोर्टेबल शौचालये यांचा समावेश करावा.” असे प्रधान यांनी पत्रात नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांचे हित आणि कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे असे सांगतानाच, 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेच्या दिवशी परीक्षार्थींसाठी वाहतूक सुविधा सुनिश्चित करण्याचे आवाहन, प्रधान यांनी सर्व राज्य सरकारांना केले आहे .
नीट (यूजी) 2026 पुनर्परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी सर्व राज्ये पूर्ण सहकार्य करतील, असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला.
राधिका अघोर/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2265144)
अभ्यागत कक्ष : 13