आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष मंत्रालयाने उष्णतेची लाट आणि तीव्र उष्णतेच्या परिस्थितीत सार्वजनिक आरोग्याची खबरदारी घेण्यासंबंधीच्या सूचना केल्या जारी


खबरदारीच्या सूचनांमध्ये उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय, पारंपरिक आरोग्य पद्धती आणि आपत्कालीन प्रतिसाद यावर विशेष भर

Posted On: 18 MAY 2026 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मे 2026

 

देशाच्या विविध भागांमधील वाढते तापमान आणि सध्या दिसून येत असलेली उष्णतेच्या लाटेची परिस्थिती लक्षात घेता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने, सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्याच्या हंगामातील तीव्र उष्णता/उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीत सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यासाठीच्या  सर्वंकष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनांमध्ये सर्वसामान्य नागरिक, समाजातील दुर्बल गट, नियोक्ते, कामगार तसेच सार्वजनिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांमधील सहभागींना उष्माघात आणि उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासंबंधीच्या उपायांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पुरेसे पाणी पिणे, उन्हाचा सर्वाधिक कडाका असण्याच्या काळात सूर्यप्रकाशात जाणे टाळणे, हलके सुती कपडे घालणे आणि इलेक्ट्रोलाइट्सयुक्त मोसमी फळे आणि पेये यांचे सेवन करणे असे उपाय अवलंबण्यावर भर देण्यात आला  आहे.

अर्भके, लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, मजूर आणि हृदयरोग तसेच उच्च रक्तदाब यांसारख्या व्याधी असलेल्या व्यक्तींना उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीत विशेष धोका असतो, त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेणे व त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रम आणि बाहेर कामे करताना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यामध्ये विश्रांतीसाठी सावली असेल अशा जागांची सोय, पाणी पिण्यासाठी ठराविक कालावधीनंतर अल्पविराम, कामगारांना वातावरणाशी जुळवून घेता येईल असे उपाय आणि उष्माघाताच्या लक्षणांविषयी सजगता बाळगणे या मुद्द्यांचा समावेश आहे.

उष्णतेच्या लाटेसंबंधी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नागरिकांना उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या आजारांच्या धोकादायक लक्षणांबाबत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, यामध्ये  चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, मानसिक स्थितीमध्ये बदल, शरीराचे तापमान वाढणे, निर्जलीकरण,  बेशुद्ध पडणे यांचा समावेश आहे. उष्माघात ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती समजली गेली आहे. यासाठी त्वरित वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. या गंभीर प्रकरणांमध्ये त्वरित आपत्कालीन हेल्पलाइन 108/102 वर संपर्क साधण्याची शिफारस करण्यात आली आहे

डीजीएचएस अंतर्गत आयुष विभागाने जारी केलेल्या परिशिष्ट अंतर्गत या सूचनेमध्ये उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आयुर्वेद, सिद्ध, योग, युनानी आणि होमिओपॅथी यांसारख्या विविध आयुष प्रणालींमधील पारंपरिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक उपायांचाही समावेश आहे.

आयुर्वेदामध्ये तीव्र उष्णतेच्या काळात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करण्यासाठी थंड आहार पद्धती, ताक, नारळाचे पाणी आणि लिंबू-आधारित पेये यांसारख्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राखणाऱ्या पेयांचे सेवन, आणि लिंबूवर्गीय फळांचे पेय, आम्र पन्हे व चिंच सरबत यांसारख्या पारंपरिक पेयांचा वापर करण्याची शिफारस केली आहे.

सिद्ध आणि योग विभागानुसार, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी शीतली प्राणायाम आणि सौम्य योगाभ्यास यांसारख्या श्वसन तंत्रांचा आणि शीतल पेयांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

युनानी प्रणालीनुसार उन्हामुळे त्वचा भाजणे आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी पारंपरिक शीतल पेये आणि हर्बल लेपांची शिफारस केली आहे, तर होमिओपॅथीनुसार तीव्र उष्णतेच्या वेळी खबरदारीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत.

या सल्ल्यानुसार, उन्हाळ्याच्या मोसमात काकडी, टरबूज, लिंबू, खरबूज, भोपळा आणि टोमॅटो यांसारख्या शरीराला पाणी  आणि थंडावा देणाऱ्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यात आले आहे.

नागरिकांना भारतीय हवामान विभागाकडून  जारी केलेल्या हवामानाच्या माहितीकडे लक्ष नियमितपणे लक्ष देण्याचा  आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असल्यास आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

सविस्तर मार्गदर्शक सूचना सोबत जोडली आहे.

 

* * *

निलिमा चितळे/मंजिरी गानू/राजेश शिरभाते/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2262451) अभ्यागत कक्ष : 20