रेल्वे मंत्रालय
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरु मुंबई एक्स्प्रेस रेल्वेगाडीला दाखवला हिरवा झेंडा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील रेल्वे संपर्क होणार अधिक बळकट
बंगळुरु -मुंबई वंदे भारत स्लीपर सेवाही लवकरच सुरू होणारः अश्विनी वैष्णव
Posted On:
17 MAY 2026 3:40PM by PIB Mumbai
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरु - मुंबई दरम्यानच्या एक्सप्रेस रेल्वे गाडीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील संपर्क अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या मोठे पाऊल उचलले आहे.

दक्षिण आणि उत्तर कर्नाटक राज्यांची दीर्घकाळपासून प्रलंबित असलेली मागणी आता पूर्ण झाल्याचं वैष्णव यांनी सांगितले. पुढे त्यांनी बंगळुरु- मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे नमूद केले.
पायाभूत सुविधा विकास अधोरेखित करताना, अलीकडील काळात रेल्वेच्या निधीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे नमूद केले. त्यामुळे संपूर्ण कर्नाटक राज्यांत प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती मिळाल्याचे स्पष्ट केले.
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत, 2,160 कोटी रुपये खर्चाने 61 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून त्यापैकी 9 स्थानकांचे काम पूर्णत्वास गेले आहे. बंगळुरू कॅन्टोन्मेंट स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 485 कोटी रुपये तर यशवंतपूर स्थानकाच्या विकासासाठी 367 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

2014 पासून, कर्नाटकात जवळपास 1,750 किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले असून, हसन- मंगळुरु विभागातील गुंतागुंतीचे काम पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे.
बंगळुरु उपनगरीय रेल्वे प्रकल्पाविषयी बोलताना ते म्हणाले, चारही मार्गिकांवरील काम प्रगतीपथावर आहे. बैय्यनाहली-चिक्काबनावरा आणि हीलालगे राजनुकुंटे या परिक्षेत्रासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून, स्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. केएसआर बंगळुरु देवानहल्ली या मार्गाला राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने संयुक्तपणे मंजुरी दिली असून, या मार्गावरील भू-तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. केंगरी-व्हीटफील्ड या मार्गालाही नुकतीच मंजुरी मिळाली असून, सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू होईल. त्यानंतर ते म्हणाले की, उपनगरी रेल्वे जाळ्यामुळे विमानतळ, इलेक्ट्रॉनिक सिटी, मराठाहल्ली आणि हेब्बल यांसारखी महत्त्वाची प्रमुख केंद्रे एकमेकांशी जोडली जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पुढे रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, कर्नाटकमध्ये सध्या 12 वंदे भारत रेल्वेगाड्यांच्या जोड्या धावत आहेत. बंगळुरु-मंगळुरु मार्गावर सध्या चाचण्या सुरू आहेत, त्यातून लवकरच मडगावपर्यंत किनारपट्टीवरील संपर्कजोडणीमध्ये सुधारणा होईल.
बंगळुरुला हैदराबाद आणि चेन्नईशी जोडणाऱ्या बुलेट ट्रेन परिक्षेत्रालाही मंजुरी देण्यात आली असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखित केले. मुंबई, बंगळुरु आणि इतर प्रमुख शहरांना जोडण्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोनातून या रेल्वे जाळ्याचा विस्तार होत 7000 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जाते आहे, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्या हस्ते आज गाडी क्रमांक 16553/54 एसएमव्हीटी बंगळुरू ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी या रेल्वेगाडीला मंजुरी दिल्याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. या रेल्वेगाडीमुळे अत्यंत व्यग्र असलेल्या मार्गांपैकी एक असलेल्या या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि कर्नाटकच्या विकासाला अधिक चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, सध्या कर्नाटकात बारा वंदे भारत रेल्वेगाड्या सुरु असून, त्या 14 जिल्ह्यांना जोडतात, थानिसंद्रा येथे 270 कोटी रुपयांच्या खर्चाने वंदे भारत स्लीपर गाड्यांच्या देखभालीसाठी डेपो उभारला जाईल; तसेच एसएमव्हीटी बंगळुरू येथे 52.73 कोटी रुपयांच्या खर्चाने चेअर कार गाड्यांच्या देखभालीची सुविधा निर्माण केली जाईल. रेल्वेची वहनक्षमता वाढवण्यासाठी बैय्यप्पनहल्ली-होसूर (1,116 कोटी रुपये), बेट्टाहलसूरू-राजनुकुंटे (248 कोटी रुपये) या मार्गांचे दुपदरीकरण आणि बंगळुरू परिसरातील रेल्वेमार्गांचे चौपदरीकरण (1,347 कोटी रुपये) ही कामे हाती घेण्यात आली आहेत.
यशवंतपूर, केएसआर बंगळुरू, लोट्टेगोल्लहल्ली, बैय्यप्पनहल्ली, पेनुकोंडा, म्हैसूर आणि जोलारपेट्टाई यांसारख्या प्रमुख विभागांमध्ये एकूण 6,396 कोटी रुपयांच्या खर्चाने स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सुरु करण्याचे करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर देताना ते म्हणाले की, कर्नाटकला रेल्वे अर्थसंकल्पात कर्नाटकसाठी 7,748 कोटी रुपयांच्या विक्रमी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 2014 पासून आतापर्यंत सुमारे 3,840 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गांचा विकास करण्यात आला असून, 3,742 किलोमीटर मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे; यामुळे राज्य 100% विद्युतीकरणाच्या जवळ येऊन ठेपले आहे. 2014 पूर्वी सुमारे राज्यात 150 रेल्वे उड्डाणपूल आणि रेल्वे भुयारी मार्ग होते. ती संख्या आता 707 पर्यंत वाढली आहे. याव्यतिरिक्त, पुढील एका वर्षात आणखी 146 पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, पुढील तीन वर्षांत रेल्वेचे सर्व लेव्हल क्रॉसिंग अर्थात रेल्वे फाटके पूर्णपणे काढून टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी बंगळुरु मध्य मतदारसंघाचे खासदार पी. सी. मोहन आणि राज्यसभा सदस्य लहर सिंग सिरोया आदी मान्यवर उपस्थित होते. बंगळुरु दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.
***
शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी साने/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2262056)
अभ्यागत कक्ष : 18