ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींसाठी कोचिंग संस्थांना दंड ठोठावला

Posted On: 15 MAY 2026 1:30PM by PIB Mumbai


मोशन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि करिअर लाइन कोचिंग (सीएलसी), सीकर, या दोन संस्थांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, अनुचित व्यापार पद्धतींचा अवलंब आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए), ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत, या संस्थांना अनुक्रमे 10 लाख रुपये आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, याबाबतचा अंतिम आदेश जारी केला.  
ग्राहक, म्हणून या वर्गाच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, तसेच ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदींचे उल्लंघन करून कोणत्याही वस्तू अथवा सेवांबाबत खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात केली जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने  मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली, मोशन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि करिअर लाईन कोचिंग (सीएलसी), सीकर यांच्या विरोधात हे आदेश जारी केले. या कोचिंग संस्थांनी मोठे दावे केले होते. त्यांनी आयआयटी-जेईई आणि एनईईटी या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची नावे, छायाचित्रे आणि त्यांची कामगिरी याचा जाहिरातींमध्ये ठळकपणे वापर केला, मात्र, या उमेदवारांनी नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमांची निवड केली होती, याबाबत महत्त्वाची माहिती मात्र दडवून ठेवली, असे निरीक्षण नोंदवून प्राधिकरणाने ही कारवाई केली.
विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि कोचिंग क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सीसीपीएने आतापर्यंत, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींबद्दल कोचिंग संस्थांना 60 हून अधिक नोटिसा बजावल्या आहेत. सविस्तर तपासणी आणि चौकशीनंतर, यूपीएससी नागरी सेवा परीक्षा (सीएसई), आयआयटी-जेईई, एनईईटी, आरबीआय, आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या 31 कोचिंग संस्थांना, सीसीपीएने 1.39 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा दंड ठोठावला आहे.
(अंतिम आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://doca.gov.in/ccpa/orders-advisories.php?page_no=1)

***

सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2261371) अभ्यागत कक्ष : 11