पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण


तेलंगणामध्ये उत्तम पायाभूत सुविधा आणि सुनियोजित  दळणवळण जोडणी व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने टाकले गेलेले हे एक मोठे पाऊल : पंतप्रधान

आज भारत रिफॉर्म्स एक्सप्रेसवर स्वार होऊन पुढे वाटचाल करतो आहे, त्याचबरोबर आजचा भारत आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करत आहे : पंतप्रधान

पूर्वी जेव्हा भारत ही एक मोठी जागतिक अर्थव्यवस्था होती, त्यावेळी देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्राने मोठी भूमिका बजावली होती, आता आपण त्याच वारशाला पुन्हा बळकटी देत आहोत, वारंगळ इथले पीएम मित्र पार्क (PM MITRA Park) देशाच्या वस्त्रोद्योग क्रांतीला गती देईल : पंतप्रधान

गेल्या 12 वर्षांत केंद्र सरकारने आधुनिक दळणवळणीय जोडणी व्यवस्थेला प्रामुख्याने प्राधान्य दिले,  रस्ते असो वा रेल्वे असो किंवा विमानतळ, संपर्क व्यवस्थेच्याप्रत्येक क्षेत्राअंतर्गत मोठी गुंतवणूक केली जात आहे : पंतप्रधान

आज जगभरातील प्रत्येक व्यक्ती ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व जाणून आहे, त्याला अनुसरूनच देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या सुनिश्चितीसाठी केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत आहे : पंतप्रधान

Posted On: 10 MAY 2026 5:59PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि  राष्ट्रार्पण केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी  हैदराबाद हे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाचे केंद्र म्हणून त्याचे परिवर्तनाच्यादृष्टीने असलेले महत्व अधोरेखित केले. तेलंगणा आणि संपूर्ण राष्ट्राच्या जलद गतीने होत असलेल्या विकासाला गती देण्याती हा प्रदेश बजावत असलेली महत्वाची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. आज सुरू करण्यात आलेल्या मोठ्या स्तरावरील अनेक प्रकल्पांमुळे तेलंगण एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून प्रस्थापित होईल असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक स्तरावरच्या  संपर्क व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी तेलंगणातील जनतेचे अभिनंदनही केले.

आज भारत रिफॉर्म्स एक्सप्रेसवर स्वार होऊन विविध क्षेत्रांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करत आपली प्रगती करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. झहीराबाद औद्योगिक क्षेत्र हे या परिवर्तनाचा आधारस्तंभ असून, ते औद्योगिक कॉरिडॉर विकसित करण्याच्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेचे प्रतिनिधित्व करत आहे त्यांनी सांगितले. इथे विकसित केले जात असलेले  संकुल म्हणजे एकाप्रकाची औद्योगिक स्मार्ट सिटी असेल, इथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, उत्तम वीज पुरवठा व्यवस्था तसेच प्रगत स्वरुपातील माहिती तसेच दळणवळण तंत्रज्ञान  सुविधांनी सुसज्ज असेल अशी माहिती त्यांनी दिली. जागतिक गुंतवणूकदारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक सुविधा या संकुलात उपलब्ध असतील असेही त्यांनी सांगितले. या संकुलाच्या उभारणीसाठी केंद्र सरकारच्या आर्थिक वचनबद्धतेची माहितीही त्यांनी दिली. या संकुलातील सुविधांच्या उभारणीसाठी केंद्र सरकार हजारो कोटी रुपये खर्च करणार आहे, यामुळे तेलंगणा आणि हैदराबादमधील युवा वर्गासाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले होतील असे ते म्हणाले. या प्रकल्पाच्या बहुआयामी प्रभावाबद्दलची माहितीही पंतप्रधानांनी दिली. इथे उत्पादित होणारी वाहने, यंत्रसामग्री तसेच या क्षेंत्रात स्थापित होणार असलेले अन्न प्रक्रिया उद्योगांमुळे समांतरपणे तेलंगणातील कामगार आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताच्या गौरवास्पद इतिहासात जागतिक आर्थिक सत्ता म्हणून स्थान मिळवण्यात वस्त्रोद्योग क्षेत्राचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे, याची आठवण करून देत पंतप्रधानांनी या धोरणात्मक क्षेत्राला आधुनिक उपक्रमांच्या माध्यमातून नवसंजीवनी देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. वारंगळ येथील 'पीएम मित्रा पार्क' (PM MITRA Park) हा देशातील वस्त्रोद्योग क्रांतीला नवी गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, या पार्कमध्ये समाविष्ट होणाऱ्या उद्योगांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आणि विशेषतः 'पीएलआय' म्हणजेच उत्पादन- संलग्न- प्रोत्साहन योजनेचा संपूर्ण लाभ मिळेल, यावर त्यांनी भर दिला. अनेक लाभार्थी उद्योगांनी आधीच या पीएलआय योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी नमूद केले. हा वस्त्रोद्योग पार्क मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करेल, ज्याचा सर्वाधिक फायदा आपल्या माता-भगिनींना आणि मुलींना होईल, असे ते म्हणाले.
रस्ते, रेल्वे आणि विमानतळ अशा सर्वच क्षेत्रांतील आधुनिक दळणवळण पायाभूत सुविधांसाठी भारत सरकारने गेल्या 12 वर्षांत केलेल्या अभूतपूर्व गुंतवणुकीचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. एकट्या राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी सुमारे पावणे दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशाच्या या विशेष लक्ष केंद्रित धोरणाचा तेलंगणाला मोठा फायदा झाला असून, गेल्या 12 वर्षांत राज्यातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे दुप्पट झाल्याचे त्यांनी सांगितले. तेलंगणा-कर्नाटक राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि वाहतूक खर्च कमी होईल, असे ते म्हणाले. पायाभूत सुविधांमधील पद्धतशीर गुंतवणुकीचे थेट आणि सकारात्मक परिणाम त्यांनी अधोरेखित केले. तेलंगणा आणि कर्नाटकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे लोकांची खूप मोठी सोय होईल, असेही मोदी यांनी नमूद केले.
2014 नंतर तेलंगणातील रेल्वे क्षेत्रातील गुंतवणुकीत आमूलाग्र बदल झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. 2014 पूर्वी अखंड आंध्र प्रदेशचे एकूण रेल्वे बजेट 1,000 कोटी रुपयांपेक्षाही कमी असायचे; तर आज एकट्या तेलंगणाचे वार्षिक रेल्वे बजेट 5,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या राज्यात सुमारे 50,000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प एकाच वेळी प्रगतीपथावर असल्याचे सांगून त्यांनी, तेलंगणाच्या सेवेत दाखल झालेल्या 5 वंदे भारत आणि 6 अमृत भारत गाड्यांचा उल्लेख केला आणि हा आधुनिक रेल्वे वाहतुकीतील परिवर्तनाचा उत्तम नमुना असल्याचे स्पष्ट केले. काझीपेट-विजयवाडा बहुमार्गिका (मल्टी-ट्रॅकिंग) प्रकल्पाच्या काही टप्प्यांचे उद्घाटन आणि काझीपेट रेल्वे अंडर बायपास मार्गाचा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. या सुविधांमुळे लोकांचा प्रवास अधिक सुकर होईल आणि मालवाहतुकीलाही मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऊर्जेतील व्यत्ययामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होऊ शकतात,  अशा एकविसाव्या शतकातील जागतिक परिस्थितीत ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना  पंतप्रधानांनी नमूद केले की, आज जगातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा सुरक्षेचे धोरणात्मक महत्त्व समजले आहे. भारत सरकार राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि मलकापूर येथे इंडियन ऑइलच्या नव्या वितरण केंद्राचे उद्घाटन हे या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक पाऊल असल्याचे सांगितले. प्रादेशिक विकासाच्या सातत्यासाठी या प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट करताना मोदी म्हणाले, “हे वितरण केंद्र तेलंगणाच्या वाढत्या ऊर्जा गरजा पूर्ण करेल आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत करेल.”

अलीकडच्या काही वर्षांत भारताने जागतिक सौरऊर्जा उत्पादक देशांमध्ये अग्रस्थानी झेप घेतल्याचे अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीचाही उल्लेख केला. सरकारच्या टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या ऊर्जा विविधीकरण धोरणाचे विवरण करताना त्यांनी सांगितले की, सुरुवातीला सर्वांसाठी एलपीजी उपलब्धतेवर भर देण्यात आला आणि त्यानंतर स्वस्त वाहिनीद्वारे नैसर्गिक वायू वितरणाला प्रोत्साहन देण्यात आले तसेच देशभरात सीएनजी आधारित व्यवस्था विकसित करण्यात आली. अशा व्यापक उपक्रमांमुळे भारताला सध्याच्या जागतिक ऊर्जा संकटाचा सामना करता येत असल्याचे नमूद करताना, पंतप्रधानांनी ऊर्जा संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली. आयात करण्यात येणाऱ्या ऊर्जा उत्पादनांचा वापर केवळ वास्तविक गरजेनुसार आणि संयमाने केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आर्थिक तसेच भू-राजकीय फायद्यांवर भर देताना मोदी म्हणाले, “परकीय चलनाची बचत करण्यासाठी आणि युद्धजन्य संकटांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपण आवश्यक तेवढ्याच ऊर्जेचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

तेलंगणातील युवक नव्या आकांक्षांचे शिल्पकार असून राज्यातील शेतकरी समाज नव्या आशेचे वाहक असल्याचे सांगताना, पंतप्रधानांनी उद्योग, एमएसएमई आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्व घटक विकसित तेलंगणा उभारण्यासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यास कटिबद्ध असल्याची दखल घेतली. तेलंगणाचा विकास हा राष्ट्रीय विकासाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि राज्याची प्रगती व देशाची समृद्धी यांचा थेट संबंध असल्याचे अधोरेखित केले. तेलंगणातील प्रत्येक कुटुंबाला आश्वस्त करताना, पंतप्रधानांनी सांगितले की, राज्यातील जनतेची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत सरकार विकासाभिमुख प्रयत्न सातत्याने सुरू ठेवेल, कारण तेलंगणाचा विकास झाला तर भारताचा विकास होईल, असे मोदी यांनी सांगितले.

***

राधिका अघोर/तुषार पवार/वैभवी जोशी/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2259590) अभ्यागत कक्ष : 12