पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकच्या मंड्या येथील श्री गुरु भैरवैक्य मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मूळ मजकूर

Posted On: 15 APR 2026 1:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 एप्रिल 2026

 

परमपूज्य जगतगुरू श्री श्री श्री डॉक्टर निर्मलानंदनाथ महास्वामी, माजी पंतप्रधान आदरणीय एच. डी. देवेगौडा, येथील राज्यपाल श्रीमान थावरचंद गेहलोत, परमपूज्य जगतगुरू स्वामी परमात्मानंद जी सरस्वती, केंद्रातील माझे सहकारी एच.डी. कुमारस्वामी, शोभा करंदलाजे, कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आर. अशोका, राज्याचे मंत्री एन. चेलुवराय स्वामी, सर्व पूज्य संत, इतर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो.

मित्रांनो,

आज माझे मन अशा काही भावनांनी भरून आले आहे, ज्या शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. श्री कालभैरव मंदिरात दर्शन आणि पूजन, श्री गुरु भैरवैक्य मंदिराच्या भव्य उद्घाटनाचा साक्षीदार होणे, ऐतिहासिक ज्वाला पीठात वेळ घालवणे, आध्यात्मिक उंची गाठलेल्या संतांचे सान्निध्य लाभणे आणि आता येथे उपस्थित जनसमुदायाचे दर्शन घेणे, हा अनुभव माझ्यासोबत कायमस्वरूपी राहील. तुमच्या सर्वांच्या मध्ये येण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे सौभाग्य मानतो. मी तुम्हा सर्वांना याप्रसंगी अनेक अनेक शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

कर्नाटकात येणे माझ्यासाठी नेहमीच आनंदाची बाब असते. प्रत्येक वेळी येथे आल्यावर मला नवी प्रेरणा मिळते. पण आज 'सक्करे नगरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुर मंड्या जिल्ह्याचा हा दौरा अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आहे. ही धरती ऊसाच्या गोडव्यासाठी ओळखली जाते आणि येथील लोकांच्या बोलण्यातही तसाच गोडवा दिसतो. त्यांचा आपलेपणा, त्यांची स्वागत करण्याची पद्धत मनाला स्पर्शून जाते. मी वारंवार सांगतो की कर्नाटक तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान, या दोन्हीमध्ये समृद्ध आहे. म्हणजेच दर्शनाची खोली आणि तंत्रज्ञानाची शक्ती, दोन्ही येथे अस्तित्वात आहेत. श्री आदि चुंचनगिरी महासंस्थान मठासारखी आध्यात्मिक केंद्रे या महान भूमीची महान देणगी आहेत. ही संस्था तत्त्वज्ञान, आध्यात्मिकता आणि नैतिक मूल्यांच्या माध्यमातून समाजाला दिशा देते.

मित्रांनो,

भारत ही हजारो वर्षांपासून चालत आलेली एक जिवंत सभ्यता आहे. जगामध्ये अशी उदाहरणे खूप कमी मिळतात जिथे परंपरा इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत निरंतर टिकून राहतात. जेव्हा आपण श्री आदि चुंचनगिरी महासंस्थान मठाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला या निरंतरतेचे साक्षात रूप दिसते. या पवित्र मठाचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षांचा आहे. याची गुरु परंपरा, याचे आध्यात्मिक दर्शन आणि याच्या सेवेच्या परंपरेने पिढ्यानपिढ्या या भूमीला समृद्ध केले आहे. याच परंपरेत जगतगुरू श्री श्री श्री डॉ. बालगंगाधरनाथ महास्वामींसारखे महान संत झाले, ज्यांनी या वारशाला नवी उंची दिली. आज जदतगुरू श्री श्री श्री डॉ. निर्मलानंदनाथ महास्वामी त्याच धारेला नवीन ऊर्जा, गती आणि समर्पणाने सर्वांना सोबत घेऊन पुढे नेत आहेत.

मित्रांनो,

आमच्या समाजात वेळोवेळी असे महान व्यक्तिमत्व येत राहिले आहेत, जे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनापुरते मर्यादित राहिले नाहीत. ते लोकांमध्ये राहिले, त्यांनी लोकांचे सुख-दुःख समजून घेतले, त्यांचा संघर्ष अनुभवला आणि समाजाला दुःख, पीडा आणि अडचणीतून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवला. जगतगुरू श्री श्री श्री डॉ. बालगंगाधरनाथ महास्वामी देखील अशीच दिव्य विभूती होते. ते आज देहरूपाने आपल्या सोबत नाहीत, पण ते येथे अदृश्य रूपात उपस्थित आहेत. त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक स्तरांवर कार्य केले. त्यांच्याकडे प्रगाढ आध्यात्मिक शक्ती होती, पण त्यांचे जीवन केवळ साधनेपुरते मर्यादित नव्हते. ग्रामीण पार्श्वभूमीतून आल्यामुळे ते ग्रामीण तरुणांच्या आकांक्षा आणि सामान्य माणसापुढील आव्हाने समजून घेत असत. म्हणूनच, त्यांच्यासाठी भक्तीचा अर्थ समाजापासून दूर जाणे नव्हता, तर समाजासाठी पुढे येऊन जबाबदारी उचलणे हा होता.

मित्रांनो,

महास्वामीजींनी शिक्षण क्षेत्रात शेकडो संस्था स्थापन केल्या, जिथे प्राथमिक स्तरापासून ते मेडिकल आणि इंजिनिअरिंग सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंतचे शिक्षण दिले जात आहे. याचा लाभ सर्वाधिक गरीब आणि ग्रामीण कुटुंबातील मुलांना मिळाला आहे. आरोग्य क्षेत्रातही त्यांची दृष्टी तितकीच परिवर्तनकारी होती. त्यांनी अशा आरोग्य संस्था उभारल्या, जिथे आजही सेवाभावाने काम होत आहे. दर्जेदार आरोग्य सुविधा हा काही लोकांचा विशेषाधिकार नसावा, तर ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

मित्रांनो,

आज आमचे सरकारही याच दृष्टीकोनातून काम करत आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोट्यवधी गरिबांवर रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले आहेत. आम्ही ही योजना 70 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवली आहे, जेणेकरून त्यांना सन्मानाने उत्तम आरोग्य सुविधा मिळू शकतील.

मित्रांनो,

आज या श्री गुरु भैरवैक्य मंदिरात उपस्थित राहणे आणि जगतगुरू श्री श्री श्री डॉ. बालगंगाधरनाथ महास्वामींचा आशीर्वाद घेणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपण सर्व जाणतो की, महास्वामीजी करुणेची मूर्ती होते. त्यांची करुणा केवळ माणसांपुरती मर्यादित नव्हती, ती सर्व जीवांपर्यंत पसरलेली होती. मोरांच्या रक्षणासाठी त्यांनी जे सामाजिक आंदोलन उभे केले, ते याचे उदाहरण आहे. आणि आज स्वामीजींनी मला स्मृतीचिन्ह म्हणून 'मोर'च दिला आहे. हे केवळ पर्यावरण संरक्षणाचे काम नाही, तर ते आपल्या सांस्कृतिक चेतनेशी देखील जोडलेले आहे, कारण मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि भगवान सुब्रह्मण्य यांचे वाहन देखील आहे. तसे तर दिल्लीत तुम्हा सर्व देशवासियांच्या कृपेने भारत सरकारने मला जे सरकारी निवासस्थान दिले आहे, तिथेही खूप मोर आहेत. त्यापैकी अनेकांशी तर माझी चांगली मैत्री झाली आहे. मोर किती शांत आणि सुंदर पक्षी आहे, हे मी प्रत्यक्ष पाहतो.

मित्रांनो,

आज जगतगुरू श्री श्री श्री डॉ. निर्मलानंदनाथ महास्वामी आपल्या गुरूंची परंपरा पुढे नेत आहेत. त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालून ते लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. आपल्या गुरूंच्या सन्मानार्थ श्री गुरु भैरवैक्य मंदिराची निर्मिती करणे म्हणजे केवळ एक वास्तू उभारणे नाही, तर एका भावनेला साकार करणे आहे. येणाऱ्या काळात हे स्थान निश्चितपणे सेवा, साधना आणि प्रेरणेचे केंद्र बनेल.

मित्रांनो,

श्री आदि चुंचनगिरी महासंस्थान मठ - अन्न, अक्षर, आरोग्य, अध्यात्म, आश्रय, अरण्य, गाय, अनुकंपा आणि अनुबंध, या नऊ तत्त्वांवर कार्य करतो. याच भावनेतून मी आपल्यासमोर अशी नऊ क्षेत्रे मांडू इच्छितो, जिथे आपण सर्वजण मिळून एक सामूहिक संकल्प करू शकतो. मी माझे 9 आग्रह आपल्यासमोर मांडतो.

मित्रांनो,

हे मंड्या पाण्याचे महत्त्व समजते. हा संपूर्ण भाग माता कावेरीच्या आशीर्वादाने वाढला आहे. आणि म्हणूनच माझा पहिला आग्रह आहे की आपण सर्वांनी पाणी वाचवण्याचा आणि पाण्याच्या उत्तम व्यवस्थापनाचा संकल्प करावा. माझा दुसरा आग्रह झाडे आणि निसर्गाशी जोडलेला आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत कोट्यवधी लोकांनी आपल्या आईच्या नावाने वृक्षारोपण केले आहे. आपणही आपल्या आईच्या सन्मानार्थ झाड नक्की लावावे आणि धरती मातेच्या रक्षणाचा संकल्प करावा. माझा तिसरा आग्रह स्वच्छतेबाबत आहे. धार्मिक स्थळ असो, सार्वजनिक ठिकाण असो, गाव असो वा शहर, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे. माझा चौथा आग्रह स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेशी संबंधित आहे. आपण भारतीय उत्पादनांचा स्वीकार करावा, भारतीय उत्पादक आणि उद्योगांना बळकट करावे. 'व्होकल फॉर लोकल' हा मंत्र घेऊन जगूया. माझा पाचवा आग्रह देशाचे सौंदर्य पाहण्याशी संबंधित आहे. आपण आपला देश जाणून घ्यावा, देशाच्या विविध कोपऱ्यात फिरावे आणि स्थानिक पर्यटनाला चालना द्यावी.

मित्रांनो,

मंड्या ही कष्टाळू शेतकऱ्यांची भूमी आहे. माझा सहावा आग्रह शेतकऱ्यांना आहे की त्यांनी रसायनमुक्त, नैसर्गिक शेतीकडे वळावे. माझा सातवा आग्रह निरोगी आहाराशी जोडलेला आहे. आपल्यामध्ये आदरणीय देवेगौडा उपस्थित आहेत. ते ‘रागी मुद्दे’ लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जातात. हा संपूर्ण भाग रागीचे महत्त्व जाणतो. युवा पिढीनेही भरड धान्याचा आपल्या आहारात समावेश करावा. आपल्या देशात लठ्ठपणा हे एक मोठे आव्हान बनत आहे. याचा सामना करण्यासाठी, जेवणातील तेलाचे प्रमाण 10 टक्के कमी करण्याचाही प्रयत्न करा. माझा आठवा आग्रह योग, खेळ आणि फिटनेसशी संबंधित आहे. आपण सर्वांनी यांना आपल्या जीवनाचा भाग बनवले पाहिजे. माझा नवा आग्रह सेवाभावाशी संबंधित आहे, जो तुम्ही तुमच्या कार्यांतून सतत सिद्ध करत आहात.

मित्रांनो,

गरजवंताची सेवा समाजाला मजबूत बनवते, यामुळे तुमच्या जीवनाला एक मोठे उद्दिष्ट लाभते. जर आपण सर्व या नऊ आग्रहांवर प्रामाणिकपणे आणि संकल्पासह पुढे गेलो, तर आपण विकसित कर्नाटक आणि विकसित भारताच्या दिशेने वेगाने पुढे जाऊ शकतो. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना याप्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो. मी जगतगुरू श्री श्री श्री डॉ. निर्मलानंदनाथ महास्वामी आणि श्री आदि चुंचनगिरी महासंस्थान मठाचे आभार मानतो की, तुम्ही मला या पावन प्रसंगी, या पवित्र भूमीत, या तपोभूमीत आमंत्रित केले. तुमच्यासोबत काही क्षण घालवण्याची संधी मिळाली, मी मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

 

* * *

नितीन फुल्लुके/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259062) अभ्यागत कक्ष : 26