माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसिद्ध गीतकार आणि संवाद क्षेत्रातले तज्ञ प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
प्रसून जोशी यांच्या नियुक्तीमुळे नवी ऊर्जा आणि सर्जनशील अभिव्यक्ती लाभेल : अश्विनी वैष्णव
प्रविष्टि तिथि:
02 MAY 2026 7:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2026
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि संवाद क्षेत्रातले तज्ञ प्रसून जोशी यांची भारताची सार्वजनिक सेवा प्रसारक संस्था असलेल्या प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
प्रसून जोशी यांचे साहित्य, जाहिरात, चित्रपट आणि सार्वजनिक संवाद क्षेत्रात व्यापक योगदान आहे. सर्जनशील क्षेत्रातले ते एक प्रख्यात कलाकार आहेत. आपल्या प्रभावी लेखनासाठी आणि सांस्कृतिक क्षेत्राबद्दलच्या अफाट ज्ञानासाठी ते ओळखले जातात. समकालीन भारतीय माध्यमांच्या अभिव्यक्तीला आकार देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांची असंख्य चित्रपट गीते गाजली असून, अनेक जाहिराती तसेच सामाजिक जाणिवांची मांडणी करणाऱ्या असंख्य कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत. त्यामुळे देशभरातील विविध प्रेक्षकांशी ते जोडले गेले आहेत.

प्रसून जोशी यांची प्रसार भारती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रसून जोशी हे जाहिरात, साहित्य, कला आणि चित्रपट जगतातले, जगभर नावाजले गेलेले एक सर्जनशील व्यक्तिमत्व असले तरी त्यांचे हृदय हे प्रामुख्याने भारतासाठी धडधडत आहे या शब्दांत वैष्णव यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव केला आहे. प्रसून जोशी यांच्या शब्दांमध्ये आपल्या मातीचा सुगंध जाणवतो, त्यांचे विचार आणि दृष्टीकोनातून आपल्या कालातीत संस्कृतीचे सार प्रतिबिंबित होते, त्यांच्या नेतृत्वात प्रसार भारतीला नवी ऊर्जा, दृढ उद्देश आणि एक नवी सर्जनशील अभिव्यक्ती लाभेल असेही वैष्णव यांनी म्हटले आहे. यानिमीत्ताने प्रसून जोशी यांचा कार्यकाळ संस्मरणीय आणि अर्थपूर्ण ठरावा यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
या नियुक्तीआधी, जोशी यांनी ऑगस्ट 2017 पासून मुंबईतील केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC - Central Board of Film Certification) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. आपल्या या कार्यकाळात त्यांनी चित्रपट उद्योग क्षेत्राशी संबधीत भागधारकांसोबत सातत्यपूर्ण संवाद राखला आणि चित्रपट प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेला बळकट करण्यात योगदान दिले. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळातील त्यांचा कार्यकाळात सर्जनशील अभिव्यक्ती आणि नियामक जबाबदारीमधील संतुलित दृष्टिकोनाची प्रचिती आली. त्याआधी त्यांनी मॅककॅन वर्ल्ड ग्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मॅककॅन वर्ल्ड ग्रुप एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. यासोबतच 2016 पासून ते इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत.
सध्या सार्वजनिक प्रसारण क्षेत्रात वेगाने तंत्रज्ञानाभिमूख बदल घडून येत आहेत, त्याचवेळी प्रेक्षकांच्या अपेक्षाही बदलत आहेत. अशावेळी सर्जनशीलतेशी संबंधीत उद्योग क्षेत्र आणि सार्वजनिक संवाद क्षेत्रातील त्यांच्या व्यापक अनुभवामुळे, प्रसार भारतीच्या नेतृत्वाला एक वेगळा दृष्टीकोन लाभेल अशी अपेक्षा आहे.
प्रसार भारतीबद्दल
प्रसार भारती ही संस्था, प्रसार भारती कायदा (भारतीय प्रसारण महामंडळ कायदा), 1990 अंतर्गत स्थापन झालेली आणि 1997 पासून कार्यरत असलेली भारताची वैधानिक स्वायत्त सार्वजनिक सेवा प्रसारक संस्था आहे. या संस्थेअंतर्गत दोन मुख्य विभागांचा अंतर्भाव आहे:
- आकाशवाणी (AIR - All India Radio): आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ सेवांपैकी एक सेवा आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो लोकांपर्यंत अनेक भाषा आणि बोलीभाषांमधून ही सेवा घरोघरी पोहोचली आहे.
- दूरदर्शन (DD): ही भारताची राष्ट्रीय दूरचित्रवाणी प्रसारक सेवा असून या सेवेअंतर्गत बातम्या, शिक्षण, मनोरंजन आणि सांस्कृतिक आशय असलेले विविध प्रकारचे कार्यक्रम प्रसारीत केले जातात.
सार्वजनिक प्रसारणाची भावना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने प्रसार भारतीद्वारा वेव्हज ही विनामूल्य ओटीटी सेवाही उपलब्ध करून दिली गेली आहे.
माहिती प्रसारीत करणे, राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे, सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि देशभरात विश्वासार्ह सार्वजनिक प्रसारण सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात प्रसार भारती महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. प्रादेशिक आणि डिजिटल सेवांअतर्गत प्रसार भारतीची सेवा देशभरात व्यापक स्वरुपात विस्तारलेली आहे, त्यासोबतच विविध डिजिटल व्यासपीठे, डीटीएच सेवा आणि संग्रहित सामग्री विषयक उपक्रमांच्या माध्यमातून प्रसार भारतीच्या सेवांचा अधिकाधिक विस्तार सुरुच आहे.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2257550)
आगंतुक पटल : 83
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam