पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


देशात खतांची मजबूत उपलब्धता - गरजेपेक्षा जास्त पुरवठा

जागतिक पातळीवर खतांच्या किमतीत मोठी वाढ होऊनही देशात प्रमुख खतांच्या कमाल किरकोळ किमतीत कोणताही बदल नाही, खतांचे परवडणारे दर आणि सुलभ उपलब्धता सुनिश्चित करत, शेतकऱ्यांचा जागतिक किमतीतील चढ उतारांपासून बचाव करण्यासाठी सरकार वचनबद्ध

पंतप्रधानांच्या निर्देशानुसार भारताकडून आखाती देशांसोबतच्या संवादाचा विस्तार, एका महिन्यात भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये दोन उच्चस्तरीय बैठका

Posted On: 27 APR 2026 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2026

 

पश्चिम आशियातील सातत्याने बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार नियमितपणे ताजी अद्ययावत माहिती देऊन, नागरिकांपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने खत मंत्रालयानेही खत क्षेत्राशी संबंधित माहिती सामायिक केली आहे.

खत साठ्याची स्थिती आणि उपलब्धता

देशातील खतांच्या साठ्याबद्दलची एकंदरीत स्थिती

उत्पादन

आजच्या तारखेपर्यंत 

गेल्या वर्षीच्या याच तारखेपर्यंत

युरिया 

71.58

70.67

डीएपी

22.35

15.07

एनपीकेएस

57.56

44.49

एसएसपी

26.26

26.14

एमओपी

12.46

12.87

एकूण

190.21

169.24

2026 च्या खरीप हंगामासाठी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 390.54 लाख मेट्रिक टन इतकी खतांची गरज असल्याचा अंदाज मांडला आहे. त्यातुलनेत आजच्या तारखेपर्यंत सुमारे 190 लाख मेट्रिक टन (49%) इतका साठा उपलब्ध आहे. हा साठा सामान्य स्थितीत उपलब्ध असणाऱ्या 33% च्या पातळीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे. यातून सरकारने नियोजनात केलेली सुधारणा, अग्रिम साठवणूक तसेच व्यावसायिक वाहतूक आणि रसद पुरवठ्याचे (लॉजिस्टिक) कार्यक्षम व्यवस्थापन दिसून येते.

राज्यांमधील पुरवठ्याची स्थिती उत्तम आहे. 1 एप्रिल 2026 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत उपलब्ध असलेल्या खतांचे प्रमाण गरजेपेक्षा खूप जास्त होते.

20.54 लाख मेट्रिक टन इतका युरिया उपलब्ध असणे गरजेचे असताना, त्या तुलनेत, उपलब्ध असलेल्या युरियाचे प्रमाण 71.40 लाख मेट्रिक टन इतके आहे. तर 6.67 लाख मेट्रिक टन इतक्या डीएपीची खतांच्या उपलब्धतेची गरज असताना त्या तुलनेत सध्या 23.09 लाख मेट्रिक टन इतका साठा आहे. यातून सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामाबद्दलची देशातली स्थिती खूपच उत्तम असल्याचे दिसून येते.

प्रमुख खतांची कमाल किरकोळ किंमत (MRP) – प्रमुख खतांच्या कमाल किरकोळ किमतीत कोणताही बदल नाही

उत्पादन

युद्धापूर्वी (प्रति गोणी ₹)

युद्धानंतर (प्रति गोणी ₹)

युरिया 

266.5

266.5

डीएपी 

1350

1350

टीएसपी 

1300

1300

जागतिक पातळीवर खतांच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. मात्र एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर युरियाच्या किमती प्रति गोणीसाठी 4,000 ₹ पेक्षा जास्त झाल्या आहेत, त्याचवेळी केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना 45 किलोच्या प्रत्येक गोणीसाठी केवळ 266.5 ₹ इतक्या मोठ्या प्रमाणात अनुदानित असलेल्या दराने युरियाचा पुरवठा करत आहे. यातून खतांची किंमत परवडणारी असेल आणि खते सुलभतेने उपलब्ध होत राहीतल याची सुनिश्चिती करण्यासोबतच, शेतकऱ्यांचा जागतिक पातळीवर किमतींमध्ये होत असलेल्या चढ - उतारांपासून बचाव करण्यासाठीची केंद्र सरकारची वचनबद्धता दिसून येते.

सध्याचा संघर्ष उद्भवल्यानंतर खतांचे देशांतर्गत उत्पादन आणि आयात

उत्पादन

सध्याचा संघर्ष उद्भवल्यानंतरचे

देशांतर्गत उत्पादन

सध्याचा संघर्ष उद्भवल्यानंतर

भारतीय बंदरांवर पोहोचलेली आयात

युरिया 

35.42

9.4

डीएपी

4.50

0.76

एनपीकेएस 

12.08

1.95

एसएसपी

7.01

0

एमओपी 

0

1.85

एकूण

59.01

13.96

  • देशांतर्गत युरिया उत्पादनासाठी नैसर्गिक वायू इंधनाच्या उपलब्धतेशी संबंधित समस्यांही सोडवल्या गेल्या आहेत. सध्या खत कारखान्यांना केला जात असलेला पुरवठा स्थिर आहे, यासोबतच गरजेनुसार अतिरिक्त एलएनजी / आरएलएनजी ची व्यवस्थाही करून दिली जात आहे.
  • सध्या युरिया तसेच पी. अँड के. यांसारख्या खतांच्या उत्पादनासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उपलब्धतेच्या बाबतीत कोणतीही मोठी अडचण नाही.
  • खते पुरेशा प्रमाणात उपलब्धत असतील याची सुनिश्चिती करण्यासाठी अधिकारप्राप्त सचिव गटाच्या (EGoS) आतापर्यंत 6 बैठका झाल्या आहेत, या बैठकांच्या माध्यमातून उपलब्धतेशी संबंधित बहुतांश आव्हानांवरचा तोडगा काढला गेला आहे.
  • भारताची खत सुरक्षा मजबूत, स्थिर आणि सुव्यवस्थित राहिली आहे. सर्व प्रमुख खतांच्या बाबतीत त्यांची उपलब्धता सातत्याने गरजेपेक्षा अधिक राहिली आहे.

अंमलबजावणी आणि देखरेखविषयक उपाययोजना

  • एलपीजी सिलिंडर्सची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात अंमलबजावणीविषयक कारवाई सुरू आहे. काल देशभरात 1800  हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
  • सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी अचानक केल्या जाणाऱ्या तपासण्या अधिक तीव्र केल्या आहेत. त्यांनी 310 एलपीजी वितरक केंद्रांना  दंड ठोठावला आहे, तर कालपर्यंत 71 एलपीजी वितरक केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

एलपीजी पुरवठा

व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटपविषयक उपाययोजना:

  • 1 एप्रिल 2026 पासून, सुमारे 19.5 लाख – 5  किलो वजनाचे 'एफटीएल’ एलपीजी सिलिंडर्स विकले गेले आहेत.
  • 3 एप्रिल 2026 पासून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी 5 किलो वजनाच्या एफटीएल सिलिंडर्सबाबत जनजागृती करण्यासाठी सुमारे 9,080  शिबिरे आयोजित केली. या शिबिरांमध्ये 1,46,000 हून अधिक 5 किलो वजनाचे एफटीएल  सिलिंडर्स विकले गेले.
  • काल, 110  हून अधिक शिबिरांच्या माध्यमातून 5 किलो वजनाचे 3,430 एफटीएल सिलिंडर्स विकले गेले.

सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक कामकाज

बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने पर्शियन आखातातील सध्याच्या सागरी परिस्थितीबाबत अद्ययावत माहिती दिली. या भागात भारतीय जहाजे आणि त्यावरील कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि  सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा तपशीलही मंत्रालयाने सादर केला. यात खालील बाबी नमूद करण्यात आल्या :

  • 25 एप्रिल, 2026  रोजी 'MT CHIRON 7' (आयएमओ क्रमांक 9127291) असा  ‘टोगो – ध्वज’  असलेल्या तेल/रासायनिक टँकरशी संबंधित एका घटनेची नोंद करण्यात आली. या जहाजावर 17 भारतीय खलाशी (एकूण कर्मचारी: 24) उपस्थित होते. ही घटना ओमानमधील 'शिनास आउटर पोर्ट लिमिट' परिसरात घडली. ज्या जहाजांना  इराणी तटरक्षक दलाने  अडवले होते, अशा जहाजांच्या जवळून भारताचे हे जहाज प्रवास करत होते.  याच दरम्यान, इशारा म्हणून गोळीबार करण्यात आला. जहाजावरील सर्व 17 भारतीय खलाशी सुरक्षित आहेत.
  • खलाशांचे कल्याण आणि सागरी वाहतूक कामकाज अखंडित सुरू राहावे यासाठी, बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय हे परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि सागरी क्षेत्रातील संबंधित घटकांशी सातत्याने समन्वय साधत आहे.
  • या भागातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि गेल्या 24 तासांत भारताचा ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजाशी संबंधित कोणतीही घटना घडल्याचे वृत्त नाही.
  • नौवहन संचालनालयाच्या महासंचालकांच्या नियंत्रण कक्षाची अद्ययावत माहिती -  कार्यान्वित झाल्यापासून, या नियंत्रण कक्षाने 7,780 दूरध्वनी कॉल्स आणि 16,658  हून अधिक ईमेल्स हाताळले आहेत. गेल्या 24 तासांत, कार्यालयाला  25 कॉल्स आणि 140  ईमेल्स प्राप्त झाले आहेत.
  • मायदेशी  परतलेल्यांविषयी अद्ययावत माहिती -  मंत्रालयाने, 'डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग'च्या माध्यमातून, आतापर्यंत  2,776 हून अधिक भारतीय खलाशांच्या मायदेशी सुरक्षित परतण्याची व्यवस्था केली आहे.  यामध्ये गेल्या 24 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांवरून परतलेल्या 12 खलाशांचा समावेश आहे.

या प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

परराष्ट्र मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशिया प्रदेशातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहे. या प्रदेशातील भारतीय समुदायाची सुरक्षा, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यावर मंत्रालयाचे विशेष लक्ष केंद्रित आहे. या संदर्भात खालील माहिती देण्यात आली:

  • भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास वेळेवर मदत पुरवण्यासाठी 24 तास कार्यरत असलेल्या हेल्पलाइन चालवत आहेत आणि ते आपल्या नागरिकांना सक्रिय साहाय्य करत आहेत. तसेच, त्यांनी तेथील स्थानिक सरकारांबरोबरही  निकटचा  संपर्क ठेवला  आहेत.
  • सरकार या प्रदेशात असलेल्या भारतीय खलाशांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत आहे. भारतीय दूतावासांकडून त्यांना स्थानिक अधिकारी आणि संस्थांशी समन्वय साधणे, आवश्यक ती कायदेशीर मदत पुरवणे तसेच त्यांनी भारतात माघारी परतण्याची विनंती केल्यास त्यांना त्यासाठी सहाय्य करणे यासह इतर सर्वप्रकारचे सहाय्य पुरविण्यात येत आहे.
  • या भागातून भारतातील विविध ठिकाणी अतिरिक्त विमान फेऱ्यांसह एकंदर विमान वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. 28 फेब्रुवारीपासून, जवळपास 13,19,000 प्रवासी या भागातून भारतात आले आहेत.
  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये, परिचालन आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव विमान कंपन्यांची भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान मर्यादित व्यावसायिक उड्डाणे सुरू आहेत, आज या दोन्ही देशांदरम्यान अंदाजे विमानांच्या 105 फेऱ्या अपेक्षित आहेत.
  • सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील विविध ठिकाणांची विमानसेवा अजूनही सुरू आहेत.
  • कतारची हवाई हद्द अंशतः खुली झाल्यामुळे, कतार एअरवेज भारतातील अनेक ठिकाणी विमान फेऱ्यांचे परिचालन करत आहे. एअर इंडिया आणि इंडिगो देखील लवकरच कतारहून भारतासाठी विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहेत.
  • कुवेतचे हवाई क्षेत्र खुले आहे. जझीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेजने कुवेतहून भारतामध्ये मर्यादित विमान उड्डाणे पुन्हा सुरू केली आहेत.
  • बहरीनची हवाई हद्दही खुली आहे. गल्फ एअर बहरीनहून भारतात विविध ठिकाणी विमान फेऱ्या चालवत आहे.
  • इराकचे हवाई क्षेत्र मर्यादित विमानसेवांसह या भागातील गंतव्यस्थानांसाठी खुले आहे, त्यामुळे त्याचा भारतात पुढील प्रवास करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
  • इराणची हवाई हद्द मालवाहू आणि चार्टर विमानांसाठी अंशतः खुली आहे. भारतीय नागरिकांना इराणमध्ये प्रवासास जाणे टाळावे असा सल्ला देण्यात आला असून जे आधीपासूनच तेथे आहेत, त्यांना भारतीय दूतावासाच्या सहकार्याने भू-सीमा मार्गांनी माघारी येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आतापर्यंत, तेहरानमधील भारतीय दूतावासाने 2,461 भारतीय नागरिकांना भू-सीमा मार्गांनी इराणमधून बाहेर पडण्यास मदत केली आहे.
  • इस्रायलचे हवाई क्षेत्र खुले झाले असून, या प्रदेशातील गंतव्यस्थानांसाठी मर्यादित प्रमाणात विमानांच्या फेऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत, त्याचा पुढे भारतात परतण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

आखाती प्रदेशामधील संपर्कात वाढ

  • पंतप्रधानांच्या निर्देशानुसार भारताने आखाती प्रदेशातील देशांशी आपला संपर्क वाढवला आहे.
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी 25-26 एप्रिल 2026 रोजी संयुक्त अरब अमिरातीचा (युएई) अधिकृत दौरा केला. त्यांनी 25 एप्रिल 2026  रोजी राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावतीने सदिच्छा व्यक्त केल्या. दोन्ही बाजूंनी भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील व्यापक सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उपाययोजना, प्रदेशातील परिस्थिती आणि परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवर चर्चा केली.
  • भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात झालेली एका महिन्यातील ही दुसरी उच्चस्तरीय बैठक होती.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256097) अभ्यागत कक्ष : 10