पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा कतार दौरा (9-10 एप्रिल 2026)
प्रविष्टि तिथि:
10 APR 2026 2:42PM by PIB Mumbai
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी दोन दिवसांच्या सरकारी दौऱ्यासाठी 9 एप्रिल च्या दुपारी दोहा येथे पोहोचले. संध्याकाळी त्यांनी कतारचे ऊर्जा व्यवहार राज्यमंत्री आणि कतार एनर्जीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी साद शेरिदा अल-काबी यांची भेट घेतली.
माननीय मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने कतारचे अमीर महाराज शेख तमीम बिन हमाद अल थानी आणि कतारचे पंतप्रधान व परराष्ट्र मंत्री महामहीम शेख मोहम्मद बिन अब्दुर्रहमान अल थानी यांना शुभेच्छा, तसेच एकता आणि पाठिंब्याचा संदेश दिला.

त्यांनी मार्च 2026 मध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमीर यांच्यात झालेल्या दोन दूरध्वनी संभाषणांची आठवण करून दिली. या संभाषणांदरम्यान दोन्ही नेत्यांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला होता. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी कतारने भारतीय समुदायाची घेतलेली काळजी आणि दिलेल्या समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.
दोन्ही मंत्र्यांनी उच्च-स्तरीय सहभाग, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संस्कृती आणि लोकांमधील संबंधांसह दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंधांच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. या प्रदेशात शांतता आणि स्थिरता लवकर परत येईल आणि भारत आणि कतारमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
उर्जा राज्यमंत्री साद शेरिदा अल-काबी यांनी कतार एक विश्वासार्ह ऊर्जा पुरवठादार राहील या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि भारतासोबतचे ऊर्जा संबंध आणि सहकार्य अधिक मजबूत करायला उत्सुक असल्याचे सांगितले.

दोन्ही मंत्र्यांनी 8 एप्रिल रोजी मान्य झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचे स्वागत केले. त्यांनी जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्यय लवकर संपवण्याच्या आणि स्थिती पूर्ववत करण्याच्या महत्त्वावर भर दिला. या संदर्भात, जागतिक पुरवठा साखळी सुरळीत राखण्यासाठी नौकानयनाचे अबाधित स्वातंत्र्य आणि जागतिक व्यापाराचा प्रवाह सुरू राहण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
माननीय मंत्र्यांनी कतारच्या ऊर्जा व्यवहार राज्यमंत्र्यांचे आदरातिथ्याबद्दल आभार मानले. दोन्ही मंत्र्यांनी येत्या काही आठवड्यांत नियमित संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे.
***
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2250800)
आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam