नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रमुख बंदरांनी आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये 915 दशलक्ष टन मालाची  केली हाताळणी; 7.06% वाढीसह गाठले निर्धारित उद्दिष्ट

Posted On: 05 APR 2026 2:27PM by PIB Mumbai


भारताच्या सागरी क्षेत्रांसाठी महत्त्वाची म्हणता येईल अशी कामगिरी  बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्रमुख बंदरांनी केली आहे. या बंदरांनी आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये एकत्रितपणे 915.17 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली आहे. या कामगिरीसह बंदरांनी 904 दशलक्ष टनांचे वार्षिक उद्दिष्ट यशस्वीपणे ओलांडले आहे.

या कामगिरीद्वारे गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.06% वाढीची नोंद झाली असून त्यामुळे या क्षेत्राची मजबूत सुधारणा, वाढलेली कार्यक्षमता आणि निरंतर प्रगतीची पुष्टी होत आहे. हा टप्पा गाठण्यात भारत सरकारने 'मेरिटाइम अमृत काल व्हिजन 2047'  अंतर्गत बंदरांच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवणे आणि भारताला एक अग्रगण्य सागरी राष्ट्र म्हणून बळकट करण्यासाठी केलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीचा आणि परिवर्तनीय सुधारणांचा मोठा वाटा आहे.

आमच्या प्रमुख बंदरांद्वारे 915 दशलक्ष टनांहून अधिक मालाची विक्रमी हाताळणी हा  भारताचे सागरी क्षेत्र बळकट करण्याप्रती सरकारच्या अढळ वचनबद्धतेचा दाखला आहे, असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री  सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेनुसार, आम्ही जागतिक दर्जाच्या बंदरांच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहोत, कार्यक्षमता सुधारत आहोत आणि भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी विनाअडथळा लॉजिस्टिक सेवा सक्षम करत आहोत. ही कामगिरी भारताला 'मेरिटाइम अमृत काल व्हिजन 2047' अंतर्गत जागतिक सागरी महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ करत आहे, असे ते म्हणाले.

ही कामगिरी सर्व प्रमुख बंदरांमध्ये झालेली सातत्यपूर्ण वाढ दर्शवते. यामध्ये दीनदयाल बंदर प्राधिकरण 160.11 दशलक्ष टन (MT) माल हाताळणीसह अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ पारादीप बंदर प्राधिकरण 156.45 दशलक्ष टन आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण( जेएनपीए)  102.01 दशलक्ष टनांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशाखापट्टणम बंदर प्राधिकरण, मुंबई बंदर प्राधिकरण, चेन्नई बंदर प्राधिकरण आणि न्यू मंगलोर बंदर प्राधिकरण यांसारख्या इतर महत्त्वाच्या बंदरांनीही उत्कृष्ट कामगिरी बजावत एकूण माल हाताळणीत मोलाचे योगदान दिले आहे.

वाढीच्या दराचा विचार करता, मुरगाव बंदर प्राधिकरणाने  15.91% ची सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. त्याखालोखाल कोलकाता डॉक सिस्टमने 14.28% आणि जेएनपीए ने 10.74% वाढ नोंदवली असून, हे आकडे सुधारलेली कार्यक्षमता आणि मालाच्या वाढत्या प्रमाणाचे निदर्शक आहेत.

***

सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2249139) अभ्यागत कक्ष : 41