पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान उद्या 31 मार्च रोजी गुजरातला भेट देणार


महावीर जयंतीनिमित्त, पंतप्रधानांच्या हस्ते गांधीनगर येथील कोबा तीर्थ येथे सम्राट संप्रति वस्तुसंग्रहालयाचे होणार उद्घाटन

या वस्तुसंग्रहालयातून जैन धर्माच्या समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशाचे दर्शन घडते आणि हे संग्रहालय येथे भेट देणाऱ्यांना जैन धर्मामध्ये घडलेली उत्क्रांती आणि तिचे गहन सांस्कृतिक परिणाम यांना कालक्रमानुसार समजून घेण्यात मदत करेल

भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या सानंद येथील कायनेस सेमीकॉन कारखान्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार

सेमीकंडक्टरचे व्यावसायिक उत्पादन करणारी भारतातील ही दुसरी सेमीकंडक्टर सुविधा असेल

सेमीकंडक्टर पॅकेजिंगसाठी स्वदेशी क्षमता उभारणीमध्ये, भारतातील चीप परिसंस्थेतील महत्त्वाची दरी भरुन काढण्याच्या दृष्टीने तसेच आत्मनिर्भरतेची संकल्पना आणखी पुढे नेण्यात योगदान देण्यासाठी ही सुविधा उभारण्यात आली आहे

पंतप्रधान वाव-थराड येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील

यांमध्ये उर्जा, रेल्वे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, आरोग्य, शहरी विकास, आदिवासी विकास तसेच ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे

Posted On: 30 MAR 2026 3:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मार्च 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 31 मार्च 2026 रोजी गुजरातला भेट देणार आहेत. या दिवशी सकाळी 10 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर येथील सम्राट संप्रति वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन होईल. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. त्यानंतर दुपारी साधारण पाऊण वाजता ते अहमदाबाद मध्ये साणंद येथील कायनेस सेमीकॉन कारखान्याचे उद्घाटन करतील तसेच उपस्थित जनतेला संबोधित देखील करतील. त्यानंतर ते वाव-थराड येथे पोहोचतील आणि तेथे दुपारी चार वाजता ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांशी संवाद देखील साधतील.

पंतप्रधानांची गांधीनगर भेट

महावीर जयंतीनिमित्त, पंतप्रधान गांधीनगर येथील कोबा तीर्थ येथे सम्राट संप्रति वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन करतील. सम्राट अशोकाचे नातू आणि अहिंसेप्रती तसेच जैन धर्माच्या प्रसाराप्रती कटिबद्ध असलेले जैन परंपरेतील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या सम्राट संप्रति यांच्या नावावरुन नामकरण करण्यात आलेले हे वस्तुसंग्रहालय जैन धर्माच्या समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवते.

महावीर जैन आराधना केंद्र परिसरात स्थित असलेल्या या वस्तुसंग्रहालयामध्ये सात वेगवेगळे विभाग असून त्यापैकी प्रत्येक विभाग भारताच्या नागरी संस्कृतीविषयक परंपरेच्या अनोख्या पैलूंना समर्पित आहे. हे संग्रहालय येथे भेट देणाऱ्यांना शतकानुशतकांच्या ज्ञान आणि वारशाच्या माध्यमातून एक व्यापक प्रवास घडवते. या वस्तुसंग्रहालयात पारंपरिक प्रदर्शने आणि आधुनिक डिजिटल तसेच दृक्श्राव्य मांडणी यांचा समन्वय साधला असून त्यातून अभ्यागत, संशोधक तसेच विद्वान यांना तल्लीन करणारा आणि गुंतवून ठेवणारा अनुभव मिळतो.

या वस्तुसंग्रहालयामध्ये अनेक शतके प्राचीन दुर्मिळ अवशेष, जैन कलाकृती आणि पारंपरिक वारशाशी संबंधित संग्रहाचे जतन तसेच प्रदर्शन करण्यात आले आहे. येथे असलेल्या सात भव्य दालनांमध्ये कलाकुसरीने घडवलेल्या दगडी तसेच धातूच्या मूर्ती, विस्तृत तीर्थ पट्टा आणि यंत्र पट्टा, लघुतम चित्रे, चांदीचे रथ, नाणी तसेच प्राचीन हस्तलिखिते यांची मांडणी करण्यात आली आहे. येथील विशाल दालनांमध्ये दोन हजारांहून अधिक दुर्मिळ संग्रह व्यवस्थित मांडलेले असून हे संग्रहालय येथे भेट देणाऱ्यांना जैन धर्मामध्ये घडलेली उत्क्रांती आणि तिचे गहन सांस्कृतिक परिणाम यांना कालक्रमानुसार समजून घेण्यात मदत करते. 

पंतप्रधानांची साणंद भेट

या भेटीत पंतप्रधानांच्या हस्ते अहमदाबाद मध्ये सानंद जीआयडीसी येथे कायनेस सेमीकॉन कारखान्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील वाटचालीच्या महत्त्वाच्या टप्प्याचे प्रतिनिधित्व करत या सुविधेत सेमीकंडक्टरच्या व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात असेल.

संक्षिप्त, कार्यक्षम आणि विश्वसनीय उर्जा स्विचिंग यंत्रणांची आवश्यकता असणाऱ्या वाहन संबंधी तसेच औद्योगिक सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या प्रगत इंटेलिजंट पॉवर मोड्यूल्स (आयपीएम्स) च्या उत्पादनासह हे व्यावसायिक उत्पादन सुरु होईल. प्रत्येक मोड्यूलमध्ये 17 चिप्स असतील आणि त्या कॅलिफोर्निया येथील अल्फा आणि ओमेगा सेमीकंडक्टर (एओएस) कंपनीला पुरवण्यात येतील. जेव्हा या कारखान्याच्या उभारणीचे सर्व टप्पे पूर्ण होतील तेव्हा त्यात दर दिवशी 6.33 दशलक्ष युनिट्स उत्पादन करण्याची क्षमता निर्माण होईल.

कायनेस सेमीकॉन कारखान्याचे उद्घाटन हे भारत सेमीकंडक्टर अभियानांतर्गत (आयएसएम) उचलण्यात आलेले प्रमुख पाऊल आहे. सेमीकंडक्टर्सचे व्यावसायिक उत्पादन सुरु करण्यासाठीच्या कार्यक्रमांतर्गत मंजूर प्रकल्पांमध्ये, मायक्रॉन टेक्नोलॉजी या कंपनीनंतरची ही दुसरी सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा असेल.  

या प्रकल्पाद्वारे भारताचे दुसरे ओएसएटी/एटीएमपी (आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेम्ब्ली आणि चाचणी/ असेम्ब्ली, चाचणी, मार्किंग, आणि पॅकिंग) युनिट उत्पादन टप्प्यात प्रवेश करत असल्यामुळे या प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे. या प्रकल्पाद्वारे भारतीय वंशाच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवा (ईएमएस) कंपनीने सेमी कंडक्टर उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला असून त्यायोगे देशांतर्गत क्षमतेला अधिक बळकटी मिळाली आहे.

हे केंद्रामुळे स्वदेशी सेमीकंडक्टर पॅकेजिंग क्षमता निर्माण करण्यात मदत होणार आहे. यामुळे देशातील चिप विषयक परिसंस्थेमधील महत्त्वाच्या कमतरता दूर करता येऊ शकतील, त्यासोबतच उच्च तंत्रज्ञान विषयक उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेच्या दृष्टीकोनालाही यामुळे चालना मिळू शकणार आहे.

पंतप्रधानांची वाव थराड भेट

पंतप्रधान 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करणार आहेत. हे प्रकल्प ऊर्जा, रेल्वे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, आरोग्य, नगरविकास, आदिवासी विकास आणि ग्रामविकास यांसह अनेक प्रमुख क्षेत्रांशी संबंधित आहेत.

या भेटीत पंतप्रधानांच्या हस्ते 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अहमदाबाद धोलेरा दृतगती महामार्ग या प्रवेश नियंत्रित महामार्गाचे उद्घाटनही होणार आहे. या दृतगती महामार्गामुळे इथल्या स्थानिक प्रदेशातील दळणवळणीय जोडणीचा विस्तार होईल, त्यासोबतच धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रामधील औद्योगिक विकासालाही यामुळे पाठबळ लाभेल, आणि त्यातून आर्थिक प्रगतीला गती मिळू शकेल.

पंतप्रधानांच्या हस्ते पदपथांसह इदर-बादोली बायपास वरच्या 4 पदरी मार्गाच्या बांधकामाची पायाभरणी होणार आहे. यासोबतच पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग-754K च्या धोलावीरा-मौवाना-वाउवा-सांतलपुर मार्गावरच्या अद्ययावतीकरणाअंतर्गत, पक्क्या कडांसह (Paved Shoulder) विरुद्ध दिशेची दोन वाहने जाऊ शकतील अशा दुपदरी मार्गिकेच्या (Carriageway) रुंदीकरण कामाची पायाभरणी देखील करणार आहेत. या प्रकल्पांमुळे महामार्ग विषयक पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळणार आहे, धोलावीरा सारख्या पर्यटन स्थळांसह अनेक प्रमुख क्षेत्रांमधील दळणवळणीय जोडणीत सुधारणा घडून येणार आहे, व्यावसायिक वाहतूक आणि रसद पुरवठा व्यवस्थापनाची (लॉजिस्टिक) कार्यक्षमता वाढू शकणार आहे, तसेच  सामाजिक आर्थिक विकासालाही मोठे पाठबळ मिळू शकणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते गांधीनगर-कोबा-विमानतळ मार्गावरील भाईजीपुरा जंक्शन इथल्या उड्डाणपुलासह, रस्ते पायाभूत सुविधा विषयक महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणीही होणार आहे. या कामांमुळे या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटायला मदत होणार आहे. त्यासोबतच एका सुनियोजित वाहनतळासाठी पुलाखाली जागा देखील उपलब्ध होणार आहे. गांधीनगर-कोबा-एरोड्रम मार्गावरील पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठ (PDPU) जंक्शन वरील उड्डाणपुलाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. हा मार्ग गांधीनगरला विमानतळासोबत जोडतो.  या मार्गावर दररोज 140,000 पेक्षा जास्त वाहनांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर या उड्डाणपुलामुळे अहमदाबाद आणि गांधीनगर दरम्यानच्या CH-0 या जंक्शनपासून विमानतळापर्यंतची वाहतूक आणि रहदारी विनाअडथळा सुरळीत सुरु राहील याची सुनिश्चिती होऊ शकणार आहे.

या भेटीत पंतप्रधानांच्या हस्ते खावडा पुलिंग स्टेशन-2 तसेच, नवीकरणीय ऊर्जा वाहून नेण्यासाठी 4.5 गिगावॅट क्षमतेच्या पारेषण प्रणालीसह, वीज पारेषण व्यवस्थेशी संबंधित प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटनही होणार आहे. या प्रकल्पांचा एकत्रित खर्च सुमारे 3,650 कोटी रुपये इतका आहे. या प्रकल्पांमुळे नवीकरणीय ऊर्जा व्यवस्थेचे एकात्मिकरण आणि पारेषण क्षमतेला बळकटी देण्याचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे.

रेल्वे क्षेत्राअंतर्गत, पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट-कनालस दुहेरीकरण प्रकल्पाचा (111.20 किमी) भाग असलेला कनालस-जामनगर दुहेरीकरण प्रकल्प (28 किमी) आणि गांधीधाम-आदिपूर विभागाचे चौपदरीकरण (10.69 किमी) काम राष्ट्राला समर्पित केले जाणार आहे. या प्रकल्पांमुळे रेल्वेच्या क्षमतेचा विस्तार होईल, वाहतुकीचा खोळंबा कमी होईल, कार्यान्वयनात्मक कार्यक्षमतेत सुधारणा घडून येईल तसेच वेगवान प्रवासी आणि मालवाहतुकीची सुनिश्चित देखील होईल.

यासोबतच हिम्मतनगर-खेडब्रह्मा गेज रूपांतरण प्रकल्पाचे (54.83 किमी) उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामुळे या प्रदेशातील रेल्वे जोडणी आणि प्रवासी वाहतूकीत सुधारणा घडून येईल. यावेळी पंतप्रधान खेडब्रह्मा-हिम्मतनगर-असारवा रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.  

याशिवाय संपूर्ण गुजरातमधील नागरी पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि जीवनमानाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने सुमारे 5,300 कोटी रुपये किमतीच्या 44 नगरविकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होईल.  यासोबतच आरोग्य आणि कुटुंब कल्याण क्षेत्राअंतर्गतच्या विविध उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. यात अहमदाबाद मधील असारवा इथल्या नागरी रुग्णालयातील 858 खाटांच्या रात्र निवारा केंद्राचे (रैन बसेरा) तसेच, गांधीनगर नागरी रुग्णालय आणि गांधीनगर मधील गुजरात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था (GMERS) वैद्यकीय महाविद्यालय इथल्याही अशाच प्रकारच्या सुविधेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 

पाटण इथल्या राणी की वाव इथल्या लाईट अँड साऊंड शोचे (प्रकाश आणि ध्वनी आधारीत माहिती/मनोरंजनपर सादरीकरण) तसेच, वडनगर मधील शर्मिष्ठा तलावावरील वॉटर स्क्रीन प्रोजेक्शन अर्थात पाण्यावरील दृश्यमय खेळ या पर्यटन विषयक उपक्रमांचे उद्गाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच नागरिकांचा पर्यटन विषयक अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तसेच सांस्कृतिक वारशाचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने, बनासकांठा मधील बालाराम महादेव आणि विश्वेश्वर महादेव इथल्या पर्यटन विषयक पायाभूत सुविधांच्या कामांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे.

या व्यतिरिक्त बनासकांठा इथली कासारा-दांतीवाडा जलवाहिनी तसेच पाटण आणि बनासकांठा दरम्यानची दिंद्रोल-मुक्तेश्वर जलवाहिनी या दोन जलवाहिन्यांसोबतच, सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या दोन मोठ्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे राष्ट्रार्पण पंतप्रधान करतील.  अंबाजी आणि आसपासच्या ग्रामीण भागासाठीच्या पाणीपुरवठा योजनेची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होईल. या कामांचा लाभ बनासकांठा जिल्ह्यातील दांता आणि आमिर्गढ तालुक्यामधील सुमारे 1.5 लाख लोकांना मिळणार आहे. त्याचवेळी 34 गावे आणि अंबाजी शहरालाही पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. यावेळी पंतप्रधान गांधीनगर जिल्ह्यात तीन साबरमती नदीकाठ विस्तार प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांसाठी एकत्रितपणे सुमारे 1,000 कोटी रुपयांची गुंतवणुक केली जाणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते वेजलपूर, अहमदाबाद इथल्या मुलांसाठीच्या शासकीय वसतिगृहाचे उद्घाटनही होणार आहे. या वसतीगृहामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठे पाठबळ लाभणार आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246843) अभ्यागत कक्ष : 15