माहिती आणि प्रसारण मंत्रालय
हाँगकाँग फिल्ममार्ट 2026 मध्ये 'भारत पॅव्हेलियन'ने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भारताचा वाढता प्रभाव केला अधोरेखित
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, भारतीय निर्मात्यांसाठी निर्मिती सह-करार, व्यावसायिक देवाणघेवाण आणि बाजारपेठेत प्रवेश सहजसाध्य करून, जागतिक चित्रपट बाजारपेठांमध्ये भारताचे स्थान भक्कमपणे प्रस्थापित करण्याचे कार्य निरंतरपणे करत आहे
Posted On:
19 MAR 2026 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2026
हाँगकाँग आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि दूरदर्शन बाजारपेठ (FILMART) 2026 मधील 'भारत पॅव्हेलियन' हे जागतिक प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताची वाढती उपस्थिती अधोरेखित करणारे ठरले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय करार, व्यावसायिक देवाणघेवाण आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून कार्य करत आहे.

या दालनाचे (Pavilion) उद्घाटन हाँगकाँग आणि मकाऊ एसएआर (SARs) येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील भारताचे वाणिज्यदूत राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले; यावेळी त्यांनी चित्रपट, दूरदर्शन आणि उदयोन्मुख माध्यम क्षेत्रांमधील जागतिक भागीदारी बळकट करण्याबाबत भारताच्या असलेल्या प्रतिबद्धतेवर प्रकाश टाकला.
त्यांनी भारतीय शिष्टमंडळाच्या महत्वपूर्ण सहभागाचेही कौतुक केले; हा सहभाग म्हणजे, भारताच्या प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जगाला अधिकाधिक रुचि निर्माण होत असल्याचे द्योतक आहे, असे ते म्हणाले.
‘'भारत पॅव्हेलियन'चे आयोजन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत 'सेवाविशिष्ट निर्यात प्रोत्साहन परिषदे'ने (SEPC) आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या 'राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा'ने (NFDC) संयुक्तपणे केले असून, यास हाँगकाँग आणि मकाऊ येथील प्रशासकीय क्षेत्रांमधील (SARs) भारताच्या वाणिज्य दूतावासाचे सहकार्य लाभले आहे. यावेळी झालेल्या उद्घाटनप्रसंगी 'सेवाविशिष्ट निर्यात प्रोत्साहन परिषद, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि हाँगकाँग व्यापार विकास परिषदेचे (एचकेटीडीसी) वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.
भारत पॅव्हेलियनमध्ये चित्रपट, दूरदर्शन, अॅनिमेशन आणि उदयोन्मुख माध्यमे या क्षेत्रांतील भारताच्या वैविध्यपूर्ण सामग्री व निर्मिती व्यवस्थेची रंजक माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय भागधारकांसोबत व्यावसायिक बैठका, सह-निर्मितीविषयक चर्चा आणि नेटवर्किंग उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जागतिक आशय क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांवर आणि नव्या संधींवर आधारित एक परिसंवादही यावेळी आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी बाजारपेठेतील बदलते स्वरूप आणि सीमापार सहकार्याबाबत विचारांची देवाणघेवाण केली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) भारताला जागतिक चित्रपट बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सह-निर्मिती, बाजारपेठ प्रवेश आणि भारतीय निर्मात्यांसाठी वितरणाच्या संधी निर्माण करण्यासाठी एनएफडीसी कार्यरत आहे.

या पॅव्हेलियनमध्ये एनएफडीसीच्या पुढाकारातून होणाऱ्या महत्त्वाच्या उपक्रमांचाही प्रचार करण्यात आला, ज्यामध्ये 15 जून 2026 पासून मुंबईतील पेडर रोड येथील एनएफडीसी कॅम्पसमध्ये आयोजित होणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (एमआयएफएफ) आणि वेव्ह्ज डॉक बाजार यांचा समावेश आहे. या उपक्रमांचा भर माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपटांवर असेल. तसेच, नोव्हेंबर 2026 मध्ये गोवा येथे आयोजित होणारा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) आणि वेव्ह्ज फिल्म बाजार यांसारख्या भारताच्या प्रमुख व्यासपीठांचाही विशेष उल्लेख करण्यात आला.
भारत पॅव्हेलियन हा भारत सरकारच्या समन्वित प्रयत्नांचे प्रतीक असून धोरण, उद्योग आणि जागतिक संपर्क यांना एकत्र आणत भारताला जागतिक मीडिया व मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाच उपक्रम आहे.
* * *
राधिका अघोर/संपदा पाटगांवकर/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2242763)
अभ्यागत कक्ष : 19