माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय माहिती व प्रसारण सचिवांनी आयआयसीटीला दिली भेट,विस्तार योजना आणि कंटेंट-क्रिएटर लॅबच्या नियोजनाचा घेतला आढावा


माहिती व प्रसारण सचिवांनी भारताच्या सर्जनशील प्रतिभा परिसंस्थेला जोपासण्यात अग्रगण्य भूमिका बजावण्याचे आयआयसीटीला केले आवाहन

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी आयआयसीटीने एक चैतन्यशील केंद्र बनावे असे जाजू यांचे आवाहन

Posted On: 18 MAR 2026 7:23PM by PIB Mumbai

मुंबई, 18 मार्च 2026

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्स येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी) ला भेट दिली आणि या  संस्थेच्या विकासाची दिशा आणि विस्तार योजनांचा आढावा घेतला.

जाजू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीला मंडळाचे सर्व सदस्य आणि उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.  जाजू यांनी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत  त्यांच्या धोरणात्मक आराखड्यावर सविस्तर चर्चा केली. सर्जनशील आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख मागण्या पूर्ण करण्यासाठी आयआयसीटीचे शैक्षणिक कार्यक्रम आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर या चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यांनी उद्योग-शैक्षणिक सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या उपक्रमांचाही आढावा घेतला.

या प्रसंगी बोलताना जाजू म्हणाले, “पायाभूत सुविधा तयार आहेत आणि आयआयसीटीमध्ये सुमारे  150 विद्यार्थ्यांनी त्यांचे अभ्यासक्रम सुरू देखील केले आहेत. जुलैपर्यंत 400 विद्यार्थी, प्रत्यक्ष स्वरूपात  20 स्टार्टअप्स आणि आभासी स्वरूपात आणखी बरेच स्टार्टअप्स समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. ही संस्था निर्मिती आणि निर्मिती-पश्चात कामासाठी उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवते.” सध्या आयआयसीटीमध्ये , 11 स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले  जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जाजू यांनी  सांगितले की, गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये लवकरच एक मोठे कॅम्पस विकसित केले जाईल आणि तेथे 2028 मध्ये अभ्यास  वर्ग सुरू होणे अपेक्षित आहे.

बैठकीतील चर्चेसंदर्भात  माहिती व प्रसारण सचिवांनी सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या व्हिज्युअल गेमिंग, व्हीएफएक्स आणि कंटेंट क्रिएशन लॅब्सबाबतही उद्योगासोबत चर्चा झाली. सर्जनशील अर्थव्यवस्थेला आणखी  मजबूत कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते, असे जाजू म्हणाले. गेल्या वर्षी, वेव्हज शिखर परिषदेत , ‘ऑरेंज इकॉनॉमी’ उपक्रमांतर्गत वीस  लाख लोकांना कंटेंट क्रिएशन आणि सर्जनशील क्षेत्रांशी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवरही आजच्या चर्चेत भर देण्यात आला असे जाजू यांनी सांगितले.देशभरातील 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये आशय-सामग्री निर्मात्यांसाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या प्रस्तावावरील चर्चा, हे या भेटीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. डिजिटल सर्जनशीलतेला चालना देणे, माध्यम साक्षरता वाढवणे आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख संधींशी सुसंगत आशय-सामग्री उत्पादन कौशल्यांनी विद्यार्थ्यांना सुसज्ज करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

जाजू यांनी प्रशिक्षण कार्यक्रम, उत्पादन पायाभूत सुविधा आणि नवोन्मेष केंद्रांसह संस्थेच्या अत्याधुनिक सुविधांना भेट दिली. त्यांनी मंडळाच्या सदस्यांशी संवाद साधला, आणि भारताच्या सर्जनशील प्रतिभा परिसंस्थेच्या संवर्धनात आयआयसीटीच्या भूमिकेबद्दल विचारांची देवाणघेवाण केली.

संस्थेत सध्या ॲनिमेशन, गेमिंग, पोस्ट-प्रॉडक्शन आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी मधील 18 विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात गेमिंगमधील सहा, पोस्ट-प्रॉडक्शनमधील चार आणि ऍनिमेशन, कॉमिक्स आणि एक्सआरमधील आठ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रमुख कार्यक्रमांमध्ये ऍनिमेशन फिल्म डिझाइन, इंटरऍक्टिव्ह व्हिडिओ गेम डिझाइन आणि डेव्हलपमेंट एण्ड पोस्ट प्रॉडक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची कला आणि विज्ञान या 24 महिन्यांच्या पदविकांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, आयआयसीटी, 3D कॅरेक्टर डिझाइन, व्हिज्युअल इफेक्ट्स, सिनेमॅटिक व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी फिल्ममेकिंग, ई-स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि फिल्ममेकिंगमधील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासारख्या क्षेत्रांत तीन ते सहा महिन्यांचा अल्प-मुदतीचा पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रदान करते.

ही भेट, भारताच्या वेगाने वाढणाऱ्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा, डिजिटल सर्जनशीलतेला चालना देण्यावर आणि संस्थात्मक चौकट मजबूत करण्यावर असलेला सातत्यपूर्ण भर अधोरेखित करते.

एनएफडीसी संकुलातील आयआयसीटी ला दिलेल्या भेटीदरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी 'नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा'लाही (एनएमआयसी) भेट दिली. या ठिकाणी  जाजू यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला.

शैलेश पाटील/सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2242073) अभ्यागत कक्ष : 20