पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळम मध्ये एर्नाकुलम येथे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच लोकार्पण
हे प्रकल्प औद्योगिक विकासाला चालना देतील, पर्यटनात वाढ करतील आणि केरळम मधील नागरिकांच्या जीवनमानातील सुलभता वाढवतील: पंतप्रधान
मेक इन इंडिया तसेच आत्मनिर्भर भारतासाठी पेट्रोलियम क्षेत्राचा विस्तार गरजेचा, आज कोची रिफायनरी येथील पॉलिप्रॉपेलिन युनिटची पायाभरणी करण्यामागे हाच विचार: पंतप्रधान
भारताने आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची प्रशंसा आज संपूर्ण जग करत आहे. यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देखील पायाभूत सुविधांसाठी विक्रमी निधीची तरतूद करण्यात आली आहे: पंतप्रधान
पायाभूत सुविधांमधील या गुंतवणुकीमधून केरळम राज्याला प्रचंड फायदा होत आहे: पंतप्रधान
हे प्रकल्प ‘विकसित केरळम’ उभारण्याचा आपला निर्धार पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील: पंतप्रधान
Posted On:
11 MAR 2026 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली ,11 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोची या चैतन्यमय तटवर्ती शहराला भेट देऊन केरळमच्या विकासाला वेग देण्यासाठी विविध उच्च-परिणामकारक विकास प्रकल्पांची सुरुवात करून दिली. गुंतवणुकीचे प्रमाण अधिक ठळकपणे नोंदवत पंतप्रधानांनी यावेळी सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करून पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की कोची शहराला भेट देणे हा नेहमीच एक भव्य अनुभव असतो.“या प्रकल्पांसाठी मी केरळमच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो,” ते म्हणाले.
कोची रिफायनरी येथील पॉलिप्रॉपेलिन युनिटचा आज कोनशीला समारंभ करण्यामागे पेट्रोलियम क्षेत्राला मजबूत बनवण्याचा उद्देश आहे हा मुद्दा पंतप्रधानांनी अधोरेखित केला. या युनिटमधून दर वर्षी निर्माण होणाऱ्या 4 लाख टन पॉलिप्रॉपेलिनमुळे पॅकेजिंग, वस्त्रोद्योग तसेच वैद्यकीय उपकरणे उद्योगांना मोठे पाठबळ मिळणार आहे. या सुविधेचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी म्हणाले, “आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी पेट्रोलियम क्षेत्राचा विस्तार आवश्यक आहे,”
जागतिक दर्जाचे उत्पादन आणि तंत्रज्ञानविषयक केंद्र म्हणून भारताच्या स्थानाला बळकटी देण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान मोदी यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता तसेच सेमीकंडक्टर क्षेत्रात देशाने केलेल्या प्रगतीला शाश्वत उर्जेच्या वाढत्या गरजेशी जोडून घेतले.
सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात केरळमची प्रगती सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पश्चिम कल्लडा येथे आज 50 मेगावॅट क्षमतेच्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले. केरळममध्ये मोठ्या संख्येने जलस्रोत असल्यामुळे, तरंगत्या सौरऊर्जेच्या क्षेत्रात योगदान देण्याची या राज्यात मोठी क्षमता आहे, असे मोदी यांनी नमूद केले. हरित भविष्याच्या दिशेने होत असलेल्या बदलावर प्रकाश टाकताना मोदी म्हणाले, "सौर ऊर्जा निर्मितीमध्ये केरळमला आणखी पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे."
अमृत भारत स्थानक योजना आणि रेल्वे विद्युतीकरणाच्या माध्यमातून प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये झालेल्या महत्वाच्या प्रगतीचीही पंतप्रधानांनी विस्तृत माहिती दिली. शोरानूर जंक्शन, कुट्टीपुरम आणि चंगनास्सेरी येथील आधुनिकीकरणाचे प्रयत्न, तसेच नवीन पलक्कड-पोल्लाची रेल्वे सेवेमुळे, केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमधील रहिवाशांना अधिक चांगला रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळेल, असे ते म्हणाले. स्थानिक विकासावर राष्ट्रीय अर्थसंकल्पाचा काय परिणाम होतो, हे स्पष्ट करताना मोदी म्हणाले, "आज आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये केल्या जात असलेल्या गुंतवणुकीबद्दल जग भारताची प्रशंसा करत आहे." रस्ते पायाभूत सुविधांबाबत बोलताना पंतप्रधानांनी कोझिकोड बायपास आणि अझिक्कल बंदराबरोबरच्या सुधारित कनेक्टिव्हिटीसह, नवीन सहा पदरी रस्ते प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ आणि गर्दी कशी मोठ्या प्रमाणात कमी होईल, यावर प्रकाश टाकला. या सर्व प्रकल्पांचा केरळममधील शेतकऱ्यांना फायदा होईल, आणि त्यामुळे इथले पर्यटन आणि इतर उद्योगांना चालना मिळेल, असे मोदी यांनी सांगितले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी पुन्हा सांगितले की, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवलेला प्रत्येक रुपया तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा घटक म्हणून काम करतो. राज्याच्या समृद्ध भविष्यासाठी हे बहु-क्षेत्रीय प्रकल्प आवश्यक आधारभूत घटक आहेत, असा ठाम विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. या प्रदेशाच्या प्रगतीप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत मोदी म्हणाले, "मला पूर्ण विश्वास आहे की हे प्रकल्प 'विकसित केरळम' च्या आपल्या संकल्पाची पूर्तता करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील."
शैलेश पाटील/संजना चिटणीस/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2238375)
अभ्यागत कक्ष : 24
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam