वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘आहार 2026’ मध्ये अपेडाने (APEDA) भारताची कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न निर्यात क्षमता प्रदर्शित केली


आहार 2026 मधील ‘अपेडा’ दालनात बासमती, सेंद्रिय आणि वनस्पती-आधारित अन्नपदार्थांवर भर देण्यात आला

Posted On: 11 MAR 2026 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2026

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत, अपेडा (APEDA), अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने 10 ते 14 मार्च 2026 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 40 व्या आहार 2026 (AAHAR 2026) मध्ये भाग घेतला. अपेडा च्या दालनात भारताच्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यात क्षमतांवर प्रकाश टाकण्यात आला. या माध्यमातून निर्यातदार, राज्य प्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील भागधारक एकाच व्यासपीठावर एकत्र आले.

आहार चे 40 वे प्रदर्शन: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातिथ्य मेळयाचे उद्घाटन करण्यात आले. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) द्वारे आयोजित, या कार्यक्रमाच्या महत्वाच्या भागात इटली हा भागीदार देश आहे. उद्घाटन समारंभाला इटलीच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकारी, आयटीपीओचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील धुरीण, प्रदर्शक आणि भारतातील आणि परदेशातील प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले की, भारताचे अन्न आणि कृषी क्षेत्र जागतिक संधीच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. भारताने कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादनांच्या निर्यातीत वार्षिक 5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, जगातील आघाडीच्या निर्यातदारांमध्ये स्थान मिळवल्याचे त्यांनी नमूद केले.  गेल्या दशकभरात, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, फळे, डाळी आणि भाज्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असून, यामधून देशभरातील शेतकरी, मच्छीमार आणि अन्नप्रक्रिया करणाऱ्यांची क्षमता आणि विविधता दिसून येते, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारताच्या मुक्त व्यापार कराराच्या विस्तारलेल्या जाळ्यामुळे देशाच्या अन्न आणि कृषी निर्यातीसाठी महत्वाच्या संधी खुल्या झाल्या आहेत. अलिकडच्या काही वर्षांत, भारताने संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि इतर ईएफटीए राष्ट्रांसह, अन्य  देश आणि प्रदेशांबरोबर व्यापार करार केले आहेत, तर जपान, कोरिया, ब्रिटन, ओमान आणि मॉरिशस यासारख्या भागीदारांशी संबंध मजबूत केले आहेत, तर कॅनडा आणि युरोपियन युनियनबरोबर चर्चा पुढे नेली आहे, असे ते म्हणाले. त्यांनी नमूद केले की, या करारांमुळे जागतिक व्यापाराच्या जवळजवळ दोन-तृतीयांश भागात भारतीय उत्पादनांना प्राधान्याने बाजारपेठ उपलब्ध होत असून, त्यामुळे शेतकरी, एमएसएमई आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना  निर्यात वाढीसाठी आणि उच्च-मूल्याच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.

वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव नितीन कुमार यादव यांनी अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव आणि आयटीपीओचे व्यवस्थापकीय संचालक नीरज खरवाल यांच्यासह अपेडा पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. यावेळी भारत सरकार, अपेडा आणि सहभागी राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी, निर्यातदार आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. या दालनाने भारतातून निर्यात होणाऱ्या वैविध्यपूर्ण कृषी उत्पादनांचे दर्शन घडविण्याचे तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील निर्यातदार आणि खरेदीदारांमध्ये संवाद घडवून आणणारे महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम केले.

यानिमित्ताने, अपेडाने ज्ञान भागीदार म्हणून आयसीआरआयइआरच्या सहकार्याने तयार केलेले काकडी, काजू, अननस आणि डाळिंबावरील संशोधन अहवाल देखील प्रकाशित करण्यात आले. हे अहवाल पुरवठा साखळी, निर्यात क्षमता आणि जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठीच्या धोरणांबाबत अंतर्दृष्टी देतात.

अपेडाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग (आयआयपी) च्या सहकार्याने विकसित केलेल्या निवडक विशिष्ट प्रदेशाची खासीयत असलेल्या कृषी उत्पादनांसाठी पॅकेजिंग डिझाइन सोल्यूशन्स आणि तांत्रिक मानके सुरू करण्यात येत असल्याचीही घोषणा केली. या उपक्रमात विशेषतः जीआय-टॅग्ड आणि सेंद्रिय उत्पादने केंद्रस्थानी ठेवण्यात येत असून निर्यातीच्यादृष्टीने उत्पादनाचे अधिक चांगल्याप्रकारे संरक्षण, शेल्फ लाइफ आणि बाजारपेठ सादरीकरण यामध्ये सुधारणा करणे हा त्याचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या उत्पादनांमध्ये कार्बी आंगलोंग आले (आसाम), जी4 मिरची आणि जळगाव केळी (महाराष्ट्र), आसाम काजी नेमू (आसाम) आणि प्रयागराज सुरखा पेरू (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.

2,500 चौरस मीटर जागेत विस्तारलेल्या प्रदर्शनाच्या क्षेत्रात, अपेडाच्या दालनात देशभरातील निर्यातदार, उत्पादक संघटना, स्टार्ट-अप आणि अन्न प्रक्रिया कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या 100 हून अधिक प्रदर्शकांचा सहभाग होता. या प्रदर्शनाने उद्योगातील भागधारकांना सहकार्याच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी, बाजारपेठेतील दुवे विस्तारण्यासाठी आणि मूल्यवर्धित कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी संधी मिळवून दिल्या.

या दालनात बासमती तांदूळ, बासमतीव्यतिरिक्त इतर प्रकारचे तांदूळ, सेंद्रीय उत्पादने तसेच उदयोन्मुख वनस्पती-आधारित अन्न उत्पादने यासारख्या प्रमुख निर्यात क्षेत्रे ठळकपणे दर्शविण्यात आली, यातून जागतिक कृषी-अन्न बाजारपेठेतील भारताच्या वाढत्या पोर्टफोलिओचे प्रतिबिंब दिसून आले. वनस्पती-आधारित उत्पादनांवरील एका विशेष विभागात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोकप्रिय होत असलेले नावीन्यपूर्ण आणि शाश्वत अन्न पर्याय प्रदर्शित करण्यात आले.

अपेडाच्या जागेत आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या सहभागासह अनेक राज्यांची दालने पहायला मिळाली. या दालनांमध्ये भारताच्या कृषी-अन्न क्षेत्रातील विविधतेचे आणि ताकदीचे दर्शन घडविणारी विशिष्ट प्रादेशिक उत्पादने, पारंपरिक अन्न उत्पादने आणि निर्यातयोग्य कृषी उत्पादने मांडण्यात आली होती.

आहार 2026 मध्ये अपेडाच्या सहभागामुळे उद्योग लक्षणीय प्रमाणात त्याकडे आकर्षित झाले, पाच दिवसांच्या या कार्यक्रमाला एक लाखांहून अधिक जणांनी भेट दिली. या प्रदर्शनामुळे निर्यातदार, अन्न प्रक्रिया करणारे आणि कृषी-उद्योजकांना भारतातील तसेच परदेशातील खरेदीदार, वितरक आणि संस्थात्मक भागधारकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

एका प्रसिद्ध शेफने आयोजित केलेले लाईव्ह वेट टेस्टिंग सत्र अपेडाच्या दालनाचे प्रमुख आकर्षण ठरले, त्यामध्ये त्यांनी भारतीय कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांचा वापर करून नाविन्यपूर्ण पाककृती आणि त्यांचा कसा वापर करता येऊ शकेल याचे प्रात्यक्षिक सादर केले. या दालनात बासमती तांदूळ, बासमतीशिवाय अन्य जातींचे तांदूळ, सेंद्रीय उत्पादने आणि वनस्पती-आधारित अन्न उत्पादनांवर भर देणारी प्रदर्शने देखील होती, त्यामुळे खरेदीदारांना आणि अभ्यागतांना भारताच्या निर्यात-सज्ज उत्पादनांचा शोध घेण्याची संधी मिळाली.


शैलेश पाटील/राजश्री आगाशे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2238328) अभ्यागत कक्ष : 22