माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रसार भारतीच्या 'पीबी-शब्द' सेवेकडून पुरवल्या जाणाऱ्या बोधचिन्ह-मुक्त बातम्या मार्च 2027 पर्यंत विनामूल्य उपलब्ध


पीबी-शब्द या प्रसारभारतीच्या, 24×7 कार्यरत असलेल्या वृत्तसेवेद्वारे, दीड हजारांहून अधिक वार्ताहर आणि 60 संपादकीय कक्ष यांच्या माध्यमातून दरदिवशी विविध स्वरूपांतील 1,000 हून अधिक बातम्या उपलब्ध करून दिल्या जातात

Posted On: 10 MAR 2026 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2026

 

'प्रसार भारती - प्रसारण आणि वितरणासाठी सामायिक दृकश्राव्य साहित्य (पीबी-शब्द)' ही सेवा मार्च 2024 मध्ये एक 'सामायिक फीड सेवा' म्हणून सुरू करण्यात आली. प्रसारमाध्यम संस्थांना कोणत्याही बोधचिन्हाशिवाय व्हिडिओ, ऑडिओ, लिखित मजकूर आणि छायाचित्रे यांसारख्या विविध स्वरूपांतील दैनंदिन बातम्या पुरवणे, हा या सेवेचा उद्देश आहे. आहे. पीबी-शब्द सेवेचा विनामूल्य वापर करण्याची सुविधा मार्च 2027 पर्यंत उपलब्ध राहणार असल्याची घोषणा, प्रसार भारतीने केली आहे.

1500 हून अधिक वार्ताहर, प्रतिनिधी आणि स्थानिक बातमीदारांच्या भक्कम जाळ्याच्या मदतीने, तसेच 24×7 कार्यरत असलेल्या 60 समर्पित संपादकीय कक्षांचा आधार घेत, पीबी-शब्द भारताच्या कानाकोपऱ्यातील ताज्या बातम्या उपलब्ध करून देते. कृषी, तंत्रज्ञान, परराष्ट्र व्यवहार आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विविध क्षेत्रांतील घडामोडींचा समावेश असलेल्या, दररोज सुमारे 1000 बातम्या – विविध प्रादेशिक वृत्त विभागांतून (RNUs) आणि मुख्यालयातून एकत्रितपणे अपलोड केल्या जातात. या बातम्या भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध असतात. पीबी-शब्द द्वारे पुरवले जाणारे साहित्य कोणत्याही बोधचिन्हाशिवाय असते; तसेच या व्यासपीठावरील साहित्याचा वापर करताना कोणत्याही प्रकारचे 'क्रेडिट' (श्रेय किंवा उल्लेख) देणे बंधनकारक नसते.

पीबी-शब्द मध्ये 'लाईव्ह फीड' (Live Feed) सुविधा देखील उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे राष्ट्रीय महत्त्वाचे कार्यक्रम, पुरस्कार वितरण समारंभ, विविध पत्रकार परिषदा यांसारख्या थेट घडामोडींचे विशेष कव्हरेज - तेही कोणत्याही बोधचिन्हाशिवाय - उपलब्ध करून दिले जाते. या सेवेचा वापर अधिक सुलभ करण्यासाठी, येथे 'माध्यम भांडार' म्हणजेच सर्व जुन्या कंटेन्टचा संग्रह देखील उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना जुने फुटेज आणि विशेष पॅकेजेस सहजपणे मिळू शकतात. पीबी-शब्द वर विशेष पॅकेजेस, मुलाखती, देशभरातील हवामानाची दैनंदिन अद्यतने आणि संपादकीय लेख नियमितपणे अपडेट केले जातात; यामुळे प्रसारमाध्यम संस्थांना हे साहित्य त्वरित वापरता येते आणि त्यांचा वेळही वाचतो. shabd.prasarbharati.org या संकेतस्थळाला भेट देऊन प्रसारमाध्यम संस्था पीबी-शब्द साठी विनामूल्य नोंदणी करू शकतात.

ताज्या घडामोडी आणि अपडेट्स साठी पीबी-शब्द ला इंस्टाग्राम, एक्स (पूर्वीचे Twitter) आणि युट्यूब वरही फॉलो करा.


राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2237763) अभ्यागत कक्ष : 19