राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या नवी दिल्लीतील  कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपतींची उपस्थिती


खऱ्या अर्थाने विकास साध्य करायचा असेल तर देशाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 08 MAR 2026 2:55PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (मार्च 8, 2026) नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी केलेल्या कामगिरीचा आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी तसेच लिंगभाव समानता, महिलांची सुरक्षा, सन्मान आणि सशक्तीकरण यासाठी सामूहिक बांधिलकीची पुनःपुष्टी करण्यासाठी हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की शिक्षण, प्रशासन, न्यायव्यवस्था, लष्कर, वैद्यकशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, कला आणि उद्योजकता अशा प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण भागातील महिला स्वयं-सहायता गटांद्वारे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. त्या पंचायत संस्थांमधून ग्रामीण विकासाला नेतृत्व देत आहेत. अनेक महिला उद्योग, स्टार्टअप आणि उद्योग विश्वाच्या क्षेत्रात आपली क्षमता आणि कौशल्याचा उपयोग करून नेतृत्व करत आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्या उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. अशा उदाहरणांमुळे हा विश्वास निर्माण होतो की संधी आणि पाठबळ मिळाल्यास महिला प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टता साध्य करू शकतात.

 

राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत वेगाने महिला-नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. गेल्या दशकात महिलांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी भक्कम पायाभरणी करण्यात आली आहे. शालेय शिक्षणात भारताने लिंगभाव समानता साध्य केली आहे. उच्च शिक्षणातही एकूण प्रवेश गुणोत्तराच्या दृष्टीने महिला विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) शिक्षणात महिलांचा सहभाग वेगाने वाढत आहे. एसटीईएम विद्यार्थिनींना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृह स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या मुली ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत नेतृत्वाच्या भूमिकेसाठी सज्ज होत आहेत.

 

 महिलांचा उद्योजक आणि रोजगारनिर्मात्या म्हणून उदय होत आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. स्टार्ट-अप इंडिया योजनेअंतर्गत सहाय्य मिळवणाऱ्या स्टार्ट-अप्सपैकी निम्म्याहून अधिक स्टार्ट-अप्समध्ये किमान एक महिला संचालक आहे. तसेच दोन लाखांहून अधिक महिलांची मालकी असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) या सरकारी व्यासपीठावर सक्रिय आहे, असे त्यांनी सांगितले. 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सुरू करण्यात आलेला SHE-Mart उपक्रम बचत गट आणि ग्रामीण महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देईल, असे त्या म्हणाल्या. गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या कामगार संहितांचे उद्दिष्ट महिला कामगारांसाठी अधिक समावेशक, सुरक्षित आणि सक्षम कार्य परिसर उपलब्ध करून देणे , असल्याचे त्यांनी सांगितले.  

महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न होत असले तरीही त्यांच्या विकासाच्या प्रवासात अजूनही अनेक अडथळे आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. आजही अनेक महिलांना भेदभाव, समान कामासाठी असमान वेतन आणि घरगुती हिंसाचार यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते, असे उदाहरणादाखल त्यांनी सांगितले. या समस्या केवळ कायद्याद्वारे सोडवता येत नाहीत, त्यासाठी सामाजिक मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. जेव्हा आपण लिंग-आधारित भेदभावाच्या मानसिकतेच्या पलीकडे जातो तेव्हाच आपण समाजात खऱ्या अर्थाने समानता स्थापित करू शकतो, असे त्या म्हणाल्या.

 

खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी, देशाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय आपण निश्चित केले आहे. आपल्या देशाची वेगाने प्रगती होण्यासाठी आणि राष्ट्रीय हितासाठी नागरिकांच्या पूर्ण क्षमतेचा वापर व्हावा यासाठी महिलांना केवळ मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरित करणेच नाही तर ती स्वप्ने साध्य करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर त्यांना पाठबळ देणे देखील आवश्यक आहे, हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. महिला भीती आणि भेदभावमुक्त वातावरणात राष्ट्र उभारणीत आपले सर्वोत्तम योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, सर्व नागरिकांनी प्रत्येक मुलीला शिक्षण आणि समान संधी प्रदान करण्याची, महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची तसेच समाजात प्रचलित असलेल्या सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करावी. असे करून, आपण महिला सक्षमीकरणाचा आदर्श जगासमोर सादर करू शकतो, असे उद्गार त्यांनी काढले. 

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-

***

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2236677) अभ्यागत कक्ष : 18