गृह मंत्रालय
ओडिशामधील मुंडाली येथे सीआयएसएफच्या 57 व्या स्थापना दिन समारंभाला केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित
शौर्य,समर्पण आणि बलिदानाचे दुसरे नाव असलेल्या सीआयएसएफ ने आधुनिकतेचा अंगिकार केला असून ते राष्ट्राच्या सुरक्षेची ढाल बनले आहे
आगामी काळात सीआयएसएफ खाजगी उद्योग समूहांना देखील मिश्र स्वरुपात सुरक्षा प्रदान करेल
नक्षलवादाला त्याचा शेवट करण्याच्या उंबरठ्यावर आणण्यात सीआयएसएफने महत्त्वाची भूमिका बजावली आहे
केंद्रीय गृह मंत्र्यांनी सीआयएसएफ च्या 890 कोटी रुपये खर्चाच्या तीन निवासी संकुलांची (कामरूप, नाशिक आणि सिहोर) पायाभरणी केली आणि दोन निवासी संकुलांचे (राजारहाट आणि दिल्ली) केले उद्घाटन
Posted On:
06 MAR 2026 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2026
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सीआयएसएफ च्या 890 कोटी रुपये खर्चाने उभारण्यात येणाऱ्या तीन निवासी संकुलांची (कामरूप, नाशिक आणि सिहोर) पायाभरणी केली आणि दोन निवासी संकुलांचे (राजारहाट आणि दिल्ली) उद्घाटन केले.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज ओडिशामधील मुंडाली येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) 57 व्या स्थापना दिन समारंभात मुख्य अतिथी म्हणून संबोधन केले. यावेळी अमित शाह यांनी 890 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या सीआयएसएफ च्या तीन निवासी संकुलांची (कामरूप, नाशिक आणि सिहोर) पायाभरणी केली आणि दोन निवासी संकुलांचे (राजारहाट आणि दिल्ली) उद्घाटन केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या संबोधनात केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह म्हणाले की, "एक भक्कम राष्ट्रीय अर्थव्यवस्था उभारण्याचे आणि भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न औद्योगिक विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि औद्योगिक वाढीसाठी सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील औद्योगिक सुरक्षा दलाची आवश्यकता आहे.

अमित शाह म्हणाले की, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाशिवाय भारताच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीकोनाची कल्पनाही करता येणार नाही. त्यांनी नमूद केले की, सीआयएसएफ नेहमीच राष्ट्राची ढाल म्हणून ठामपणे उभे राहिले आहे. शाह यांनी सांगितले की, गृह मंत्रालयाने अलीकडेच सर्व बंदरांची सुरक्षा सीआयएसएफ कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह म्हणाले की, देशाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांच्या त्यागाने नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे. सीआयएसएफ आपल्या कर्तव्यापासून कधीही मागे हटलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आज येथे 890 कोटी रुपयांच्या 5 वेगवेगळ्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन संपन्न झाले आहे, असे अमित शाह म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह म्हणाले की आज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशभरातील 70 विमानतळांना आणि 361 महत्त्वपूर्ण संस्थांना संरक्षण पुरावत आहे. याशिवाय ड्रोन सुरक्षेच्या बाबतीत देखील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल एक नोडल संस्थेची भूमिका पार पाडते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल गेले वर्षभर कर्तव्य भवन, सेवा तीर्थ, नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ, लेंगपुई विमानतळ, जवाहरपूर औष्णिक ऊर्जा प्रकल्प, भाक्रा धरण प्रकल्प, आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सुरक्षाव्यवस्थेची धुरा सांभाळत आहे, असे ते म्हणाले.
आता बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारल्यावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, देशातील विशाल सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या बंदरांना देखील सुरक्षित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चार वर्षांपूर्वी आम्ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला हायब्रीड अर्थात मिश्र पद्धतीने एक मॉडेल विकसित करण्यास आणि खाजगी औद्योगिक समूहांना देखील सुरक्षा व्यवस्था पुरवण्याबाबत विचारणा केली होती, जे सर्वात आधुनिक उपकरणांसह तयार केले गेले आहे. येत्या काळात सीआयएसएफ हायब्रिड मोडमध्ये खाजगी औद्योगिक समूहांना देखील सुरक्षा प्रदान करेल असे शाह म्हणाले.
31 मार्च 2026 पर्यंत आपण देशाला नक्षलवादापासून मुक्त करू असा मोदी सरकारचा संकल्प आहे आणि यामध्ये सीआयएसएफचे खूप मोठे योगदान आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. सीआयएसएफने ओदिशा, छत्तीसगढ आणि तेलंगणा मधील नक्षलवादविरोधी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले. 31 मार्च पर्यंत देश नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2236050)
अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam