पंतप्रधान कार्यालय
कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे प्रसिद्धी वक्तव्य
प्रविष्टि तिथि:
02 MAR 2026 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2026
माननीय पंतप्रधान मार्क कार्नी,
उभय देशांचे प्रतिनिधी,
माध्यमांमधील मित्रहो,
नमस्कार!
पंतप्रधान कार्नी यांचे भारतात स्वागत करताना मला आनंद होतो आहे. पंतप्रधान म्हणून त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. आम्ही याला एक महत्त्वाचा टप्पा मानतो.
गेल्या वर्षी कॅनडामध्ये झालेल्या G7 बैठकीत त्यांनी माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे मनापासून स्वागत केले. आज त्याच स्नेहपूर्ण भावनेतून त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळणे, हे माझे सौभाग्य आहे. जगात असे खूप कमी लोक आहेत ज्यांच्या सीव्हीमध्ये दोन देशांमधील मध्यवर्ती बँकांच्या नेतृत्वाचा समावेश आहे.
आमच्या पहिल्या भेटीपासून, आमचे संबंध नवीन ऊर्जा, परस्पर विश्वास आणि सकारात्मकतेने परिपूर्ण आहेत. सहकार्याच्या प्रत्येक क्षेत्रात वाढत्या गतीचे श्रेय मी माझे मित्र पंतप्रधान कार्नी यांना देतो.
मित्रहो,
भारत आणि कॅनडा लोकशाही मूल्यांवर अढळ विश्वास ठेवतात. आम्ही विविधता साजरी करतो. मानवतेचे कल्याण हा आमचा सामायिक दृष्टीकोन आहे. हा दृष्टीकोन आपल्याला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा देतो. आज आम्ही या दृष्टीकोनाचे पुढील स्तरावरील भागीदारीत रूपांतर करण्यावर चर्चा केली.
2030 सालापर्यंत व्यापारात 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे आमचे ध्येय आहे. आर्थिक सहकार्याची पूर्ण क्षमता खुली करणे हे आमचे प्राधान्य आहे. म्हणूनच आम्ही लवकरच व्यापक आर्थिक भागीदारी करार अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये नवीन गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
कॅनडाच्या पेन्शन फंडांनी भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. हे भारताच्या विकासाच्या गाथेवरील त्यांच्या सखोल विश्वासाचे प्रतीक आहे.
आज आपण दोन्ही देशांतील व्यावसायिक नेतृत्वांना ही भेटू. त्यांच्या सूचना आपल्या आर्थिक भागीदारीसाठी आराखडा तयार करतील.
मित्रहो,
तंत्रज्ञान आणि नवोपक्रमात आम्ही नैसर्गिक भागीदार आहोत. कॅनडा आणि भारत नवोपक्रम भागीदारीसह, आमच्या कल्पनांचे रूपांतर जागतिक उपायांमध्ये करू.
मागच्या महिन्यात भारतात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटच्या यशात कॅनडाच्या मौल्यवान योगदानाबद्दल मी पंतप्रधान कार्नी यांचे आभार मानतो. आम्ही एआय, तसेच क्वांटम, सुपरकॉम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टरमध्ये सहकार्य वाढवू.
क्रिटिकल मिनरल्स बाबत आज स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारामुळे लवचिक पुरवठा साखळी मजबूत होतील. अंतराळ क्षेत्रात, आम्ही दोन्ही देशांतील स्टार्टअप्स आणि उद्योगांना परस्परांशी जोडू.
मित्रहो,
पंतप्रधान कार्नी यांच्यासाठी, पर्यावरण हा वेगळा अजेंडा नाही, तर आर्थिक स्थिरतेचा एक भाग आहे. ऊर्जा क्षेत्रात, आम्ही एक अत्याधुनिक भागीदारी तयार करत आहोत, ज्यामध्ये हायड्रोकार्बन, तसेच अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि ऊर्जा साठवणुकीवर विशेष भर दिला जाईल.
कॅनडाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि जागतिक जैवइंधन आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आमच्या सामायिक प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, आम्ही या वर्षी भारत-कॅनडा अक्षय ऊर्जा आणि साठवणूक शिखर परिषद आयोजित करणार आहोत.
नागरी अणुऊर्जेच्या बाबतीत आम्ही दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा करार केला आहे. आम्ही लघु मॉड्यूलर अणुभट्ट्या आणि प्रगत अणुभट्ट्यांवर देखील एकत्र काम करू.
मूल्यवर्धन, कृषी-तंत्रज्ञान आणि शेतीद्वारे अन्न सुरक्षा ही आमची सामायिक प्राधान्ये आहेत. यासाठी भारतात भारत-कॅनडा पल्स प्रोटीन सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले जाईल.
मित्रहो,
संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात वाढणारे सहकार्य हे आमच्या खोल परस्पर विश्वासाचे आणि आमच्या संबंधांच्या परिपक्वतेचे प्रतीक आहे. संरक्षण उद्योग, सागरी क्षेत्र जागरूकता आणि लष्करी देवाणघेवाण वाढवण्यासाठी आम्ही काम करू. या उद्देशाने, आज आम्ही भारत-कॅनडा संरक्षण संवाद स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रहो,
लोकांमधील संबंध हे आपल्या संबंधांचे प्रेरक शक्ती आहेत. आज आपण त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य सेवा, शेती आणि नवोपक्रम क्षेत्रातील अनेक विद्यापीठांमधील नवीन भागीदारी जाहीर होत आहेत. भारतात कॅनेडियन विद्यापीठांचे कॅम्पस उघडण्यावरही आम्ही सहमती दर्शविली आहे.
आदिवासी आणि आदिवासी समुदाय हे आपल्या सामायिक सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यासाठी आज दोन्ही बाजूंनी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
मित्र हो,
हिंद-प्रशांत क्षेत्रात कॅनडा हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. हिंद महासागर रिम असोसिएशन मध्ये संवाद भागीदार बनण्याच्या त्यांच्या स्वारस्याचे आम्ही स्वागत करतो. यामुळे आपले सागरी सहकार्य अधीक दृढ होईल.
दहशतवाद, अतिरेकीपणा आणि कट्टरतावाद हे केवळ आपल्या दोन्ही देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी सामान्य आणि गंभीर आव्हाने आहेत, यावर आम्ही सहमत आहोत. त्यांच्याविरुद्ध आमचे निकटतम सहकार्य जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहे.
जगात सुरू असलेल्या अनेक तणावांवर भारताची भूमिका स्पष्ट राहिली आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थिरता राखण्याचे आवाहन केले आहे. आणि जेव्हा दोन लोकशाही एकत्र येतात तेव्हा शांतीचा आवाज आणखी मजबूत होतो.
पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती आमच्यासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीद्वारे सर्व वाद सोडवण्यास भारत पाठिंबा देतो. या प्रदेशातील सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व देशांसोबत काम करत राहू.
आदरणीय महोदय,
आपल्या या भेटीमुळे आमच्या सहकार्याच्या प्रत्येक क्षेत्राला नवीन बळ मिळाले आहे. भारताप्रती आपल्या दृढ वचनबद्धतेबद्दल आणि दृष्टिकोनाबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनापासून अभिनंदन करतो.
अनेकानेक आभार.
अंबादास यादव/माधुरी पांगे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2234873)
आगंतुक पटल : 48
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam