इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय एआय पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी भारत सध्याच्या 38,000 जीपीयू व्यतिरिक्त आणखी 20,000 जीपीयूची भर घालेल ; इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा
भारताची एआय रणनीती पंतप्रधान मोदींचा तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याचा दृष्टिकोन दर्शवते :वैष्णव
पुढील दोन वर्षांत एआयमध्ये 200 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित
सार्वभौम एआय मॉडेल जागतिक मानकांना अनुरूप असून अव्वल तीन एआय राष्ट्रांमध्ये गणले जाते
एआयचा गैरवापर रोखण्यासाठी भारताची एआय सुरक्षा संस्था शैक्षणिक संस्थांसोबत काम करत आहे - केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
Posted On:
17 FEB 2026 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या दुसऱ्या दिवशी घोषणा केली की, येत्या काही दिवसांमध्ये भारत 20,000 जीपीयूची भर घालून आपली कंप्युटिंग क्षमता सध्याच्या 38,000 जीपीयूपेक्षा अधिक वाढवेल. त्यांनी अधोरेखित केले की, हा भारताच्या एआय रणनीतीचा पुढचा टप्पा आहे, ज्यामध्ये कंप्युटिंग पायाभूत सुविधांचा लक्षणीय विस्तार आणि जबाबदार एआय तैनातीवर लक्ष केंद्रित केले जाईल.

शिखर परिषदेत माध्यमांना संबोधित करताना, मंत्र्यांनी पुनरुच्चार केला की सर्वांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आरोग्यसेवा आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये जबाबदार एआय विकास आणि व्यापक तैनाती यावर लक्ष केंद्रित केले आहे .
वैष्णव यांनी भर दिला की भारताची एआय रणनीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करते. इतर अनेक देशांमध्ये एआय पायाभूत सुविधा काही कंपन्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात,त्याउलट भारताने आपल्या बहुतांश लोकसंख्येला एआय कम्प्युटिंग पर्यंत पोहोच प्रदान केली आहे.

या संवादाला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन; आणि इंडियाएआय मिशनचे सीईओ अभिषेक सिंह उपस्थित होते.
16–20 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे होत असलेल्या या शिखर परिषदेत राष्ट्रप्रमुख , मंत्री, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज , संशोधक, बहुपक्षीय संस्था, उद्योजक , स्टार्टअप्स आणि विद्यार्थी एकत्र आले आहेत.
मंत्र्यांनी शिखर परिषदेत जागतिक स्तरावरील उत्साही सहभाग अधोरेखित केला , ज्यामध्ये वरिष्ठ अधिकारी सुमारे 20 सत्रे आयोजित केली आणि जागतिक एआय नेत्यांची वचनबद्धता दर्शवली. संपूर्ण टीम जगातील सर्वात मोठ्या एआय शिखर परिषदेचे आयोजन करण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे असे त्यांनी नमूद केले.
वैष्णव यांनी गुंतवणुकीच्या संधींबद्दल आशावाद व्यक्त करत सांगितले की पुढील दोन वर्षांमध्ये 200 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. त्यांनी डीप-टेक स्टार्टअप्सप्रति व्हेंचर कॅपिटल फर्म्सच्या वचनबद्धतेचा उल्लेख केला . ते म्हणाले की एआय स्टॅकच्या पाचही स्तरांमध्ये गुंतवणूक येत आहे. त्यांनी सांगितले की व्हेंचर कॅपिटल फर्म्स आणि इतर कंपन्या मोठ्या उपायांसाठी आणि प्रमुख अनुप्रयोगांसाठी निधी पुरवण्यास तयार आहेत.
वैष्णव म्हणाले की आयटी उद्योग ही भारताच्या सर्वात मोठ्या ताकदींपैकी एक आहे आणि प्रत्येक तंत्रज्ञान संक्रमण उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकार यांनी संयुक्तपणे व्यवस्थापित केले पाहिजे. सध्या तीन आघाड्यांवर काम सुरू आहे: विद्यमान कर्मचाऱ्यांचा कौशल्य विकास आणि उन्नयन , नवीन प्रतिभेचा विकास आणि भविष्यातील पिढ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी तयार करणे. हे तिन्ही प्रयत्न समांतरपणे प्रगती करत आहेत.
ऊर्जा क्षमतेचा उल्लेख करत मंत्र्यांनी नमूद केले की भारत अशा दुर्मिळ देशांमधील एक आहे जिथे 50 टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे 51 टक्के वीज निर्मिती क्षमता स्वच्छ स्रोतांमधून येते, सध्या जी देशासाठी एक महत्त्वपूर्ण लाभ आहे. ते पुढे म्हणाले की तीन वर्षांपूर्वी सुरू केलेला फ्युचर स्किल्स प्रोग्राम आता एआय-आधारित कौशल्य विकासासाठी लागू केला जात आहे. शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीई हे अभ्यासक्रम सुधारण्यावर काम करत आहेत जेणेकरून नवीन प्रतिभा उदयाला येत राहील आणि तरुणांना नवीन संधी मिळतील.
भारताच्या स्वदेशी एआय प्रारूपांबद्दल बोलताना मंत्रिमहोदय म्हणले, की या शिखरपरिषदेत एआय प्रारूपे सादर करण्याआधी अनेक निकषांवर आधारित त्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय एआय यंत्रणांच्या तुलनेत भारताच्या प्रारूपांना अधिक चांगले मानांकन मिळाले असून यामधून भारताच्या नवोपक्रम क्षमता अधोरेखित झाल्या आहेत. स्टॅनफर्ड ने देखील जागतिक स्तरावरील सर्वोच्च तीन एआय देशांमध्ये भारताचा समावेश केल्याचे त्यांनी नमूद केले.
भावी काळात एआय चा चुकीचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेत माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी एआय चा गैरवापर कमीतकमी व्हावा व त्याचा जास्तीत जास्त वापर कल्याणकारी उद्दिष्टांसाठी व्हावा यासाठी तांत्रिक-कायदेशीर दृष्टिकोन महत्वाचा असल्याचे अधोरेखित केले. यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांसोबतच नियामक यंत्रणेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने यासाठी ‘एआय सुरक्षा संस्था’ या आभासी संस्थेची स्थापना केली असून ही संस्था एआयचा गैरवापर थांबवण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांच्या साहाय्याने तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांची आखणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थव्यवस्थेच्या व समाजाच्या प्रत्येक क्षेत्राला एआय ने व्यापून टाकले असून त्यामुळे पाचवी औद्योगिक क्रांती सुरु होत असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. शिखर परिषदेत प्रदर्शित केलेल्या आरोग्यसेवांशी संबंधित उपाययोजनांमुळे त्या सर्वांना रास्त दरात उपलब्ध होऊ शकतील, तर शैक्षणिक क्षेत्रातील उपाययोजनांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवश्यकतेनुसार शिक्षण घेण्यास मदत मिळेल असे ते म्हणाले.
चिप विकासाबद्दल बोलताना मंत्रिमहोदयांनी सेमीकंडक्टर मिशनबद्दल भारताच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले. सेमीकंडक्टर मिशन 2.0 मध्ये आरेखनावर भर दिला जाईल असे त्यांनी सांगितले. सध्या सुरु असलेल्या नवोपक्रम व विकास प्रयत्नांमुळे येत्या काही वर्षांमध्ये भारतात किमान 50 डीप टेक स्टार्टअप्स सुरु होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
शाश्वत विकासाबद्दल बोलताना मंत्रिमहोदयांनी एआय डेटा केंद्रांसाठी हरित व स्वच्छ ऊर्जेचा वापर केला जाणार असल्याचे अधोरेखित केले. त्यासोबतच, ऊर्जा व पाण्याची बचत व्हावी म्हणून सुरु असलेल्या संशोधनाचाही त्यांनी उल्लेख केला. उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे एआय पायाभूत सुविधांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेत किमान 35 टक्के बचत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी अडीच लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी एआयचा वापर सकारात्मक नवोपक्रमांसाठी करण्याची प्रतिज्ञा घेतली असून याची नोंद गिनीज विश्वविक्रमामध्ये होण्यासाठी आवेदन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
एआय चा विकास सकारात्मक व जबाबदार भावनेने व्हावा, नवोपक्रमाला चालना मिळावी, व समाजाला फायदा होण्याच्या दृष्टीने त्याचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये व्हावा यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे अधोरेखित करत मंत्रिमहोदयांनी भाषणाचा समारोप केला.
शैलेश पाटील/सुषमा काणे/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229346)
अभ्यागत कक्ष : 5