पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया
Posted On:
01 FEB 2026 3:19PM by PIB Mumbai
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार.
आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे; यातून देशातील महिलांच्या शक्तीचे सशक्त प्रतिबिंब झळकते. महिला अर्थमंत्री म्हणून निर्मलाजींनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा अर्थसंकल्प अफाट संधींचा राजमार्ग आहे. हा अर्थसंकल्प वर्तमानातील स्वप्ने साकार करतो आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करतो. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकसित भारताच्या दिशेने उंच भरारीचा एक मजबूत पाया आहे.
मित्रांनो,
आज भारत ज्या रिफॉर्म एक्सप्रेसवर स्वार आहे त्याला या अर्थसंकल्पातून नवीन ऊर्जा, नवीन गती मिळेल. ज्या पथदर्शी सुधारणा करण्यात आल्या आहेत त्या आकांक्षांनी भरलेल्या भारतातील धाडसी आणि प्रतिभावान युवकांना मोकळे आकाश उपलब्ध करून देतात. हा अर्थसंकल्प विश्वासावर आधारित शासन आणि मानवकेंद्रित अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करतो. हा एक वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प आहे, ज्यामध्ये वित्तीय तूट कमी करणे, महागाई नियंत्रित करणे यावर भर आहे आणि यासोबतच, अर्थसंकल्पात उच्च भांडवली खर्च आणि उच्च वाढीचा समन्वय देखील आहे.
मित्रांनो,
हा अर्थसंकल्प भारताची जागतिक भूमिका पुन्हा सशक्त करतो. भारताचे 140 कोटी नागरिक केवळ सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनून समाधानी नाहीत. आपल्याला लवकरात लवकर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायचे आहे. हा कोट्यवधी देशवासीयांचा संकल्प आहे. जगाचा 'विश्वसनीय लोकशाही भागीदार' आणि 'विश्वसनीय गुणवत्ता पुरवठादार' म्हणून भारताची भूमिका सातत्याने वाढत आहे. भारताने अलिकडेच स्वाक्षरी केलेल्या प्रमुख व्यापार करारांचा, सर्व करारांची जननी असलेल्या करारांचा जास्तीत जास्त फायदा भारतातील युवकांना, भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांना मिळावा या दिशेने या अर्थसंकल्पात मोठी पावले उचलण्यात आली आहेत.
मित्रांनो,
या अर्थसंकल्पात, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला नवी गती देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात नवीन उदयोन्मुख उद्योग म्हणजेच सनराईज क्षेत्रांना जे भक्कम समर्थन देण्यात आले आहे ते अभूतपूर्व आहे. बायोफार्मा शक्ति मिशन, सेमीकंडक्टर मिशन 2.0, इलेक्ट्रॉनिक सुटे भाग निर्मिती योजना, रेयर अर्थ कॉरिडोरचे बांधकाम , महत्वपूर्ण खनिजांवर भर , वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी नवी योजना , उच्च तंत्रज्ञानाच्या साधनांच्या निर्मितीला प्रोत्साहन , चॅम्पियन एमएसएमई तयार करणे , हे भविष्यवेधी आहे, आणि देशाच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजांचा यात विचार केला आहे. एमएसएमईना , आपल्या लघु आणि कुटीर उद्योगांना जे समर्थन या अर्थसंकल्पात मिळाले आहे ते त्यांना लोकल ते ग्लोबल बनण्याची नवी ताकद देईल.
मित्रांनो,
पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक मोठी पावले उचलण्यात आली आहेत:
-
समर्पित मालवाहतूक मार्गिका
-
देशभरात जलमार्गांचा विस्तार
-
अतिजलद रेल्वे कॉरिडोर
-
श्रेणी -2 आणि श्रेणी -3 शहरांच्या विकासावर विशेष ध्यान आणि शहरांना मजबूत आर्थिक आधार देण्यासाठी म्युनिसिपल बॉण्ड्सना प्रोत्साहन, या सर्व उपाययोजना विकसित भारताच्या दिशेने प्रवासाला आणखी गती देतील.
मित्रांनो,
कोणत्याही देशाचे सर्वात मोठे भांडवल हे तेथील नागरिक असतात. गेल्या काही वर्षांमध्ये, आपल्या सरकारने देशातील नागरिकांची क्षमता वाढवण्यात अभूतपूर्व गुंतवणूक केली आहे. कौशल्य, प्रमाण आणि शाश्वततेला निरंतर बळ देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. निर्मलाजी यांनी आज संसदेत म्हटल्याप्रमाणे, हा युवा शक्तीचा अर्थसंकल्प आहे. यात युवकांचे विचार, युवकांची स्वप्ने, युवकांचा संकल्प आणि युवकांचा वेग देखील आहे. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींमुळे विविध क्षेत्रांमध्ये आघाडीचे नेतृत्व, नवोन्मेषक आणि निर्माते तयार होतील. वैद्यकीय केंद्रांची निर्मिती, सहयोगी आरोग्य व्यावसायिकांच्या माध्यमातून ऑरेंज इकॉनॉमी (म्हणजेच ऑडिओ-व्हिज्युअल आणि गेमिंग) ला प्रोत्साहन देऊन, पर्यटनाला प्रोत्साहन देऊन आणि खेलो इंडिया मिशनद्वारे, युवकांसाठी नवीन संधींची कवाडे खुली होतील. भारताला जगाचे डेटा सेंटर हब बनवण्यासाठी मोठी कर सवलत देखील जाहीर करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पासाठी मी भारतातील युवकांचे खास अभिनंदन करतो कारण यामुळे रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल. या अर्थसंकल्पात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी, विशेषतः ईशान्य प्रदेशात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी, ठोस पावले उचलण्यात आली आहेत याचा मला खूप आनंद आहे. भारतातील विविध राज्यांना शक्तिशाली बनवून संतुलित विकासाचा पायाही या अर्थसंकल्पात मजबूत करण्यात आला आहे.
मित्रांनो,
आपल्या देशातील 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत आणि ही एक अतिशय यशस्वी मोहीम ठरली आहे. महिलांद्वारे निर्मित, महिलांद्वारे संचालित बचत गटांची आधुनिक परिसंस्था निर्माण करण्याला अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक घरात देवी लक्ष्मीचे आगमन व्हावे हा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृहे बांधण्याचे अभियान शिक्षण सुलभ बनवेल.
मित्रांनो,
आमच्या सरकारने नेहमीच भारतातील शेती, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या अर्थसंकल्पातही नारळ, काजू, कोको आणि चंदनाच्या उत्पादनाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. 'भारत विस्तार एआय' हे साधन शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत माहिती मिळवण्यास खूप मदत करेल. मत्स्यव्यवसाय आणि पशुपालनात उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गावांमध्येच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील.
मित्रांनो,
हा अर्थसंकल्प महत्त्वाकांक्षी देखील आहे आणि तो देशाच्या आकांक्षांनाही बळ देतो. पुन्हा एकदा, मी निर्मला जी आणि त्यांच्या टीमचे या भविष्याभिमुख अर्थसंकल्पासाठी, संवेदनशील अर्थसंकल्पासाठी आणि गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करणाऱ्या अर्थसंकल्पासाठी मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद.
***
NehaKulkarni/SushamaKane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2221982)
अभ्यागत कक्ष : 50
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam