राष्ट्रपती कार्यालय
स्पेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, युरोपियन संघ आणि सहकार्य मंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026
स्पेनचे परराष्ट्र व्यवहार, युरोपियन संघ आणि सहकार्य मंत्री महामहिम जोस मॅन्युएल अल्बारेस यांनी आज (21 जानेवारी 2026) राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

राष्ट्रपती भवनात अल्बारेस यांचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत आणि स्पेनमधील संबंध अनेक शतकांपासून चालत आले आहेत, जे व्यापार, संस्कृती आणि लोकशाही व बहुलवादाच्या सामायिक मूल्यांनी समृद्ध आहेत. त्यांनी नमूद केले की यावर्षी आपल्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असून 'भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम प्रज्ञा, असे दुहेरी वर्ष' म्हणून साजरे केले जात आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत आणि स्पेनमधील आर्थिक संबंध सातत्याने वाढत आहेत, त्याचबरोबर व्यापार आणि गुंतवणूक देखील वाढत आहे. अभियांत्रिकी, रेल्वे, नवीकरणीय ऊर्जा, शहरी सेवा आणि संरक्षण अवकाश क्षेत्रातील स्पेनची ताकद भारताच्या विकास प्राधान्यांना पूरक आहे ,असे त्या म्हणाल्या. भारत - युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंध आणखी मजबूत होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, बहुपक्षवादाचे कट्टर अनुयायी म्हणून, भारत आणि स्पेनने जगभरात शांतता, समृद्धी आणि स्थैर्य या आपल्या सामायिक उद्दिष्टांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि जी-20 सारख्या बहुपक्षीय व्यासपीठांवर एकत्र काम केले पाहिजे.
जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी गंभीर धोका असलेल्या दहशतवादाच्या संकटाचा सामना करण्याबाबत भारत आणि स्पेनची समान भूमिका असल्याचे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाशी एकत्रितपणे लढण्यासाठी आपण आपली संसाधने आणि क्षमता एकत्रित केल्या पाहिजेत असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताचे युरोप आणि युरोपियन युनियनशी संबंध सातत्याने वाढत आहेत आणि आमच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष यांचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वागत करण्यास उत्सुक आहोत.
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216998)
आगंतुक पटल : 15