पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे 3,250 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली


आज भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे, भारतात वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू केल्या जात आहेत: पंतप्रधान

ही देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे, जी माता कालीच्या भूमीला माता कामाख्याच्या भूमीशी जोडते; येत्या काळात ही आधुनिक रेल्वेगाडी संपूर्ण देशात विस्तारणार आहे; या आधुनिक स्लीपर ट्रेनबद्दल मी बंगाल, आसाम आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो: पंतप्रधान

आज बंगालला आणखी चार आधुनिक अमृत भारत एक्सप्रेस गाड्या मिळाल्या आहेत; न्यू जलपायगुडी - नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस, न्यू जलपायगुडी - तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस, अलीपूरद्वार - बेंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस, अलीपूरद्वार - मुंबई अमृत भारत एक्सप्रेस; यामुळे बंगालचा आणि विशेषतः उत्तर बंगालचा, दक्षिण आणि पश्चिम भारताशी असलेला संपर्क आणखी मजबूत होईल: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 17 JAN 2026 3:23PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे 3,250 कोटी रुपयांच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. याचा उद्देश पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील प्रदेशातील संचारसंपर्क मजबूत करणे तसेच विकासाला गती देणे हा आहे. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, आज मालदा येथून पश्चिम बंगालच्या प्रगतीला गती देण्याच्या मोहिमेला आणखी वेग आला आहे. त्यांनी अधोरेखित केले की, पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे नुकतेच उद्घाटन करून ते राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की, पश्चिम बंगालसाठी नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. हे प्रकल्प लोकांचा प्रवास सुलभ करतील, तसेच व्यापार आणि वाणिज्य सुलभ करतील. त्यांनी यावर जोर दिला की, येथे स्थापन करण्यात आलेल्या नवीन रेल्वे देखभाल सुविधांमुळे बंगालच्या तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील. 

बंगालच्या पवित्र भूमीतून भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले गेले आहे, असे अधोरेखित करत मोदी यांनी सांगितले की, आजपासून भारतात वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू केल्या जात आहेत. ही नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन नागरिकांचा लांबचा प्रवास अधिक आरामदायी आणि शानदार बनवेल, असे ते म्हणाले. विकसित भारतातील रेल्वे कशा असाव्यात, ही दूरदृष्टी या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये स्पष्टपणे दिसून येते, यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधान म्हणाले की थोड्या वेळापूर्वी त्यांनी मालदा स्थानक येथे काही प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाने या गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव अवर्णनीय होता अशा भावना व्यक्त केल्या. पूर्वीच्या काळी लोक परदेशातील रेल्वे गाड्यांची चित्रे बघताना अशा गाड्या भारतात असल्या पाहिजेत अशी इच्छा व्यक्त करत याचे स्मरण करत ते म्हणाले की आज हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. मोदी म्हणाले की अलीकडच्या काळात भारतीय रेल्वेमध्ये कशा प्रकारे क्रांती घडून येत आहे याचे व्हिडीओ परदेशी पर्यटक बनवत आहेत. भारतीयांचे कठोर परिश्रम आणि निष्ठेसह या वंदे भारत गाड्या भारतात निर्माण करण्यात येत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर गाडी कालीमातेच्या भूमीला माता कामाख्या हिच्या भूमीशी जोडत आहे हे मोदी यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की येत्या काळात, या आधुनिक रेल्वेच्या सेवेचा विस्तार देशभरात होईल. या आधुनिक स्लीपर रेल्वे गाडीची सेवा सुरु झाल्याबद्दल त्यांनी आसाम आणि बंगाल राज्याचे तसेच संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले की रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आणि स्थानकांचे आधुनिकीकरण यांसह भारतीय रेल्वेमध्ये परिवर्तन घडून येत आहे. आजघडीला पश्चिम बंगालसह देशभरात 150 हून अधिक वंदे भारत गाड्यांचे परिचालन सुरु आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान म्हणाले की, याबरोबरच देशात आधुनिक आणि अधिक वेगवान रेल्वे गाड्यांचे जाळे विकसित करण्यात येत असून याचा मोठा लाभ बंगालमधील गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना होत आहे. पश्चिम बंगाल राज्यात न्यू जलपायगुडी-नागरकोईल अमृत भारत एक्स्प्रेस, न्यू जलपायगुडी-तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्स्प्रेस, अलीपूरद्वार-बेंगळूरू अमृत भारत एक्स्प्रेस आणि अलीपूरद्वार-मुंबई अमृत भारत एक्स्प्रेस अशा आणखी चार अमृत भारत रेल्वे गाड्यांची सेवा सुरु झाली आहे अशी घोषणा त्यांनी केली. या गाड्या बंगालमधील, विशेषतः बंगालच्या उत्तर भागातील तसेच देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील संपर्क जोडणी व्यवस्था बळकट करतील यावर त्यांनी अधिक भर दिला. गंगासागर, दक्षिणेश्वर आणि कालीघाट येथे भेट देणाऱ्या भाविकांसाठी तसेच तामिळनाडू आणि महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी या अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या अधिक सुलभ प्रवासाची सोय करून देतील.

भारतीय रेल्वे गाड्यांची इंजिने, डबे आणि मेट्रो रेल्वेचे डबे आता भारतातील तंत्रज्ञानाचे प्रतीक ठरत आहेत हे अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतीय रेल्वे केवळ आधुनिक नव्हे तर स्वावलंबी देखील होत आहे.”ते म्हणाले की, आज अमेरिका आणि युरोपपेक्षा भारत जास्त रेल्वेगाड्यांचे उत्पादन करत आहे आणि अनेक देशांना प्रवासी रेल्वे तसेच मेट्रो रेल्वेचे डबे निर्यात करत आहे आणि याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होता असून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत.

भारतातील सर्व भागांना एकमेकांशी जोडणे आणि दोन जागांमधील अंतरे कमी करणे ही एक मोहीम आहे आणि तिचे आजच्या कार्यक्रमात स्पष्ट दर्शन घडले आहे हे अधिक ठामपणे सांगत पंतप्रधान मोदी यांनी भाषण संपवले.

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस आणि अश्विनी वैष्णव, शंतनू ठाकूर, सुकांत मजुमदार या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदा टाऊन रेल्वे स्थानकाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी हावडा आणि गुवाहाटी (कामाख्या) दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर  या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. याचसोबत त्यांनी गुवाहाटी (कामाख्या) – हावडा या मार्गावरील वंदे भारत स्लीपर या रेल्वेगाडीला देखील आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. आधुनिक भारताच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी ही पूर्णपणे वातानुकूलित असलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवा सुरु केली गेली आहे. यामुळे प्रवाशांना किफायतशीर दरात विमान प्रवासासारखा अनुभव मिळू शकणार आहे. या गाडीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. या रेल्वेसेवेमुळे हावडा – गुवाहाटी (कामाख्या) मार्गावरील प्रवासाचा वेळ सुमारे 2.5 तासांनी कमी होणार असल्याने, धार्मिक गोष्टींसाठीचा प्रवास आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील चार मोठ्या रेल्वे प्रकल्पांचीही पायाभरणी केली. यात बालूरघाट आणि हिली दरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग, न्यू जलपायगुडी इथे नेक्स्ट जनरेशन मालवाहतूक देखभाल सुविधा , सिलिगुडी लोको शेडचे आधुनिकीकरण आणि जलपायगुडी जिल्ह्यात वंदे भारत ट्रेन देखभाल सुविधांच्या आधुनिकीकरणाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे प्रवासी आणि मालवाहतूक विषयक क्रिया प्रक्रियांना अधिक बळकटी मिळणार आहे, बंगालच्या उत्तरेकडील भागांमधील व्यावसायिक दळणवळणीय कार्यक्षमता सुधारणार आहे, तसेच या प्रदेशात रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत.

पंतप्रधानांनी न्यू कूचबिहार – बामनहाट आणि न्यू कूचबिहार – बशीरहाट दरम्यानच्या रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम राष्ट्राला समर्पित केले. यामुळे रेल्वे सेवा अधिक वेगवान, स्वच्छ आणि ऊर्जाक्षम होण्याला मदत होणार आहे.

पंतप्रधानांनी 4 नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. यात न्यू जलपायगुडी – नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस, न्यू जलपायगुडी – तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस, अलीपुरद्वार – एसएमव्हीटी (SMVT) बेंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस, अलीपुरद्वार – मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस यांचा समावेश आहे. यामुळे किफायतशीर तसेच विश्वासार्ह स्वरुपातील लांब पल्ल्याची रेल्वे दळणवळणीय जोडणी वाढणार आहे. या सेवा सुविधांमुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी, स्थलांतरित मजूर आणि व्यापाऱ्यांच्या प्रवासविषयक गरजांना मोठे पाठबळ लाभणार आहे, तसेच आंतरराज्यीय आर्थिक आणि सामाजिक संबंधही अधिक दृढ होऊ शकणार आहेत.

पंतप्रधानांनी एलएचबी  डबे असलेल्या दोन नवीन रेल्वे सेवांनाही हिरवा झेंडा दाखवला. यात  राधिकापूर – एसएमव्हीटी (SMVT) बेंगळुरू एक्सप्रेस, बालूरघाट – एसएमव्हीटी (SMVT) बेंगळुरू एक्सप्रेस या सेवांचा समावेश होता. या गाड्यांमुळे या भागातील युवा वर्ग, विद्यार्थी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांना बेंगळुरूसारख्या महत्त्वाच्या माहिती तंत्रज्ञान आणि रोजगार केंद्रांशी थेट, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग-31D वरील धुपगुडी – फालाकाटा विभागाच्या पुनर्वसन आणि चौपदरीकरणाच्या कामाचीही पायाभरणी केली. हा रस्ते क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रकल्प असून, यामुळे प्रादेशिक रस्ते जोडणीत सुधारणा घडून येईल, तसेच उत्तर बंगालमधील प्रवासी आणि मालवाहतूक अधिक सुलभ होईल.

हे प्रकल्प आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मिती आणि सुधारित दळणवणीय जोडणीच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतील. या प्रकल्पांमुळे भारताचा पूर्व भाग तसेच ईशान्य भारताला देशाच्या विकासाचे मुख्य इंजिन म्हणून अधिक बळकटी मिळणार आहे.

***

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/संजना चिटणीस/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2215648) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam