माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने ‘नेटफ्लिक्स’ च्या सहयोगाने आयोजित केला 'इन्स्पायरिंग इनोव्हेटर्स'कौशल्य उपक्रम


आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून कौशल्य विकास उपक्रमांतर्गत भारताच्या उदयोन्मुख नवोन्मेष परिसंस्थेचा परिचय घडवणाऱ्या आठ लघुपटांची निर्मिती

प्रविष्टि तिथि: 13 JAN 2026 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2026

माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय (पीएसए) यांनी नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटीच्या सहयोगाने आयोजित केलेल्या ‘इन्स्पायरिंग इनोवेटर्स- नये भारत की नयी पहेचान’, या कौशल्य विकास उपक्रमाचा आज समारोप झाला. ग्राफिटी स्टुडिओजच्या भागीदारीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाने कथाकथन आणि प्रत्यक्ष कौशल्य विकासाच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या नवोन्मेष आणि सृजनशील परिसंस्थेला एकत्र आणले.

या उपक्रमात सामाजिक-प्रभाव पडणाऱ्या नवोन्मेशाला चालना देणाऱ्या, पीएसए कार्यालयाने निवड केलेल्या आठ भारतीय स्टार्ट-अप्सचे योगदान प्रदर्शित करण्यात आले. भारतातील आठ विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आठ ॲनिमेटेड लघुपटांच्या माध्यमातून या स्टार्ट अप्सची माहिती देण्यात आली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, चितकारा विद्यापीठ, सत्यजित रे इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आणि इतर काही विद्यापीठांचा यात समावेश होता. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) च्या सहकार्याने नेटफ्लिक्सने सुरू केलेल्या ‘व्हॉइसबॉक्स’ या कौशल्य विकास उपक्रमातील सहभागींनी चित्रपटांसाठी व्हॉइसओव्हर ध्वनीमुद्रित केले होते.

नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटी अंतर्गत कथाकथन आणि कौशल्य आधारित कार्यक्रम म्हणून तयार करण्यात आलेल्या या उपक्रमाने भारताच्या विविध भागांमधील 26 विद्यार्थ्यांना सृजनशीलतेचा प्रत्यक्ष अनुभव दिला. सहभागींपैकी पन्नास टक्के महिला होत्या, तर  अनेक विद्यार्थी टियर- II शहरांमधून आले होते. विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी), आणि ग्राफिटी स्टुडिओजच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले, त्यामुळे त्यांना उद्योग प्रक्रियेचा व्यावहारिक, वास्तविक-जगातील अनुभव मिळाला.

शंकर महादेवन अकादमीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मूळ गीत सादर केले, आणि कार्यक्रमाला सांस्कृतिक आणि सर्जनशील आयाम दिला.

कार्यक्रमाला संबोधित करताना माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन म्हणाले की, भारताच्या कथाकथनाच्या समृद्ध परंपरेत रुजलेल्या आपल्या निर्मात्यांना आज भारतीय कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. बौद्धिक संपदेची चौकट मजबूत करण्यासाठी आणि भविष्यासाठी सज्ज सर्जनशील परिसंस्था निर्माण  करण्यासाठी सुरू असलेल्या सरकारच्या प्रयत्नांचे या उपक्रमाला पाठबळ मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून, भारतात निर्मिती करण्याची आणि जगासाठी निर्मिती करण्याची हीच योग्य वेळ असून, या ठिकाणी आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयाला येत आहेत. कथाकथन, निर्माते आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाद्वारे आकाराला आलेल्या नव्या युगात प्रवेश करत असताना, ‘इन्स्पायरिंग इनोव्हेटर्स’ सारखे उपक्रम समाजाच्या सेवेसाठी सर्जनशीलतेचा वापर कसा करता येईल, यावर प्रकाश टाकतात.

कार्यक्रमाला संबोधित करताना भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद म्हणाले की, इन्स्पायरिंग इनोव्हेटर्सची रचना सामाजिक संदर्भ असलेल्या नवोपक्रमांना अधोरेखित करण्यासाठी आणि त्याच बरोबर कौशल्ये आणि ज्ञानाचा मार्ग बळकट करण्यासाठी केली आहे. स्टार्ट-अप्स आणि विद्यार्थ्यांना सर्जनशील प्रक्रियेद्वारे एकत्र आणून आणि नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटी आणि इंडस्ट्री मेंटरशिपद्वारे कौशल्य विकास करून, हा कार्यक्रम भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेच्या उभारणीसाठी समग्र दृष्टीकोन प्रतिबिंबित करत आहे, आणि धोरणात्मक हेतूंना प्रतिभा विकास आणि वास्तविक जगातील प्रयोगाशी जोडत आहे.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले, “भारत लक्षणीय नवोन्मेष अनुभवत आहे, हे अनेकदा सामाजिक नवोन्मेषकांद्वारे चालवले जातात, जे प्रभावी आणि उद्देश-आधारित उपायांद्वारे दैनंदिन आव्हाने सोडवतात. नेटफ्लिक्सने भारतात एक दशक पूर्ण केले असून 'इन्स्पायरिंग इनोव्हेटर्स' च्या रूपाने एक असे शक्तिशाली उदाहरण समोर ठेवले आहे की कथाकथन हे आशय निर्मितीच्या पलीकडे जाऊन एक अर्थपूर्ण कौशल्य विकास आणि सक्षमीकरण मंचात कसे विकसित होऊ शकते. यामुळे देशभरातील युवा प्रतिभेचा आत्मविश्वास आणि व्यावसायिकता दिसून येते. हे खऱ्या अर्थाने क्रिएटर्स  आणि कथाकथनाचे युग आहे आणि आपण एआय-आधारित कथनांनी  आकारलेल्या युगात प्रवेश करत असताना, पुढील पिढीसाठी वाढ आणि प्रगती सक्षम करणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. भारताशी संबंधित, उद्देश-आधारित कथा दूरवरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत हे पाहून आनंद होतो.”

नेटफ्लिक्स इंडियाच्या जागतिक व्यवहार संचालक महिमा कौल म्हणाल्या, “नेटफ्लिक्समध्ये आम्ही भारतातील युवा आणि उत्साही सर्जनशील परिसंस्थेच्या कौशल्य विकासासाठी तसेच कौशल्यवृद्धीसाठी कटिबद्ध आहोत. ‘इन्स्पायरिंग इनोव्हेटर्स’ हा कार्यक्रम वास्तववादी सामाजिक मूल्य असणाऱ्या नाविन्याला ओळख देण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.”

मंथन-सक्षम नवोन्मेष कथा

मंथन हे एक राष्ट्रीय डिजिटल आधारस्तंभ म्हणून काम करते, जे उच्च-प्रभावशाली नवोन्मेषांचा वेध घेऊन त्यांचे संकलन करते आणि त्यांना विस्ताराच्या संधींशी जोडते. मंथन मंचाद्वारे आठ सामाजिक नवोन्मेष स्टार्ट-अप्स शोधले गेले आणि त्यांना पाठिंबा देण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रदर्शित केलेले आठ चित्रपट खालीलप्रमाणे आहेत:

1. निओमोशन

हे असे नवोन्मेषक आहेत जे सानुकूलित व्हीलचेअर्स आणि गतिशीलता उपाय तयार करतात, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्रपणे फिरता येते आणि सन्मानपूर्वक उपजीविका मिळवता येते.

2. ब्लाइंड व्हिजन फाउंडेशन

हे एआय-शक्तीवर चालणारे स्मार्ट चष्मे सादर करते, जे दृष्टिहीन व्यक्तींना वाचण्यास, मार्ग शोधण्यास, चेहरे ओळखण्यास आणि आत्मविश्वासाने स्वतंत्रपणे जीवन जगण्यास सक्षम करतात.

3. हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेस (इनॉमेशन)

घशाच्या कर्करोगातून वाचलेल्यांना स्वरयंत्र काढून टाकल्यानंतर भाषण, प्रतिष्ठा आणि उपजीविका पुनर्संचयित करणाऱ्या, परवडणाऱ्या दरातील आवाजाच्या कृत्रिम अवयवाची कहाणी सांगते.

4. इनोगल

भारताच्या नील अर्थव्यवस्थेसाठी सागरी सुरक्षा, जलशेतीची उत्पादकता, महासागर सुरक्षा आणि आपत्ती निरीक्षणात सुधारणा करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पाण्याखालील तंत्रज्ञानावर भर देते.

5. कल्टिव्हेट

हे स्वायत्त, एआय-आधारित सिंचन प्रणाली दर्शवते, जे शेतकऱ्यांना पाणी वाचवण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी आणि हवामान-अनुकूल अचूक शेती पद्धती अवलंबण्यास मदत करते.

6. वीव्हॉइस लॅब्स

तंत्रज्ञानावर आधारित कचरा व्यवस्थापनाची गाथा, जे विलगीकरण, पुनर्वापर, सन्मानजनक स्वच्छता कार्य आणि चक्रीय अर्थव्यवस्था उपायांद्वारे शहरांमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे.

7. ग्रीनजिन पर्यावरणीय तंत्रज्ञान

सूक्ष्म शैवाल-आधारित कार्बन कॅप्चर नवकल्पनांचा शोध घेते ज्यामुळे औद्योगिक उत्सर्जन कमी होते आणि त्याचबरोबर कर्ब वायूचे मौल्यवान जैव-संसाधनांमध्ये शाश्वतरीत्या रूपांतर केले जाते.

8. एलसीबी फर्टिलायझर्स

हे कृषी आणि औद्योगिक कचऱ्याचे बायो-नॅनो खतांमध्ये रूपांतर करून जमिनीचे आरोग्य, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि शाश्वत शेतीमध्ये सुधारणा दर्शवते.

हे आठ चित्रपट नेटफ्लिक्स इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.   Netflix India’s YouTube channel

नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटीबद्दल

नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटी हा मनोरंजन क्षेत्रात अल्प प्रतिनिधित्व असलेल्या समुदायांसाठी नवीन मार्ग तयार करण्यास मदत करण्याचा एक समर्पित प्रयत्न आहे. दूरचित्रवाणी आणि चित्रपट उद्योगांमध्ये अधिक संधी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या बाह्य संस्थांना पाठिंबा देण्यासोबतच, या निधीद्वारे जगभरातील उदयोन्मुख प्रतिभेचा वेध घेण्यासाठी, प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्यांना संभाव्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरेखित केलेल्या नेटफ्लिक्सच्या विशेष कार्यक्रमांनाही सहाय्य केले जाते.‌

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2214270) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Kannada , Malayalam