गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी देशवासीयांना 8 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान सोमनाथमध्ये साजऱ्या होत असलेल्या "सोमनाथ स्वाभिमान पर्व" मध्ये सहभागी होण्याचे केले आवाहन
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरावरील पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त "सोमनाथ स्वाभिमान पर्व" साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे
सोमनाथ महादेव मंदिर हे आपल्या संस्कृतीच्या अमरत्वाचे आणि कधीही हार न मानण्याच्या दृढ इच्छाशक्तीचे प्रतीक
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सोमनाथ येथे 8 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान साजऱ्या होत असलेल्या 'सोमनाथ स्वाभिमान पर्व'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. सोमनाथ मंदिरावरील पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून आपल्या भावी पिढ्यांपर्यंत सनातन संस्कृतीच्या सातत्याचा आणि चैतन्यशीलतेचा संदेश पोहोचवता येईल.
X वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "सोमनाथ महादेव मंदिर ज्योतिर्लिंगांपैकी एक असण्यासोबतच सनातन संस्कृती आणि आध्यात्मिक वैभवाचा एक अक्षय्य वारसादेखील आहे. गेल्या हजार वर्षांमध्ये या मंदिरावर अनेक वेळा हल्ला झाला आहे, परंतु ते पुन्हा उभे राहिले आहे . ते आपल्या संस्कृतीच्या अमरत्वाचे आणि कधीही हार न मानण्याच्या आपल्या अढळ संकल्पाचे प्रतीक आहे. ज्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला ते नष्ट झाले आहेत, परंतु हे मंदिर आज पहिल्याहूनही अधिक वैभवाने उभे राहिले आहे. सोमनाथ मंदिराचा इतिहास आपल्याला सांगतो की असे हल्ले आपल्याला हानी पोहोचवू शकतात, परंतु आपल्याला नष्ट करू शकत नाहीत, कारण प्रत्येक वेळी अधिक भव्यतेने आणि दिव्यतेने पुन्हा उदयास येणे हे सनातन संस्कृतीचे मूलभूत स्वरूप आहे. सोमनाथ मंदिरावरील पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोदीजींनी 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून सनातन संस्कृतीच्या सातत्याचा आणि चैतन्यशीलतेचा संदेश आपल्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवता येईल. या पवित्र मंदिराचा विश्वस्त असण्याचे भाग्य मला लाभले आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना आवाहन करतो की त्यांनी आजपासून 11 जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या #SomnathSwabhimanParv मध्ये सहभागी व्हावे.”
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212676)
आगंतुक पटल : 14