गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 'दहशतवाद विरोधी परिषद-2025' चे उद्घाटन
दहशतवादा विरोधात शून्य सहिष्णुतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेअंतर्गत, ही वार्षिक परिषद नव्याने उद्भवणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठीचे व्यासपीठ बनल्याचे अमित शाह यांचे प्रतिपादन
दहशतवादी घटनांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दहशतवादाचे स्वरूपही बदलत आहे, आपण त्यापेक्षा दोन पावले पुढे राहायला हवे: अमित शाह
भारत सरकारच्या सर्व संस्था आणि राज्य पोलिस एकत्र येत राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रभावीपणे काम करणारी 'टीम इंडिया' तयार व्हावी
केंद्रीय गृहमंत्र्यांनी एनआयएने तयार केलेली अद्ययावत गुन्हेगारी नियमावली पुस्तिका, संघटित गुन्हेगारी नेटवर्क डेटाबेस आणि शस्त्रास्त्र डेटाबेसचे प्रकाशन केले
Posted On:
26 DEC 2025 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे 'दहशतवाद विरोधी परिषद-2025' चे उद्घाटन केले. भारत सरकारच्या गृह मंत्रालया अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी एनआयएची अद्ययावत गुन्हेगारी नियमावली पुस्तिका, संघटित गुन्हेगारी नेटवर्क डेटाबेस आणि ‘हरवलेली/लूटलेली आणि परत मिळवलेली शस्त्र डेटाबेस’चे प्रकाशन देखील केले.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, दहशतवादा विरोधात शून्य-सहिष्णुतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने अंतर्गत, ही वार्षिक परिषद नव्याने उद्भवणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठीचे व्यासपीठ बनले आहे. ते म्हणाले की, ही परिषद केवळ भारताच्या सुरक्षेच्या दृढनिश्चयाचा पुनरुच्चार करण्याचे माध्यम नाही, तर मागील वर्षांत देशात आणि जगात घडलेल्या सर्व दहशतवादी घटनांबाबत गुप्तचर माहितीचा अभ्यास करून या घटनांचे विश्लेषण करणे, आणि त्यानुसार आपली दहशतवादविरोधी क्षमता वाढवणे, हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर दहशतवादी घटनांमध्येही तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे, जगात दहशतवादाचे स्वरूप आता बदलत आहे, आणि ते रोखण्यासाठी आपणही सज्ज व्हायला हवे, असे त्यांनी नमूद केले. भविष्यातील अदृश्य आव्हानांचा अंदाज घेणे आणि त्याला रोखणे, ही या परिषदेची राष्ट्रीय जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, आज येथे तीन नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. एनआयएने तयार केलेली अद्ययावत गुन्हे नियमावली आज प्रसिद्ध करण्यात आली. त्या अनुषंगाने, सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांनी संबंधित राज्यात एक पथक तयार करावे, आणि तपास आणि खटला चालवताना या नियमावलीचा अभ्यास केल्याची खात्री करावी, अशी विनंती त्यांनी केली. ते म्हणाले की आज शस्त्रे ई-डेटाबेस देखील प्रकाशित करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, आज संघटित गुन्हेगारी नेटवर्कवरील डेटाबेस देखील जारी करण्यात आला. प्रत्येक राज्याने या डेटाबेसचा वापर करून, एनआयए आणि सीबीआयच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अधिकारक्षेत्रातील संघटित गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, बैसरन खोऱ्यातील हल्ला हा संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा होता. या हल्ल्याद्वारे, दहशतवाद्यांना देशातील जातीय सलोखा बिघडवायचा होता आणि काश्मीरमध्ये सुरू झालेल्या विकास आणि पर्यटनाच्या नव्या युगाला धक्का द्यायचा होता. ते म्हणाले की, अत्यंत अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे, आपल्या सुरक्षा दलाने तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानला कडक संदेश दिला. ते म्हणाले की, ही पहिली दहशतवादी घटना आहे, ज्यामध्ये दहशतवादी कृत्याची योजना आखणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरद्वारे शिक्षा देण्यात आली आणि ज्यांनी त्यांना पुरवलेल्या शस्त्रांच्या सहाय्याने हे कृत्य केले, त्यांचा ऑपरेशन महादेवद्वारे नायनाट करण्यात आला .

गृहमंत्र्यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी, केंद्र सरकार, भारतीय सुरक्षा दल आणि देशातील जनतेने आपल्या सुरक्षा दल आणि गुप्तचर संस्थांद्वारे पाकिस्तानच्या दहशतवादी सूत्रधारांना जोरदार आणि चोख प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही डीजीपी परिषद, सुरक्षा रणनीती परिषद, एन-कॉर्ड बैठका आणि दहशतवादविरोधी परिषद यामध्ये समन्वय, सहकार्य आणि संवादाचे एक नवीन मानक स्थापित केले आहे. ते म्हणाले की, आपण या चार स्तंभांचा स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही; त्यांच्यामधून एक समान धागा घेवून पुढे वाटचाल करण्यासाठी ही दहशतवादविरोधी परिषद आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, ‘मल्टी एजन्सी सेंटर’ आणि ‘नॅशनल मेमरी बँक’ यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला पाहिजे. ते म्हणाले की, समान एटीएस रचना आणि कार्यान्वयन एकसारखेपणा निर्माण केला तर दहशतवाद्यांवर खटला चालवण्यासाठी त्याचा फायदा होतो. जोपर्यंत आपण प्रत्यक्ष कार्यान्वयनामध्ये एकरूपता प्राप्त करत नाही, तोपर्यंत आपण धोक्यांचे अचूक मूल्यांकन करू शकत नाही. तसेच गुप्तचर माहिती सामायिकरणाचा योग्य वापर करू शकत नाही किंवा समन्वित प्रति-कारवाई करू शकत नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भर दिला की, आपण तपास करण्यापासून ते खटला चालवणे आणि प्रति-कारवाईपर्यंत एकसमानता सुनिश्चित केली पाहिजे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. हिंदी महासागरामुळे आपले भू-राजकीय स्थानही खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, आपली अर्थव्यवस्था जसजशी मोठी होत जाईल, त्याच प्रमाणात आपल्या समस्याही वाढतील. देशाची अर्थव्यवस्था जसजशी प्रगती करेल, त्यानुसार आपल्याला दक्षता वाढवावी लागेल. अमित शाह म्हणाले की, देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याची तयारी आपल्या सीमांवर, सीमेनजीक सुरू होत नाही; उलट, सीमा सुरक्षित करण्याची तयारी अनेक मैल दूरवरून सुरू झाली पाहिजे. यावेळी अमित शाह म्हणाले की, सायबर आणि माहिती युद्ध, आर्थिक जाळ्यांचा गैरवापर आणि दहशतवादाच्या संकरित स्वरूपासाठी, आपण एक राष्ट्रीय जाळे म्हणून एक मजबूत यंत्रणा विकसित केली पाहिजे. ही संपूर्ण यंत्रणा सतर्क आणि वेगवान , परिणाम दिसून येणारी, कारवाई करण्यास सक्षम असेल. आणि हे केवळ अशा परिषदांमधूनच साध्य होऊ शकते. शाह यांनी सांगितले की, बहुस्तरीय सुरक्षा मॉडेल तयार करणे आणि दहशतवादाविरुद्ध कठोर दृष्टिकोन बाळगून काम करणे, याच गोष्टी आपल्याला येत्या काळात सुरक्षित ठेवू शकतात.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, प्रत्येकाने 'जाणण्याची गरज' याऐवजी ' सामायिक करण्याचे कर्तव्य' या तत्त्वासह पुढे गेले पाहिजे.
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2208997)
अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada