पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पारंपरिक औषधोपचारावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक परिषदेतील  पंतप्रधानांचे संबोधन

प्रविष्टि तिथि: 19 DEC 2025 8:10PM by PIB Mumbai

 

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस़,आमचे तुलसी भाई, माझे सहकारी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा जी, आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव जी, या आयोजनात सहभागी सर्व मंत्री, विविध देशांचे राजदूत, सर्व सन्माननीय प्रतिनिधी, पारंपरिक औषधोपचार क्षेत्रात काम करणारे मान्यवर, उपस्थित महिला आणि पुरुषवर्ग !

पारंपरिक औषधोपचार यावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक परिषदेचा आज समापन दिन आहे. गेले तीन दिवस इथे पारंपरिक औषधोपचार क्षेत्राशी संबंधित सांगोपांग आणि महत्वपूर्ण चर्चा झाली. यासंदर्भात एका मजबूत मंचासाठी भारत काम करत आहे याचा मला आनंद आहे आणि यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचीही सक्रीय भूमिका राहिली आहे. या यशस्वी आयोजनासाठी मी जागतिक आरोग्य संघटनेचे, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे आणि इथे उपस्थित सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानतो.

मित्रहो,

पारंपरिक औषधोपचार यावरील जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक केंद्र भारतातील जामनगर येथे स्थापन झाले आहे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. 2022 मध्ये पारंपारिक औषधोपचारांच्या पहिल्या परिषदेत जगाने अतिशय विश्वासाने आपल्याकडे ही जबाबदारी सोपवली होती. या जागतिक केंद्राचा प्रभाव आणि यश स्थानिक पातळीपासून ते जागतिक स्तरापर्यंत विस्तारत आहे ही आपणा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. या शिखर परिषदेचे यश हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. या शिखर परिषदेत पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक पद्धती यांचा संगम होत आहे. येथे काही नवीन उपक्रमही सुरु करण्यात आले आहेत, जे वैद्यकशास्त्र आणि समग्र आरोग्याच्या भविष्यामध्ये परिवर्तन घडवू शकतील. शिखर परिषदेमध्ये विविध देशांचे आरोग्य मंत्री आणि प्रतिनिधींमध्ये विस्ताराने संवादही झाला आहे. या संवादामुळे संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन, नियम सुलभ करण्याचे आणि प्रशिक्षण आणि ज्ञान आदान-प्रदान करण्यासाठीचे नवे मार्ग मोकळे झाले आहेत. पारंपारिक औषधोपचार अधिक सुरक्षित, अधिक विश्वासार्ह करण्यासाठी हा सहयोग महत्वाची भूमिका बजावेल.

मित्रहो,

या शिखर परिषदेत अनेक महत्वाच्या विषयांवर झालेली सहमती आपल्या मजबूत भागीदारीचे प्रतिबिंब आहे. संशोधन मजबूत करणे, पारंपरिक औषधोपचार क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविणे, संपूर्ण जग ज्यावर विश्वासू शकेल अशी नियामक चौकट तयार करणे असे मुद्दे पारंपरिक औषधोपचार अतिशय भक्कम करतील. येथे आयोजित प्रदर्शनातून डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता आधरित उपकरणे, संशोधन नवोन्मेश आणि आधुनिक निरामयता पायाभूत सुविधा या सर्वांद्वारे परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा नवा संगम आपल्याला पाहायला मिळाला आहे. यांच्या संगमाने जागतिक आरोग्य अधिक प्रभावी करण्याची क्षमता अधिक वाढते. म्हणूनच या शिखर परिषदेचे यश जागतिक दृष्टीनेही अतिशय महत्वाचे आहे.

मित्रहो,

योगाभ्यास हाही पारंपारिक औषधोपचार प्रणालीचा एक महत्वाचा भाग आहे. योगाने संपूर्ण जगाला आरोग्य, संतुलन आणि सौहार्द्दाचा मार्ग दाखविला आहे. भारताचे प्रयत्न आणि 175 पेक्षा जास्त देशांच्या सहयोगाने संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून जाहीर केला. मागील वर्षांमध्ये योग जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असल्याचे आपण पाहिले आहे. योगाचा प्रचार आणि विकास यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मी प्रशंसा करतो. आज अशा निवडक व्यक्तींना पीएम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठीत निवड सदस्यांनी सखोल निवड प्रक्रियेचा माध्यमातून या पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. हे सर्व विजेते, योगाभ्यासाप्रती समर्पण, शिस्त आणि आजीवन कटीबद्धता यांचे प्रतिक आहेत. त्यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. सर्व सन्मानित विजेत्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.

मित्रहो,

या परिषदेतल्या फलनिष्पत्तीला स्थायी रूप देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे हे जाणून समाधान झाले. पारंपारिक औषधोपचाराशी निगडीत डेटा आणि धोरणात्मक दस्तऐवज एका जागी सुरक्षित राखणारा पारंपारिक औषधोपचार जागतिक लायब्ररी हा जागतिक मंच सुरु करण्यात आला आहे. उपयुक्त माहिती प्रत्येक देशापर्यंत सारखेपणाने पोहोचण्याचा मार्ग यामुळे सुलभ होईल. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेच्या पहिल्या जागतिक परिषदेत या लायब्ररीची घोषणा करण्यात आली होती. आज हा संकल्प साकार झाला आहे.

मित्रहो,

येथे विविध देशांच्या आरोग्य मंत्र्यांनी जागतिक भागीदारीचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. एक भागीदार म्हणून आपली मानके, सुरक्षितता, गुंतवणूक यासारख्या मुद्यांवर चर्चा केली आहे. या संवादातून दिल्ली जाहीरनाम्यासाठी मार्ग प्रशस्त झाला आहे जो येत्या काळासाठी मार्गदर्शक आराखडा म्हणून काम करेल. या संयुक्त प्रयत्नांसाठी विविध देशांच्या माननीय मंत्र्यांची मी प्रशंसा करतो, त्यांच्या सहयोगासाठी आभार व्यक्त करतो.

मित्रहो,

आज दिल्लीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया प्रादेशिक कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले आहे. भारताकडून ही विनम्र भेट आहे. हे एक असे जागतिक केंद्र आहे, जिथे संशोधन, नियमन आणि क्षमता उभारणीला प्रोत्साहन मिळेल.

मित्रहो,

जगभरात उपचार भागीदारीवरही भारत भर देत आहे. मी आपणा सर्वांसमवेत दोन महत्वाचे सहयोग सामाईक करू इच्छितो.             

यापैकी पहिला सहयोगात्मक उपक्रम म्हणजे आम्ही बिमस्टेक देशांसाठी, म्हणजेच दक्षिण आणि आग्नेय आशियातील आमच्या शेजारी देशांसाठी एक उत्कृष्टता केंद्र स्थापन करत आहोत. दुसरा उपक्रम म्हणजे आम्ही जपानसोबत एक सहयोग सुरु केला आहे. हा विज्ञान, पारंपरिक पद्धती आणि आरोग्य यांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न आहे.

मित्रांनो,

यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे – ‘संतुलनाचे पुनर्संचयन: विज्ञान तसेच आरोग्य आणि स्वास्थ्याचा सराव’. संतुलनाचे पुनर्संचयन हा समग्र आरोग्याचा पायाभूत विचार आहे. तुम्ही सर्व तज्ञ मंडळी हे उत्तम प्रकारे जाणता की आयुर्वेदात समतोल म्हणजेच संतुलनाला स्वास्थ्याचा पर्याय असे म्हटले आहे. ज्याच्या शरीरात हे संतुलन साधलेले आहे तोच तंदुरुस्त आहे, तोच निरोगी आहे. आजकाल आपण पाहत आहोत, मधुमेह, हृदय विकाराचा झटका, नैराश्य अशा आजारांपासून अगदी कर्करोगापर्यंत बहुतेक आजारांच्या पाठीमागे जीवनशैली आणि असंतुलन ही महत्त्वाची कारणे म्हणून दिसून येत आहेत. आजच्या घडीला काम आणि व्यक्तिगत आयुष्य यामधील असमतोल, असंतुलित आहार, झोपेच्या बाबतीत असमतोल, पोटातील सूक्ष्मजीवांच्या बाबतीत असमतोल, उष्मांकांचे असंतुलन, भावनिक असमतोल अशी कितीतरी जागतिक आरोग्यविषयक आव्हाने या असंतुलनामुळेच निर्माण होत आहेत. अनेक अभ्यासांच्या अंती देखील हेच सिध्द होत आहे, आकडेवारी देखील हेच सांगते आहे, तुम्ही सर्व आरोग्य क्षेत्रातील तज्ञ या गोष्टी अधिक उत्तम प्रकारे जाणता. पण, मी यावर अधिक भर देईन की संतुलनाचे पुनर्संचयन हे आज केवळ एक अभियान नव्हे तर ती एक जागतिक समस्या देखील आहे. तिची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला आणखी वेगाने पावले उचलावी लागतील.

मित्रांनो,

21 व्या शतकातील या कालखंडात जीवनात समतोल राखण्याचे आव्हान आणखीनच मोठे होत जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची चाहूल कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्सच्या रुपात मानवी इतिहासात सर्वात मोठा बदल घडवून आणणार आहे, येत्या काही वर्षांमध्ये जीवन जगण्याच्या आपल्या पद्धती अभूतपूर्व रितीने बदलून जाणार आहेत. म्हणूनच आपल्याला याचे देखील भान ठेवावे लागेल की आपल्या जीवनशैलीमध्ये होत असलेले इतके मोठे बदल, शारीरिक श्रमांविना सर्व साधने आणि सुविधा मिळण्याची झालेली सोय यामुळे मानवी शरीरांसाठी अनेक अनपेक्षित आव्हाने निर्माण होणार आहेत. म्हणूनच पारंपरिक आरोग्य सेवेत आपल्याला केवळ वर्तमानकाळातीलच गरजांवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही.येणाऱ्या भविष्यकाळाविषयी देखील आपली सर्वांची सामायिक जबाबदारी असणार आहे.

मित्रांनो,

जेव्हा पारंपरिक औषधोपचारांची चर्चा होते तेव्हा एक प्रश्न स्वाभाविकपणे समोर उभा राहतो. हा प्रश्न सुरक्षितता आणि पुराव्याशी संबंधित आहे. भारत आज या दिशेने देखील सतत काम करत आहे. तुम्ही सर्वांनी येथे, या परिषदेत अश्वगंधा या वनस्पतीचे उदाहरण पाहिले असेल. प्राचीन काळापासून आपल्या पारंपरिक औषधोपचार प्रणालीमध्ये या वनस्पतीचा वापर होत आला आहे. कोविड-19 च्या कालावधीत देखील याच्या मागणीत मोठी वाढ झाली आणि अनेक देशांमध्ये याचा वापर सुरु झाला. भारत स्वतःचे संशोधन आणि पुराव्यावर आधारित प्रमाणीकरणाच्या माध्यमातून अश्वगंधा वनस्पतीच्या वापराला प्रमाणित स्वरुपात प्रोत्साहन देत आहे. या परिषदेदरम्यान देखील अश्वगंधावर आधारित विशेष वैश्विक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांनी या वनस्पतीच्या वापरातील सुरक्षितता, तिचे गुणधर्म आणि वापर यांच्यावर सखोल चर्चा केली. अशा काळाच्या कसोटीवर सिध्द झालेल्या वनौषधीला जागतिक सार्वजनिक आरोग्य प्रणालीचा भाग बनवण्यासाठी भारत संपूर्ण कटिबद्धतेसह काम करत आहे.

मित्रांनो,

पारंपरिक औषधोपचारांच्या बाबतीत एक समज असा होता की याची भूमिका केवळ स्वास्थ्य अथवा जीवनशैलीपर्यंतच मर्यादित आहे. मात्र आज हा समज वेगाने बदलू लागला आहे. गंभीर परिस्थितीत देखील पारंपरिक औषधे प्रभावी भूमिका निभावू शकतात. याच मानसिकतेसह भारत या क्षेत्रात आगेकूच करत आहे. मला हे तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषधोपचार केंद्राने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. या दोघांनी मिळून, भारतात एकात्मिक कर्करोग उपचार प्रणालीला बळकट करण्यासाठी एक संयुक्त उपक्रम सुरु केला आहे. याच्या अंतर्गत, पारंपरिक निदानपद्धतींना आधुनिक कर्करोग उपचार प्रणालींशी जोडून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे पुराव्यावर आधारित मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात देखील मदत होईल. भारतातील अनेक प्रमुख संस्था आरोग्याशी संबंधित अशाच गंभीर विषयांच्या संदर्भात वैद्यकीय अभ्यास करत आहेत. रक्ताल्पता, संधिवात आणि मधुमेह यांसारख्या विषयांचा देखील समावेश आहे. भारतातील अनेकानेक स्टार्ट अप्स देखील या क्षेत्रात काम करण्यासाठी पुढे आले आहेत. प्राचीन परंपरेशी युवाशक्ती जोडली जात आहे. या सर्व प्रयत्नांमुळे पारंपरिक औषधोपचार पद्धती एक नवी उंची गाठण्याच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे.

मित्रांनो,

आज पारंपरिक निदान प्रणाली एका निर्णायक वळणावर उभी आहे. जगातील लोकसंख्येचा मोठा भाग या प्रणालीचा वापर करत आला आहे. पण, तरीही, पारंपरिक निदान प्रणालीमध्ये असलेल्या ताकदीनुसार तिला कधीही समर्पक स्थान मिळाले नव्हते. म्हणूनच आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून हा विश्वास जिंकावा लागेल. आपल्याला या प्रणालीची पोहोच आणखी व्यापक करावी लागेल. ही जबाबदारी कोणा एका देशाची नाही तर हे आपल्या सगळ्यांचे सामायिक उत्तरदायित्व आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये या परिषदेत जो सहभाग, संवाद आणि कटिबद्धता दिसून आली त्यातून, विश्व या दिशेने एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी सज्ज आहे असा दृढ विश्वास निर्माण झाला आहे. चला, आपण सर्वांनी पारंपरिक निदान पद्धतीला विश्वास, सन्मान आणि जबाबदारीसह एकत्र येऊन पुढे नेऊ असा निर्धार करूया. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या परिषदेच्या आयोजनाबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद.

***

नितीन फुल्लुके/निलिमा चितळे/संजना चिटणीस/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2206918) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada