गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या सागरा प्राण तळमळला या पद्याच्या  115 व्या वर्षपूर्तीनिमित्त श्री विजयपूरम इथे आज झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले संबोधित


वीर सावरकर यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा जो पाया घातला

त्यावरूनच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश मार्गक्रमण करत आहे

वीर सावरकर यांचे सागरा प्राण तळमळला हे काव्य  म्हणजे देशभक्तीच्या अभिव्यक्तीचा उत्कर्षबिंदू

वीर सावरकर यांचा इथला पुतळा युवा वर्गात मातृभूमीप्रती कर्तव्य आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना तसेच समृद्ध राष्ट्राच्या जडणघडणीच्या संकल्पाला बळकटी देईल

प्रविष्टि तिथि: 12 DEC 2025 8:40PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या सागरा प्राण तळमळला या पद्याच्या  115 व्या वर्षपूर्तीनिमित्त श्री विजयपूरम इथे आज एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि अंदमान आणि निकोबार बेटाचे नायब राज्यपाल अॅडमीरल (निवृत्त) डी. के. जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वीर सावरकरांनी त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण काळ अंदमान आणि निकोबार बेटावरच व्यतीत केला होता, त्यामुळे हे ठिकाण आज सर्व भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे  असे अमित शाह यावेळी म्हणाले. आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील आणखी एक महान स्वातंत्र्य सैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीशीही हे ठिकाण जोडलेले असल्याचे त्यांनी सांगितले. आज या पवित्र भूमीवर वीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन, सावरकरांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेणाऱ्या संघटनेचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले असल्याने आजचा दिवस खूप महत्वाचा आहे असल्याचे ते म्हणाले.

आज अनावरण झालेला पुतळा हा येती अनेक वर्षे वीर सावरकरांच्या त्यागाचे, दृढनिश्चयाचे आणि भारतमातेप्रती  अखंड समर्पणाचे प्रतीक राहील असे अमित शाह म्हणाले. येत्या अनेक  दशकांपर्यंत  हा पुतळा भावी पिढ्यांना सावरकरजींच्या जीवनातून प्रेरणा  घेण्याचा संदेश देईल असे त्यांनी सांगितले. वीर सावरकरांनी केलेले आवाहन आत्मसात करण्यासाठी हे ठिकाण तरुणांसाठी एक प्रमुख केंद्र बनेल, असेही ते म्हणाले.

शाह म्हणाले की, सावरकरजींचा धाडसाचा संदेश, मातृभूमीप्रती कर्तव्याची भावना, दृढनिश्चयाचे गुण आणि राष्ट्रीय एकता, सुरक्षितता आणि समृद्ध राष्ट्राचे त्यांचे स्वप्न हे तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण बनेल. वीर सावरकरजींचे 'सागर प्राण तळमळला' देशभक्तीची अभिव्यक्तता करण्याचा उत्कर्षबिंदू आहे. सावरकरजींचे एक वाक्य त्यांच्या अनुयायांसाठी खूप महत्वाचे आहे: 'शौर्य म्हणजे भीतीचा अभाव नाही, तर भीतीवर विजय मिळवणे.' ज्यांना भीती माहीत नाही ते शूर असतात, परंतु खरे वीर  ते असतात जे भीती ओळखतात आणि त्यावर मात करण्याचे धाडस करतात - आणि वीर सावरकरांनी हे आपल्या जीवनात साकारले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, आज येथे एका कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले असून त्यात सावरकरांचे सर्व गुण सामावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अमित शाह म्हणाले की, आज देशासाठी कोणालाही बलिदान  देण्याची गरज नाही, परंतु देशासाठी जगण्याची अजूनही गरज आहे आणि तेव्हाच आपण सावरकरजींच्या दृष्टिकोनातील भारत निर्माण करू शकतो. त्यांनी स्पष्ट केले की, जर आपल्या तरुणांना सावरकरजींनी कल्पिलेला भारत निर्माण करायचा असेल, तर त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात सावरकरजींच्या प्रेरणेनुसार जीवन जगले पाहिजे आणि एक सुरक्षित आणि सर्वात समृद्ध भारत निर्माण करणे हे त्यांचे ध्येय असले पाहिजे.

ते म्हणाले की, जेव्हा आपण सावरकरजींच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा असे वाटते की अशी व्यक्ती आगामी शतकानुशतके पृथ्वीवर पुन्हा होणार नाही. सावरकरजी एक लेखक, एक सेनानी, जन्मजात देशभक्त, एक महान समाजसुधारक आणि एक महान लेखक आणि कवी होते. ते म्हणाले की, सावरकरजी गद्य आणि पद्य  दोन्हीमध्ये पारंगत होते आणि असे साहित्यिक खूप दुर्मिळ आहेत. शाह म्हणाले की, वीर सावरकरजींनी आपल्या भाषांमध्ये आपले शब्दसंग्रह समृद्ध करण्यासाठी योगदान दिलेले 600 हून अधिक शब्द आहेत.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, वीर सावरकरजींचे जीवन हिंदुत्वाच्या प्रती दृढ भक्तीचे होते, ते आधुनिकही  होते आणि  त्यांनी परंपराही  पुढे नेल्या आणि जपल्या. ते म्हणाले की, वीर सावरकरजींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी जे योगदान दिले आहे त्यासाठी या देशाने कधीही सावरकरजींचा सन्मान केला नाही. सावरकरजींनी त्या काळात हिंदू समाजात प्रचलित असलेल्या सर्व सामाजिक कुप्रथाविरुद्ध लढा दिला आणि समाजाच्या विरोधाला तोंड देत ते पुढे जात राहिले.

ते म्हणाले की, वीर सावरकरांना "वीर" ही पदवी कोणत्याही सरकारने नव्हे , तर देशातील प्रत्येक नागरिकाने दिली आहे.

***

निलिमा चितळे/तुषार पवार/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2203382) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati