पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2023 10:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023
भारत माता की जय !
भारत माता की जय !
मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री. मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री भाई शिवराज सिंह चौहान, मंत्रीमंडळातील माझे सर्व सहकारी, मध्य प्रदेश राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या बंधू आणि भगिनींनो!
माता नर्मदेच्या या पवित्र भूमीला श्रद्धापूर्वक वंदन करताना, मी आज जबलपूरचा एक नवीन चेहरा पाहत आहे. मला दिसते की जबलपूरमध्ये उत्साह आहे; 'महाकौशल'मध्ये आनंद आणि उत्साह आहे. हा जोश, हा उत्साह महाकौशलच्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट प्रतिबिंबित करतो. या उत्साहात, आज संपूर्ण देश शूर राणी दुर्गावती जी यांची 500 वी जयंती साजरी करत आहे. राणी दुर्गावती गौरव यात्रेच्या समारोपाच्या प्रसंगी, मी राष्ट्रीय स्तरावर त्यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. आज आपण सर्वजण येथे याच उद्देशाने, एक पवित्र कार्य करण्यासाठी, आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी एकत्र आलो आहोत. थोड्या वेळापूर्वीच, आपण येथे राणी दुर्गावतीजींच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन केले. मी विचार करत होतो की ते कसे बांधले जाणार आहे. शिवराजजी मला त्याचा संपूर्ण नकाशा तपशीलवार दाखवत होते. मला ठाम विश्वास आहे की हे बांधल्यानंतर, भारताच्या प्रत्येक आईला आणि प्रत्येक तरुणाला या भूमीला भेट देण्याची इच्छा होईल. एक अर्थाने ते एक तीर्थक्षेत्र बनेल. राणी दुर्गावती यांचे जीवन आपल्याला सर्वांच्या कल्याणाचा धडा शिकवते; आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करण्याचे धैर्य देते. राणी दुर्गावतीच्या जयंतीनिमित्त मी संपूर्ण आदिवासी समाज, मध्य प्रदेश आणि देशातील 140 कोटी देशवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. जर जगातील कोणत्याही देशाचा राणी दुर्गावतीसारखा नेता असता तर त्या देशाने त्यांच्या कार्याचा गौरव जगभरात पसरवला असता. स्वातंत्र्यानंतर, आपल्या देशातही हे घडायला हवे होते, परंतु आपली महान व्यक्तिमत्त्वे विस्मरणात गेली. हे तेजस्वी, तपस्वी, त्याग आणि चिकाटीचे मूर्तिमंत उदाहरण असलेले महान व्यक्तिमत्त्वाचे धनी शूर पुरुष आणि महिला विस्मृतीत गेले.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
आज येथे 12 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे. पाणी आणि गॅस पाईपलाईन असो किंवा 4 पदरी रस्त्यांचे जाळे असो, हे असे प्रकल्प आहेत जे लाखो लोकांचे जीवन बदलून टाकतील. येथील शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल; येथे नवीन कारखाने आणि प्रकल्प उभारले जातील आणि आपल्या तरुणांनाही येथे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
भाजपा सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक म्हणजे आपल्या भगीनींना धूरमुक्त स्वयंपाकघर उपलब्ध करून देणे. काही तज्ञांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की जेव्हा एखादी आई चुलीवर स्वयंपाक करते, आणि त्यासाठी लाकूड जाळते किंवा कोळसा जाळते तेव्हा तिचे शरीर दर 24 तासांनी 400 सिगारेट्स इतक्या धूराच्या संपर्कात येते. माझ्या माता आणि भगिनींना या त्रासातून मुक्तता मिळायला हवी की नाही? कृपया तुमच्या संपूर्ण ताकदीनिशी उत्तर द्या; हे माता आणि भगिनींबद्दल आहे. माझ्या माता आणि भगिनींना स्वयंपाकघरातील धुरापासून मुक्तता मिळायला हवी की नाही? हे काम काँग्रेस आधी करु शकली नसती का? करु शकली असती. पण, त्यांनी केले नाही. त्यांना माता-भगिनींच्या आरोग्याची किंवा त्यांच्या कल्याणाची पर्वा नव्हती.
बंधू आणि भगिनींनो,
म्हणूनच आम्ही एक मोठे अभियान सुरू केले आणि उज्ज्वला योजनेद्वारे गरीब कुटुंबातील कोट्यवधी बहिणींना मोफत गॅस कनेक्शन दिले. अन्यथा, पूर्वी जर त्यांना गॅस कनेक्शन घ्यायचे असेल तर त्यांना खासदाराच्या घरी जावे लागायचे. तुम्हाला माहिती आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो. म्हणून, रक्षाबंधन सणाच्या दिवशी, आमच्या सरकारने सर्व भगिनींसाठी गॅस सिलिंडर स्वस्त केले. त्या निमित्ताने, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी भगिनींसाठी गॅस सिलिंडर 400 रुपयांनी स्वस्त करण्यात आला. आणि आता काही दिवसांनी, दुर्गा पूजा, नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण सुरू होणार आहेत. म्हणून, मोदी सरकारने कालच पुन्हा एकदा उज्ज्वला गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त केले. याचा अर्थ असा की गेल्या काही आठवड्यातच उज्ज्वलाच्या लाभार्थी भगिनींसाठी सिलिंडर 500 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी असलेल्या माझ्या गरीब माता, भगिनी आणि कन्या यांना केवळ 600 रुपयांत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. भाजप सरकार सिलिंडरऐवजी पाईपद्वारे स्वयंपाकघरात स्वस्त गॅस पोहोचवण्यासाठी वेगाने काम करत आहे. म्हणूनच येथे गॅस पाईपलाईन देखील टाकल्या जात आहेत. मध्य प्रदेशातील लाखो कुटुंबांनाही या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
आज, मी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना, आपल्या छोट्या मित्रांना, आपल्या तरुण मुलांना आणि मुलींना काही जुन्या घटनांची आठवण करून देऊ इच्छितो. मी त्यांना आठवण करून देऊ का? मी त्यांना 2014 च्या काही घटनांची आठवण करून देऊ का? तुम्ही पहा, आज जे 20-22 वर्षांचे ज्यांना माहित नसेल कारण त्यावेळी ते कदाचित 8, 10 किंवा 12 वर्षांचे असतील. मोदी सरकारपूर्वी परिस्थिती कशी होती हे त्यांना माहितच नसेल. त्या काळात काँग्रेस सरकारचे हजारो कोटी रुपयांचे घोटाळे दररोज ठळक बातम्यांमध्ये येत असत. गरिबांवर खर्च करण्यासाठी असलेला पैसा काँग्रेस नेत्यांच्या तिजोरीत जात होता. आणि मी या तरुणांना म्हणेन की तुमची पिढी ऑनलाइन पिढी आहे. म्हणून एकदा गुगलवर जाऊन सर्च करा. 2013-14 च्या वर्तमानपत्रातील केवळ मथळे वाचा. देशाची परिस्थिती काय होती? ते जाणून घ्या.
आणि म्हणून, बंधू आणि भगिनींनो,
2014 नंतर, जेव्हा तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा आम्ही काँग्रेस सरकारने निर्माण केलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचा अंत करण्यासाठी मोहीम सुरू केली आणि भ्रष्टाचारविरोधी स्वच्छता मोहीम सुरू केली. तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही सुमारे 11 कोटी बनावट नावे सरकारी नोंदीमधून काढून टाकली. तुम्हाला हा आकडा आठवेल ना? तुम्ही उत्तर देऊ शकाल ना? तुम्हाला हा आकडा आठवेल ना? आम्ही सरकारी नोंदींमधून 11 कोटी बनावट नावे काढून टाकली. किती? मी किती म्हटले? मोठ्याने बोला. 11 कोटी! ही 11 कोटी नावे कोणाची होती? ही अशा लोकांची नावे होती जी कधीच जन्माला आली नव्हती! पण कॉंग्रेसने सरकारी तिजोरी लुटण्याचा एक मार्ग तयार करून ठेवला होता. काँग्रेसने या खोट्या नावांची बनावट कागदपत्रे तयार केली होती.
11 कोटींचा हा आकडा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. या 11 कोटी बनावट नावांचा वापर करून खऱ्या लाभार्थ्यांचे, गरिबांचे हक्क हिसकावून सरकारी तिजोरी लुटण्यात आली. पण 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदींनी सर्वकाही स्वच्छ केले आहे. आता हे लोक रागावलेले आहेत कारण त्यांचा ‘कट’, त्यांचे ‘कमिशन’ बंद झाले आहे. मोदी आले आणि त्यांनी सर्व काही थांबवले आहे. मी गरिबांचे पैसे लुटू देणार नाही आणि काँग्रेस नेत्यांच्या तिजोऱ्या भरू देणार नाही. आम्ही जन धन-आधार आणि मोबाईलची अशी त्रिशक्ती निर्माण केली आणि काँग्रेसची भ्रष्ट व्यवस्था मोडून काढली. आज या त्रिशक्तिमुळे 2.5 लाख कोटींहून अधिक रुपये चोरी जाण्यापासून वाचले आहेत. मी तुम्हाला हा आकडा पुन्हा विचारतो. तर, मोदींनी चुकीच्या हातात जाणारे आणि चोरीला जाणारे 2.5 लाख कोटींहून अधिक रुपये वाचवण्याचे काम केले आहे. मी किती म्हटले? 2.5 लाख कोटी! आज गरिबांचे पैसे गरिबांच्या कल्याणासाठी वापरले जात आहेत. आज केंद्र सरकार फक्त 600 रुपयांना उज्ज्वला सिलिंडर देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. कोट्यवधी कुटुंबांना मोफत धान्य वितरणासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हे 3 लाख कोटी रुपये तिजोरीतून दिले जातात जेणेकरून माझ्या गरीब आईचे कोणतेही मूल रात्री उपाशी झोपणार नाही, गरिबांच्या घरी चूल पेटत राहावी. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, देशातील सुमारे 5 कोटी कुटुंबांना मोफत उपचार मिळाले आहेत. यासाठी, सरकारने तुमच्या आयुष्मान कार्डसाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. शेतकऱ्यांना स्वस्त युरिया मिळावा म्हणून जागतिक बाजारात जिथे युरियाची एक पिशवी 3000 रुपयांना विकली जाते, ती मोदी सरकार 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत देत आहेत. आणि म्हणूनच केंद्र सरकारने शेतकरी बांधवांवर भार पडू नये म्हणून तिजोरीतून 8 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, 2.5 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. आमच्या सरकारने गरीब कुटुंबांना पक्की घरे देण्यासाठी 4 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. आज तुम्ही पाहिले असेलच की मी इंदूरमध्ये गरीब कुटुंबांना आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेली 1000 बहुमजली पक्की घरे दिली आहेत.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
जर तुम्ही सर्व निधी एकत्र केल्यावर येणारा आकडा किती असेल, याची कल्पना आहे का? किती शून्य लावावी लागतील? तुम्ही स्वतः विचार करू शकता! काँग्रेसवाल्यांना तर ही मोजणीच करता येणार नाही. आणि ऐका - 2014 पूर्वी, या शून्यांचा वापर केवळ घोटाळ्यांमधून मिळालेल्या पैशांची गणना करण्यासाठी केला जात होता. आता कल्पना करा - काँग्रेसच्या एका पंतप्रधानांनीच कबूल केले होते की जर तुम्ही दिल्लीहून एक रुपया पाठवला तर फक्त 15 पैसे प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात आणि 85 पैसे मध्येच कोणीतरी लुटून नेतो. ते एक रुपया पाठवायचे पण लाभार्थ्यापर्यंत पोहचायचे केवळ 15 पैसे! आता विचार करा, आपण आत्ताच मोजलेली इतकी मोठी रक्कम जर काँग्रेसच्या काळात पाठवली गेली असती तर किती प्रचंड लूट झाली असती! आज मात्र भाजप सरकार हे सगळे पैसे गरिबांच्या कल्याणासाठी खर्च करत आहे.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
हा काळ माझ्या मध्य प्रदेशासाठी अत्यंत निर्णायक आहे. आज नर्मदेच्या काठावर उभा राहून मी हे सांगत आहे - मी हे संपूर्ण मध्य प्रदेशला सांगत आहे; मी मध्य प्रदेशातील तरुणांना हे सांगत आहे; मी नर्मदेच्या साक्षीने हे सांगत आहे कारण माझा जन्मही नर्मदेच्या कुशीत झाला आहे. मी आज नर्मदेच्या काठावर उभा राहून हे सांगत आहे. माझ्या तरुण मित्रांनो, माझे शब्द लक्षात ठेवा. आज मध्य प्रदेश अशा वळणावर आहे जिथे विकासाचा वेग मंदावला किंवा विकास थांबला तर सगळे काही उद्ध्वस्त होईल. आणि असा विकास 20-25 वर्षांनंतरही परत येणार नाही. आणि म्हणूनच, विकासाचा ही वेग कुठेही थांबता कामा नये किंवा अडता कामा नये. ही 25 वर्षे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. मध्य प्रदेशातील 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मित्रांनी केवळ नवीन आणि प्रगतीशील मध्य प्रदेश पाहिला आहे. आता त्यांची जबाबदारी आहे की येत्या 25 वर्षांत, जेव्हा त्यांची मुले मोठी होतील, तेव्हा त्यांना विकसित मध्य प्रदेश, समृद्ध मध्य प्रदेश, अभिमान आणि सन्मानाने भरलेला मध्य प्रदेश मिळाला पाहिजे. यासाठी आज अधिक कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आज योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत, भाजप सरकारने कृषी निर्यातीच्या बाबतीत मध्य प्रदेशला अव्वल स्थानावर नेले आहे. आता औद्योगिक विकासातही आपला मध्य प्रदेश अव्वल स्थानावर पोहोचणे महत्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत भारताचे संरक्षण उत्पादन आणि संरक्षण निर्यात अनेक पटींनी वाढली आहे. जबलपूरचेही यात मोठे योगदान आहे. मध्य प्रदेशात, एकट्या जबलपूरमध्ये संरक्षणाशी संबंधित वस्तूंचे उत्पादन करणारे 4 कारखाने आहेत. आज केंद्र सरकार आपल्या सैन्याला 'मेड इन इंडिया' शस्त्रे पुरवत आहे. जगभरात भारताच्या संरक्षण सामग्रीची मागणी वाढत आहे. मध्य प्रदेशलाही याचा मोठा फायदा होणार आहे. येथे हजारो नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
आज भारताचा आत्मविश्वास एका नव्या उंचीवर आहे. खेळाच्या मैदानापासून ते शेतापर्यंत भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावर फडकत आहे. तुम्ही पाहिले असेल की सध्या आशियाई खेळ सुरू आहेत, त्यात आपण भारताची तेजस्वी कामगिरी पाहत आहोत. आज देशातील प्रत्येक तरुणाला वाटते की हा काळ भारताच्या तरुणाईचा आहे. हा काळ भारताच्या तरुणाईचा काळ आहे. जेव्हा तरुणांना अशा संधी मिळतात तेव्हा विकसित भारत निर्माण करण्याचा त्यांचा जोशही वाढतो. म्हणूनच, भारत G20 सारखे भव्य जागतिक कार्यक्रम इतक्या अभिमानाने आयोजित करू शकतो. म्हणूनच, भारताचे चंद्रयान अशा ठिकाणी पोहोचले जिथे इतर कोणताही देश पोहोचू शकला नाही. म्हणूनच, ‘व्होकल फॉर लोकल’ हा स्थानिकांसाठी आवाज उठवण्याचा मंत्र देशभर दुमदुमू लागला आहे. तुम्ही कल्पना करू शकता की, एकीकडे या देशाने चंद्रयान पाठवले तर दुसरीकडे, गांधी जयंतीला, 2 ऑक्टोबर रोजी, दिल्लीतील एका खादी दुकानाने केवळ एकाच दिवसात 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची उत्पादने विकली. ही देशाची ताकद आहे. स्वदेशीची ही भावना, देशाला पुढे नेण्याची ही भावना आज सर्वत्र वाढत आहे. आणि माझ्या देशातील तरुणांनी, माझ्या देशातील सुपुत्रांनी या प्रयत्नाची सूत्रे हाती घेतली आहेत. म्हणूनच आज भारतातील तरुण स्टार्ट-अप्सच्या विश्वात चमत्कार करत आहेत. म्हणूनच भारत स्वच्छतेचा शक्तिशाली संकल्प केला आहे. 1 ऑक्टोबर रोजी देशात सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेत 9 लाखांहून अधिक ठिकाणी स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आले! देशातील 9 कोटींहून अधिक लोकांनी त्या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. लोक स्वतः घराबाहेर पडले, झाडू हातात घेतला, रस्ते आणि उद्याने स्वच्छ केली. मध्य प्रदेशातील लोकांनी आणि तरुणांनी अजून मोठे काम केले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मध्य प्रदेशने सर्वाधिक गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आपल्याला ही भावना पुढे घेऊन जायची आहे. आणि येत्या 5 वर्षांत, आपल्याला शक्य तितक्या क्षेत्रात मध्य प्रदेशला पहिल्या क्रमांकावर ठेवायचे आहे.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
जेव्हा एखादा राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थात मग्न असतो, तेव्हा त्याचे परिणाम ओळखणे सोपे असते. आज संपूर्ण जग भारताच्या कामगिरीबद्दल बोलत आहे. पण हेच राजकीय पक्ष, ज्यांनी सर्व काही गमावले आहे आणि ज्यांना सत्तेव्यतिरिक्त काहीच दिसत नाहीत, ते आता इतके खालच्या पातळीवर गेले आहेत की भाजपाचा अपमान करताना भारताचाही अपमान करायला मागेपुढे पाहत नाहीत. आज संपूर्ण जग डिजिटल इंडिया अभियानाचे कौतुक करत आहे. पण तुम्हाला आठवत असेल की, हेच लोक दररोज डिजिटल इंडियाची कशी थट्टा करत असत. भारताने कोरोनाविरुद्ध जगातील सर्वात प्रभावी लस बनवली. या लोकांनी आमच्या लसींवरही प्रश्न उपस्थित केले. आणि आत्ताच कोणीतरी मला सांगत होते की 'व्हॅक्सिन वॉर' नावाचा एक नवीन चित्रपट बनवण्यात आला आहे आणि लसीवर आधारित या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे डोळे उघडतील. 'व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अद्भुत कार्यावर आणि देशातील कोट्यवधी लोकांचे जीव कसे वाचवले याचे चित्रण आहे.
बंधू आणि भगिनींनो,
हेच लोक आपल्या भारतीय सैन्याच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि भारतीय सैनिकांच्या शौर्यावर शंका घेतात. त्यांना आपल्या देशाच्या शत्रूंचे आणि दहशतवाद्यांचे शब्द खरे वाटतात. पण, त्यांना आपल्या देशाच्या सैन्याच्या आणि सैनिकांच्या शब्दांवर विश्वास ठेवावा वाटत नाही. तुम्ही हे देखील पाहिले असेल की स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यावर संपूर्ण देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. हा भाजपचा कार्यक्रम नव्हता तर तो संपूर्ण देशाचा कार्यक्रम होता. स्वातंत्र्य हा भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी उत्सव होता. पण या लोकांनी 'स्वातंत्र्याच्या अमृत काळा'चीही खिल्ली उडविली. आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात अमृत सरोवर बांधत आहोत, जलसंवर्धनाची मोठी मोहीम राबवत आहोत. पण या लोकांना या कामाबद्दलही तिटकारा आहे.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे देशात सरकार चालवणाऱ्या पक्षाने आदिवासी समाजाचा कधीच आदर केला नाही. स्वातंत्र्यलढ्यापासून ते सांस्कृतिक वारशाच्या समृद्धतेपर्यंत, आपल्या आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. गोंड समाज हा जगातील सर्वात मोठ्या आदिवासी समाजांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो - जे लोक दीर्घकाळ सत्तेत होते त्यांनी आदिवासी समाजाच्या योगदानाला राष्ट्रीय मान्यता का दिली नाही? देशाला यासाठी भाजपाची वाट का पाहावी लागली? आपल्या तरुण आदिवासींना हे माहित असले पाहिजे. त्यांचा जन्म होण्यापूर्वीच अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने आदिवासी समाजासाठी एक वेगळे मंत्रालय स्थापन केले होते आणि स्वतंत्र अंदाजपत्रक देखील दिले होते. गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने हे अंदाजपत्रक अनेक पटींनी वाढवले आहे. देशाला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती देण्याचा मानही भाजपला मिळाला आहे. भाजप सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केले. देशातील सर्वात आधुनिक रेल्वे स्थानकांपैकी एकाचे नाव राणी कमलापती यांच्या नावावर ठेवण्यात आले. पाताळपाणी स्थानक आता जननायक तंट्या भिल म्हणून ओळखले जात आहे. आणि आज येथे गोंड समुदायाच्या प्रेरणास्थान असलेल्या राणी दुर्गावती जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावावर असे भव्य आणि आधुनिक स्मारक बांधले जात आहे. या संग्रहालयात गोंड संस्कृती, गोंड इतिहास आणि कला देखील प्रदर्शित केली जाईल. भावी पिढ्यांना समृद्ध गोंड परंपरेबद्दल जाणून घेता यावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. जेव्हा मी जगातील नेत्यांना भेटतो तेव्हा मी त्यांना गोंड चित्रे भेट देतो. जेव्हा ते या अद्भुत गोंड कलेचे कौतुक करतात तेव्हा माझे हृदय प्रचंड अभिमानाने भरून येते.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतर अनेक दशके देशात सत्ता गाजवणाऱ्या पक्षाने केवळ एकच काम केले आणि ते म्हणजे एका कुटुंबाची पूजा करणे. एका कुटुंबाशिवाय त्यांना देशाची पर्वाच नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे केवळ त्या एका कुटुंबाचे काम नव्हते. देशाचा विकासही केवळ त्या एका कुटुंबाने साध्य केलेला नाही. हे आमचेच सरकार आहे, ज्याने सर्वांप्रति आदर दाखवला आणि सर्वांची काळजी घेतली. या भाजप सरकारने डॉ. बाबा साहेब आंबेडकरांशी संबंधित स्थळांना महू या शहरासह जगभरातील पाच ठिकाणी 'पंचतीर्थ' बनवले आहे. काही आठवड्यांपूर्वी, मला सागर येथील संत रविदासजींच्या स्मृतिस्थळाचे भूमिपूजन करण्याची संधीही मिळाली. यावरून भाजप सरकारची सामाजिक सौहार्द आणि वारशाप्रती असलेली वचनबद्धता दिसून येते.
मित्रांनो,
घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला पोसणाऱ्या पक्षांनी आदिवासी समाजाच्या संसाधनांची लूट केली आहे. 2014 पूर्वी फक्त 8-10 वनउत्पादनांनाच किमान आधारभूत किंमत दिली जात होती. उर्वरित वनउत्पादन काही लोक अतिशय कमी किमतीत खरेदी करत आणि आदिवासींना काहीच मिळत नव्हते. आम्ही ही परिस्थिती बदलली आणि आज सुमारे 90 वनउत्पादने किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणली आहेत.
मित्रांनो,
पूर्वी, आमच्या आदिवासी शेतकऱ्यांनी आणि आमच्या लहान शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कोदो कुटकीसारख्या भरड धान्यांनाही फारसे महत्त्व दिले जात नव्हते. तुम्ही पाहिले असेल की जगभरातून मोठे नेते G20 शिखर परिषदेसाठी दिल्लीत आले होते. अनेक नेते आले होते. आम्ही या नेत्यांना आपल्या कोदो आणि कुटकीपासून बनवलेले पदार्थही खायला दिले. भाजप सरकार तुमची कोदो, कुटकी 'श्री अन्न'च्या रूपात देश-विदेशातील बाजारपेठेत पोहोचवू इच्छिते. आदिवासी शेतकरी आणि लहान शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
भाजपच्या दुहेरी इंजिन सरकारचे प्राधान्य वंचितांना महत्त्व देण्याला आहे. गरिबांच्या आरोग्यासाठी आणि महिलांच्या सोयीसाठी नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवणे खूप महत्वाचे आहे. आजही येथील सुमारे 1600 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी व्यवस्था उभी करण्यात आली आहे. महिलांचे आरोग्य हे नेहमीच देशाचे प्राधान्य क्षेत्र असले पाहिजे. परंतु याकडेही यापूर्वी सतत दुर्लक्ष केले जात होते. भाजपने ‘नारीशक्ती वंदन अधिनियमा’च्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभेत महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे कामही केले आहे.
मित्रांनो,
आपल्या विश्वकर्मा बांधवांचे गावाच्या सामाजिक-आर्थिक जीवनात मोठे योगदान आहे. त्यांना सक्षम बनवणे हे आधीपासूनच सरकारचे प्राधान्य क्षेत्र असायला हवे होते. परंतु 13 हजार कोटी रुपयांची पंतप्रधान विश्वकर्मा योजना भाजप सरकार स्थापन झाल्यानंतरच आणण्यात आली.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
भाजप सरकार हे गरिबांचे सरकार आहे. काही लोक भ्रष्टाचार आणि घराणेशाही वाढवण्यासाठी सर्व प्रकारच्या कुटील युक्त्या वापरत आहेत. परंतु मोदींची हमी आहे की मध्य प्रदेश विकासाच्या बाबतीत अव्वल असेल. मला विश्वास आहे की महाकौशल आणि मध्य प्रदेश मोदींच्या भाजप सरकारच्या या संकल्पाला बळकटी देईल. पुन्हा एकदा, मी शूर राणी दुर्गावतीजींना अभिवादन करतो. आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात, याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आता मी म्हणेन - राणी दुर्गावती, आणि तुम्ही म्हणाल - अमर रहे! अमर रहे! राणी दुर्गावती - अमर रहे! अमर रहे!
हा जयघोष संपूर्ण मध्य प्रदेशात दुमदुमला पाहिजे.
राणी दुर्गावती - अमर रहे! अमर रहे!
राणी दुर्गावती - अमर रहे! अमर रहे!
राणी दुर्गावती - अमर रहे! अमर रहे!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
खूप खूप धन्यवाद.
* * *
आशिष सांगळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202482)
आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam