पंतप्रधान कार्यालय
नेपाळच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले मुद्रित निवेदन
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2023 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2023
परम आदरणीय पंतप्रधान 'प्रचंड' जी, दोन्ही शिष्टमंडळांमधील सदस्यगण, माध्यमांमधील आमचे मित्रहो,
नमस्कार!
सर्वप्रथम, मी पंतप्रधान प्रचंडजी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात मनःपूर्वक स्वागत करतो. मला आठवते, 9 वर्षांपूर्वी, 2014 मध्ये, मी पदभार स्वीकारल्याच्या तीन महिन्यांच्या आत नेपाळला मी पहिली भेट दिली होती. त्यावेळी मी भारत-नेपाळ संबंधांसाठी एक "HIT" सूत्र दिले होते, HIT म्हणजे - हायवेज (Highways) म्हणजे महामार्ग, आय-वेज (Information-ways) म्हणजे माहितीचे मार्ग, आणि ट्रान्स-वेज (Transport-ways) म्हणजे वाहतूक मार्ग. मी त्यावेळी म्हटले होते की, आपण भारत आणि नेपाळ यांच्यात असे दुवे स्थापित करू, ज्यामुळे आपल्या सीमा आपल्यामध्ये अडथळे (Barriers) ठरणार नाहीत.
तेलाची निर्यात ट्रक्सऐवजी पाईपलाईनमधून व्हावी.
दोन्ही देशांना सामायिक असलेल्या नद्यांवर पूल बांधले जावेत.
नेपाळमधून भारतात वीज निर्यात करण्यासाठी सुविधा निर्माण व्हाव्यात.
मित्रांनो,
आज 9 वर्षांनंतर, मला हे सांगताना आनंद होत आहे की, आमची भागीदारी खऱ्या अर्थाने "HIT" ठरली आहे…..गाजली आहे. गेल्या 9 वर्षांत, आम्ही विविध क्षेत्रांमध्ये अनेक यशस्वी कामगिऱ्या बजावत, मापदंड स्थापित केले आहेत. नेपाळमधील पहिली एकात्मिक तपास चौकी (आयसीपी- Integrated Check Post) बिरगंजमध्ये तयार झाली आहे. आपल्या प्रदेशातील पहिली सीमापार पेट्रोलियम तेलवाहिनी भारत आणि नेपाळदरम्यान तयार झाली. आपल्यामध्ये पहिला ब्रॉड-गेज (सर्वसाधारण रुंद रेल्वेमार्ग स्थापित झाला आहे. सीमेपलीकडे नवीन वीज पारेषण वाहिन्या (Transmission Lines) बांधल्या गेल्या आहेत. आम्ही आता नेपाळमधून 450 मेगावॅटहून अधिक वीज आयात करत आहोत. आता 9 वर्षांत कमावलेले सर्व यश सांगायला सुरुवात केली, तर आपल्याला संपूर्ण दिवस लागेल.
मित्रांनो,
आज पंतप्रधान प्रचंडजी आणि मी, भविष्यात आमची भागीदारी गाजत रहावी यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आज परस्पर आदानप्रदानासाठीचा संक्रमण करार (Transit Agreement) संपन्न झाला आहे.
या करारामध्ये, नेपाळच्या लोकांसाठी नवीन रेल्वे मार्गांसह, भारताच्या आंतर्देशीय जलमार्गांची (Inland Waterways अर्थात भारताच्या विविध भागांना जोडणारे जलमार्ग) सुविधा देखील प्रदान करण्यात आली आहे. नवीन भागांना जोडणारे रेल्वेमार्ग स्थापन करून प्रत्यक्ष संपर्क (Physical Connectivity) वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
यासोबतच, नेपाळमधील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी भारतीय रेल्वे प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
नेपाळच्या दूर पश्चिम भागातील दळणवळणाला चालना देण्यासाठी, शीर्षा आणि झुलाघाट येथे आणखी दोन पूल बांधले जातील.
सीमापार (दुसऱ्या देशात करता येणाऱ्या) डिजिटल पेमेंटद्वारे आर्थिक संपर्क व्यवस्था वाढवण्यासाठी उचललेल्या पावलांचे आम्ही स्वागत करतो. हजारो विद्यार्थी, लाखो पर्यटक आणि यात्रेकरू तसेच वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेले रुग्ण यांनाही याचा लाभ मिळेल. तीन "आयसीपीज" (ICPs) च्या उभारणीमुळे आर्थिक संपर्क व्यवस्था मजबूत होईल.
गेल्या वर्षी, आम्ही ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठी एक ऐतिहासिक भविष्यकालीन आराखडा( व्हीजन डॉक्युमेंट) स्वीकारला होता. तो पुढे नेत, आज भारत आणि नेपाळमध्ये दीर्घकालीन ऊर्जा व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या करारानुसार, आम्ही पुढील दहा वर्षांत नेपाळमधून 10,000 मेगावॅट वीज आयात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
फुकोट-कर्णाली आणि निम्न (लोअर) अरुण जलविद्युत प्रकल्पांवरील करारामुळे ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत झाले आहे. मोतिहारी-अमलेखगंज पेट्रोलियम तेलवाहिनीमुळे होत असलेला उत्तम लाभ पाहता, ही तेलवाहिनी चितवनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, पूर्व नेपाळमधील सिलीगुडी ते झापापर्यंत आणखी एक नवीन तेलवाहिनी देखील बांधली जाईल.
त्याचबरोबर, चितवन आणि झापा येथे नवीन साठवणूक केंद्र (Storage Terminals) देखील स्थापित केले जातील. नेपाळमध्ये खत कारखाना उभारण्यासाठी परस्पर सहकार्यावरही आम्ही सहमत झालो आहोत.
मित्रांनो,
भारत आणि नेपाळमधील धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध खूप जुने आणि मजबूत आहेत. या सुंदर दुव्याला अधिक बळकट करण्यासाठी, पंतप्रधान प्रचंडजी आणि मी, रामायण (तीर्थक्षेत्र पर्यटन जाळे) सर्किटशी संबंधित प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही आमच्या संबंधांना हिमालयाची उंची देण्यासाठी निरंतर काम करत राहू. आणि याच भावनेतून आम्ही सर्व समस्या, मग त्या सीमाविषयक असोत किंवा इतर कोणत्याही, सोडवू.
परम आदरणीय,
पंतप्रधान प्रचंडजी, तुम्ही उद्या इंदूर आणि धार्मिक शहर उज्जैनला भेट द्याल. मला खात्री आहे की, तुमची उज्जैन भेट ऊर्जेने परिपूर्ण असेल आणि पशुपतिनाथ ते महाकालेश्वर या प्रवासात तुम्हाला आध्यात्मिक अनुभव देखील मिळेल.
तुमचे खूप खूप आभार.
* * *
आशिष सांगळे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201979)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam