पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेतील विशेष चर्चेमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 08 DEC 2025 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025

 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

मी आपले आणि सदनातील सर्व माननीय सदस्यांचे हार्दिक आभार मानतो, आपण या महत्त्वाच्या क्षणानिमित्त एक सामूहिक चर्चेचा निर्णय घेतला. ज्या मंत्राने, ज्या जयघोषाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा दिली होती, प्रेरणा दिली होती, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला होता, त्या वंदे मातरमचे पुण्यस्मरण करणे, हे या सदनातील आपल्या सर्वांचे खूप मोठे भाग्य आहे. आणि आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की वंदे मातरमच्या 150 वर्षांनिमित्त या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार ठरत आहोत. एक असा कालखंड जो आपल्या समोर इतिहासातल्या अगणित घटना समोर घेऊन येतो. ही चर्चा सदनाची वचनबद्धता तर प्रकट करेलच त्याचसोबत आगामी पिढ्यांसाठीही, प्रत्येक पिढीसाठी शिकवण ठरू शकेल, जर आपण सर्वांनी मिळून याचा सदुपयोग केला तर.

आदरणीय अध्यक्ष जी,

हा एक असा कालखंड आहे जेव्हा इतिहासातील अनेक प्रेरणादायी अध्याय पुन्हा एकदा आपल्यासमोर उलगडत आहेत. आपण नुकतीच आपल्या संविधानाची 75 वर्षे मोठ्या अभिमानाने साजरी केली. देश सरदार वल्लभभाई पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंतीदेखील साजरी करत आहे आणि आपण नुकतेच गुरू तेग बहादूर जी यांच्या 350 व्या बलिदान दिवसाचे स्मरण केले आणि आज आपण वंदे मातरमच्या 150 वर्षांनिमित्त सदनाच्या सामूहिक ऊर्जेची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. वंदे मातरमची 150 वर्षांची ही यात्रा अनेक टप्प्यातून गेली आहे.

परंतु आदरणीय अध्यक्ष जी,

वंदे मातरमला जेव्हा 50 वर्ष झाली तेव्हा देश गुलामगिरीत जगत होता आणि वंदे मातरमला जेव्हा 100 वर्ष झाली तेव्हा देश आणीबाणीच्या बेड्यांमध्ये अडकला होता. जेव्हा वंदे मातरमची 100 वर्ष साजरी होत होती, तेव्हा भारतीय संविधानाची पायमल्ली करण्यात आली. जेव्हा वंदे मातरमची 100 वर्ष साजरी होत होती, तेव्हा देशभक्तीसाठी जगण्यामरणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. ज्या वंदे मातरमच्या गीताने देशाच्या स्वातंत्र्याला ऊर्जा दिली होती, त्या गीताचा शतकमहोत्सव साजरा होत असताना दुर्दैवाने आपल्या इतिहासात एका काळ्या अध्यायाची नोंद होत होती. आपली लोकशाही स्वतःच भयंकर ताणाखाली होती.

आदरणीय अध्यक्ष जी,

150 वर्ष, ही या महान अध्यायाला, त्या वैभवाला पुन्हा स्थापित करण्याची संधी आहे आणि मला वाटते की सदन आणि देश दोघांनीही ही संधी गमावू नये. वंदे मातरमने 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य संग्रामाचे भावनात्मक नेतृत्व या वंदे मातरमच्या जयघोषात होते.

आदरणीय अध्यक्ष जी,

आपल्या समोर आज जेव्हा मी वंदे मातरमच्या 150 वर्षानिमित्त चर्चेचा प्रारंभ करण्यासाठी उभा आहे तेव्हा येथे कोणी पक्ष, विरोधी पक्ष नाही. कारण आपण सर्व येथे जे बसलो आहोत, खरे तर आपल्यासाठी ऋण स्वीकारण्याची ही संधी आहे. ज्या वंदे मातरममुळे ध्येयवादी लोकांनी स्वातंत्र्य चळवळ चालवली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण सर्व येथे बसलो आहोत आणि म्हणूनच, आम्हा सर्व खासदारांसाठी, आम्हा सर्व लोकप्रतिनिधींसाठी, वंदे मातरमचे ऋण स्वीकारण्याचा हा एक पवित्र क्षण आहे. आणि यातून आपण प्रेरणा घेऊन, वंदे मातरमच्या ज्या भावनेने देशाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, संपूर्ण देश एकस्वरात वंदे मातरमचा जयजयकार करत पुढे गेला, पुन्हा एकदा अशी संधी आली आहे की, चला, आपण सर्वजण मिळून वाटचाल करूया, देशाला सोबत घेऊन वाटचाल करूया, स्वातंत्र्यसैनिकांनी जी स्वप्ने पाहिली होती ती पूर्ण करण्यासाठी, वंदे मातरम 150 आपल्या सर्वांसाठी प्रेरणा ठरो, आपल्या सर्वांसाठी ऊर्जा होवो आणि देश आत्मनिर्भर होवो, 2047 मध्ये विकसित भारत आपण निर्माण करू, या संकल्पाचा पुनरुच्चार करण्यासाठी हे वंदे मातरम आपल्यासाठी एक खूप मोठी संधी आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

दादा , तब्येत ठीक आहे ना ! नाही, कधी कधी या वयात होते असे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

वंदे मातरमच्या या प्रवासाची सुरुवात बंकिमचंद्र जी यांनी 1875 मध्ये केली होती आणि अशा वेळी हे गीत लिहिले होते जेव्हा 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिश साम्राज्य हादरले होते. भारतावर विविध प्रकारे दबाव टाकला जात होता , विविध प्रकारे अत्याचार केले जात होते आणि इथल्या लोकांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले जात होते. इंग्रजांद्वारे त्यावेळचे त्यांचे जे राष्ट्रीय गीत होते, गॉड सेव्ह द क्वीन, ते भारतातील प्रत्येक घराघरात पोहचवण्याचे कारस्थान रचले जात होते . त्याच वेळी बंकिम दा यांनी त्याला आव्हान दिले आणि अधिक जोमाने प्रत्युत्तर दिले आणि त्यातूनच वंदे मातरम् चा जन्म झाला. त्यानंतर काही वर्षांनी, 1882 मध्ये, जेव्हा बंकिमचंद्र यांनी आनंद मठ लिहिली, तेव्हा या गीताचा त्यात अंतर्भाव करण्यात आला.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

वंदे मातरम् ने हजारो वर्षांपासून भारताच्या नसानसांत जो विचार भिनलेला होता, तो पुनरुज्जीवित केला. त्याच भावनेला, त्याच मूल्यांना, त्याच संस्कृतीला, त्याच परंपरेला त्यांनी अगदी मर्मभेदी शब्दांमधून, उदात्त भावनेसह वंदे मातरम् च्या रूपाने आपणा सर्वांना खूप मोठी भेट दिली होती. वंदे मातरम् केवळ राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा मंत्र नव्हता , ब्रिटिश निघून जावेत आणि आपण पुन्हा उभे राहू, आपल्या मार्गाने चालू एवढ्यापुरते वंदे मातरम् प्रेरित करत नव्हते , तर त्याची परिणामकारता त्याही पलिकडची होती. हा स्वातंत्र्यलढा मातृभूमीला मुक्त करण्याची देखील लढाई होती. भारत मातेला त्या जोखडातून मुक्ती मिळवून देण्याची एक पवित्र लढाई होती आणि वंदे मातरमच्या पार्श्वभूमीवर पाहिले , त्याचे संस्कार सरिता पाहिली तर आपल्याकडे वेद काळापासून एक गोष्ट वारंवार आपल्यासमोर आली आहे . जेव्हा वंदे मातरम म्हणतो, तेव्हा तीच वेद काळातील गोष्ट आपल्याला आठवते. वेदकाळात म्हटले आहे , "माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः" म्हणजेच ही भूमी माझी माता आहे आणि मी पृथ्वीचा पुत्र आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

हाच विचार जो प्रभू श्रीरामांनीही लंकेचे वैभव सोडताना सांगितला होता , "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी"। वंदे मातरम् हा याच महान सांस्कृतिक परंपरेचा एक आधुनिक अवतार आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

बंकिम दा यांनी जेव्हा वंदे मातरम् ची रचना केली, तेव्हा ते अगदी स्वाभाविकपणे स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बनले. पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण, वंदे मातरम् हा प्रत्येक भारतीयाचा संकल्प बनला . म्हणूनच वंदे मातरम् च्या स्तुतीमध्ये लिहिले गेले होते, “मातृभूमि स्वतंत्रता की वेदिका पर मोदमय, मातृभूमि स्वतंत्रता की वेदिका पर मोदमय, स्वार्थ का बलिदान है, ये शब्द हैं वंदे मातरम, है सजीवन मंत्र भी, यह विश्व विजयी मंत्र भी, शक्ति का आह्वान है, यह शब्द वंदे मातरम। उष्ण शोणित से लिखो, वक्‍तस्‍थलि को चीरकर वीर का अभिमान है, यह शब्द वंदे मातरम।”

आदरणीय अध्यक्ष महोदय,

काही दिवसांपूर्वी, जेव्हा वंदे मातरम् च्या 150 व्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मी म्हटले होते, वंदे मातरम् हजारो वर्षांची सांस्कृतिक ऊर्जा देखील होती. त्यात स्वातंत्र्याचा जोशपूर्ण उत्साह देखील होता आणि स्वतंत्र भारताचे स्वप्नही होते. ब्रिटिश राजवटीत भारताला दुर्बल, निरुपयोगी , आळशी आणि निष्क्रिय म्हणून हिणवण्याची एक फॅशन बनली होती आणि आपल्याकडेही त्यांनी तयार केलेले लोक देखील तीच भाषा बोलत होते. तेव्हा बंकिम दा यांनी ती हीन भावना झटकून टाकण्यासाठी आणि सामर्थ्याची ओळख करून देण्यासाठी वंदे मातरम् च्या माध्यमातून भारताचे शक्तिशाली रूप प्रकट करताना लिहिले होते , त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी,कमला कमलदलविहारिणी, वाणी विद्यादायिनी। नमामि त्वां नमामि कमलाम्, अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरम्॥ वन्दे मातरम्॥ म्हणजे भारत माता ही ज्ञानाची आणि समृद्धीची देवता तर आहेच, पण ती शत्रूंविरुद्ध अस्त्रे -शस्त्रे धारण करणारी चंडिका देखील आहे .

अध्यक्ष जी, हे शब्द, हा भाव, ही प्रेरणा, गुलामीच्या निराशेत आपणा भारतीयांना उमेद देणारे होते. या शब्दांनी तेव्हा कोट्यवधी देशवासियांना याची अनुभूती दिली की ही लढाई एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी नाही, ही लढाई सत्तेचे सिंहासन प्राप्त करण्यासाठी नाही तर गुलामीच्या बेड्यांमधून मुक्त करत हजारो वर्षांच्या परंपरा, महान संस्कृती, गौरवशाली इतिहासाला नवजीवन देण्याचा संकल्प यामध्ये आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

वंदे मातरम् ची जनतेशी जी भावनिक जवळीक होती, ती आपल्या स्वातंत्र्य लढ्यातली दीर्घ गाथा उलगडते.

आदरणीय अध्यक्ष जी,

जेव्हा एखाद्या नदीविषयी चर्चा होते, मग सिंधु असो, सरस्वती असो, कावेरी असो, गोदावरी असो, गंगा असो, यमुना असो त्या नदीसमवेत एक सांस्कृतिक प्रवाह, विकासाच्या वाटचालीचा ओघ, जनतेच्या जीवनाचा ओघ जोडलेला असतो. पण स्वातंत्र्य लढ्याचा प्रत्येक टप्पा, संपूर्ण प्रवास, वंदेमातरम् या भावनेने भारलेला होता याचा कोणी विचार केला आहे का? हा प्रवास त्याच्या काठावर पल्लवित होत असे, असे भावोत्कट काव्य कदाचित अवघ्या जगात कोठे नसेल.

आदरणीय अध्यक्ष जी,

आपल्याला आता भारतात जास्त काळ टिकाव धरता येणार नाही, हे 1857 नंतर इंग्रज समजून चुकले होते. आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी जोपर्यंत भारताचे विभाजन करणार नाही, जोपर्यंत भारताचे तुकडे पडणार नाही, भारतातल्या लोकांचे आपसात कलह लागणार नाही, तोपर्यंत इथे राज्य करणे कठीण आहे हे त्यांनी ओळखले आणि इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ हा मार्ग निवडला आणि त्यांनी बंगालवर याचा प्रयोग केला. कारण एक काळ होता जेव्हा बंगालचे बौद्धिक सामर्थ्य देशाला दिशा देत असे, देशाला सामर्थ्य देत असे, देशाला प्रेरणा देत असे हे इंग्रजांनी जाणले होते आणि म्हणूनच बंगालचे हे सामर्थ्य आहे ते एक प्रकारे संपूर्ण देशाच्या सामर्थ्याचे एक प्रकारे केंद्र बिंदू आहे, हे इंग्रज ओळखून होते आणि म्हणूनच इंग्रजांनी सर्वात आधी बंगालचे तुकडे करण्याच्या दिशेने काम केले. एकदा बंगालचे तुकडे केले की हा देशही विखुरला जाईल आणि यावच चन्द्र-दिवाकरौ ते आपल्यावर राज्य करू शकतील असा त्यांचा विचार होता. 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, मात्र इंग्रजांनी 1905 मध्ये जेव्हा हे पाप केले तेव्हा वंदे मातरम् एखाद्या अभेद्य खडकाप्रमाणे समोर ठाकले. बंगालच्या एकतेसाठी वंदे मातरम् चा नादघोष गल्लोगल्ली घुमू लागला होता आणि हाच जयघोष प्रेरणा देत होता. बंगालच्या फाळणीसह भारताला दुर्बल करण्याची बीजे त्यांनी रोवली होती. मात्र वंदेमातरम् एक आवाज, एक सूत्र म्हणून इंग्रजांसाठी आव्हान बनले आणि देशासाठी अभेद्य ढाल बनू लागले.

आदरणीय अध्यक्ष जी,

बंगालचे विभाजन तर झाले, मात्र अतिशय मोठी स्वदेशी चळवळ उभी राहिली आणि तेव्हा चहु बाजूंनी वंदेमातरम् चा नाद निनादत होता. बंगालच्या धरतीवरून निघालेले बंकिमदा यांचे हे भाव सूत्र… बंकिम बाबू म्हणू, अच्छ धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद, आपल्या भावनांचा मी आदर करतो. बंकिम बाबू यांनी धन्यवाद दादा, धन्यवाद, आपल्याला दादा तर म्हणू शकतो ना, की त्यावरही आपला आक्षेप राहील. बंकिम बाबू यांनी जे भाव विश्व तयार केले होते, त्या गीताने इंग्रजांचे स्थान डळमळीत केले होते. यावर कायदेशीर निर्बंध आणणे इंग्रजांना भाग पडले यावरून या गीताचे सामर्थ्य आणि इंग्रजांची दुर्बलता किती असेल हे लक्षात येते. गायनावर शिक्षा, छापण्यावर शिक्षा इतकेच नव्हे वंदेमातरम् शब्द उच्चारल्यासही शिक्षा, इतके कडक कायदे लागू करण्यात आले होते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत शेकडो महिलांनी नेतृत्व केले, लाखो महिलांनी योगदान दिले. एका घटनेचा मी उल्लेख करू इच्छितो, बारिसाल, बारिसालमध्ये वंदेमातरम् गायनावरून सर्वाधिक अत्याचार झाले होते. बारिसाल आता भारताचा भाग राहिला नाही, मात्र त्या काळात बारिसाल इथे आपल्या माता-भगिनी, मुले वंदे मातरम् च्या स्वाभिमानासाठी, या संदर्भातल्या निर्बंधाविरोधातल्या लढ्यात उतरली होती. तेव्हा बारिसाल मधल्या वीरांगना श्रीमती सरोजिनी घोष, यांनी त्या काळच्या तिथल्या भावना पहा, त्यांनी सांगितले, वंदेमातरम् वर ही जी मनाई आहे, ती हटेपर्यंत मी बांगड्या घालणार नाही. भारतात त्या काळात बांगड्या उतरवणे ही स्त्रियांच्या जीवनातली फार मोठी घटना मानली जात असे, मात्र वंदेमातरम् साठी त्यांची ही भावना होती. जोपर्यंत वंदेमातरम् वरील निर्बंध मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत आपल्या सोन्याच्या बांगड्या घालणार नाही, असे मोठे व्रत त्यांनी घेतले होते.

आपल्या देशातील लहान मुलेही मागे नव्हती, त्यांना फटक्यांची शिक्षा होत असे. लहान-अल्पवयीन मुलांनांही तुरुंगात डांबले जात होते आणि त्या काळी विशेषतः बंगालच्या गल्लीबोळांमधून सतत वंदे मातरमसाठी प्रभात फेऱ्या निघत असत. त्यांनी इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते आणि त्या काळात बंगालमध्ये एका गीताचे सूर निनादत होते- जाए जाबे जीवोनो चोले, जाए जाबे जीवोनो चोले, जोगोतो माझे तोमार काँधे वन्दे मातरम बोले, या गीताचा अर्थ हे माते, जगात तुझ्यासाठी कार्य करण्यात आणि वंदे मातरम म्हणण्यात सारे आयुष्य गेले, तरी ते जीवन धन्य आहे. बंगालच्या गल्ल्या-गल्ल्यांमधली लहान मुले हे गाणे म्हणत होती. या गाण्यात त्या मुलांचा धाडसी सूर मिसळलेला होता आणि त्या मुलांच्या हिंमतीने देशाला हिंमत दिली होती. बंगालच्या गल्ल्यांमधून उमटणारा आवाज देशाचा आवाज बनला होता. 1905 मध्ये हरितपूर या गावातील अगदी लहान-लहान वयाची मुले, वंदे मातरमचे नारे देत होती, तेव्हा इंग्रजांनी त्यांना निर्दयपणे चाबकाचे फटके मारले होते. या ना त्या प्रकारे जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढण्यास भाग पाडले गेले होते. इतके अत्याचार केले गेले होते. 1906 मध्ये नागपूरमध्ये नील सिटी हायस्कूलच्या मुलांवरही इंग्रजांनी असेच अत्याचार केले होते. त्यांचा गुन्हा फक्त हाच होता की, ते उभे राहून सामुहिकरीत्या वंदे मातरम म्हणत होते. वंदे मातरमसाठी, या मंत्राचे माहात्म्य आपल्या ताकदीने सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत होते. आपल्या भारतमातेचे धाडसी सुपुत्र कोणतेही भय न बाळगता फासावर चढत होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या मनात वंदे मातरम, वंदे मातरम वंदे मातरमचाच घोष भिनलेला होता. खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, रोशन सिंह, राजेन्द्रनाथ लाहिरी, रामकृष्ण विश्वास अशा कितीतरी जणांनी वंदे मातरम म्हणत निर्भयपणे फासावर चढले. पण पहा, हे वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये घडत होतं, निरनिराळ्या भागात सुरू होतं. प्रक्रिया करणारे चेहरे वेगळे होते, लोक वेगळे होते, ज्यांच्यावर जुलूम केले जात होते, त्यांच्या भाषाही वेगवेगळ्या होत्या. मात्र एक भारत, श्रेष्ठ भारत, या सगळ्यांचा मंत्र एकच होता, वंदे मातरम. चितगावच्या स्वराज्य क्रांतीमध्ये ज्या युवकांनी इंग्रजांना आव्हान दिले, ती देखील इतिहासातील गाजलेली नावं आहेत. हरगोपाल कौल, पुलिन विकाश घोष, त्रिपुर सेन या सर्वांनी देशासाठी आपले बलिदान दिले. मास्टर सूर्य सेन यांना 1934 मध्ये जेव्हा फाशी देण्यात आली तेव्हा त्यांनी आपल्या मित्रांना एक पत्र लिहिलं होतं, त्या पूर्ण पत्रात एकच शब्द प्रतिध्वनीत होत होता, तो शब्द होता वंदे मातरम.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आपणा सर्व देशवासीयांना अभिमान वाटला पाहिजे, जगाच्या इतिहासात असे कुठले काव्य नसेल, असे कुठले भाव गीत नसेल, ज्याने शतकांपर्यंत एका ध्येयासाठी कोट्यवधी लोकांना प्रेरित केले असेल आणि ज्यामुळे जीवनाची आहुती देण्यास लोक प्रवृत्त झाले असतील. जगात वंदे मातरम सारखे असे कुठलेही भाव गीत असू शकत नाही. सगळ्या जगाला हे कळले पाहिजे की. गुलामगिरीच्या काळातही असे लोक आपल्या येथे जन्माला येत होते, जे अशा प्रकारच्या भाव गीताची रचना करू शकत होते. हे जगासाठी एक आश्चर्य आहे, आपण अभिमानाने ते म्हटले पाहिजे, तर जग देखील त्याचा गौरव करण्यास सुरूवात करेल, हा आपल्या स्वातंत्रलढ्याचा मंत्र होता. हा बलिदानाचा मंत्र होता , हा उर्जेचा मंत्र होता. हा सत्त्वशीलतेचा मंत्र होता, हा समर्पणाचा मंत्र होता, हा त्यागाचा आणि तपस्येचा मंत्र होता, संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देणारा हा मंत्र होता आणि तो मंत्र वंदे मातरम हा होता, आणि म्हणूनच गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी जे लिहिले होते, त्यामध्ये म्हटले होते की, एक कार्ये सोंपियाछि सहस्र जीवन—वन्दे मातरम्, म्हणजे सहस्रावधी मने ज्या एकाच धाग्याने बांधली गेली आहेत, सहस्रावधी आयुष्यांनी ज्या एकाच कार्याला वाहून घेतले आहेत ते म्हणजे वंदे मातरम. असे रविंद्रनाथ टागोरांनी लिहिले होते.

आदरणीय अध्यक्ष महोदय

त्याच काळात वंदे मातरम चे रेकॉर्डिंग जगात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले होते आणि लंडनमधील जी जागा क्रांतिकारकांचे एका अर्थाने तीर्थस्थान बनले होते, त्या लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वंदे मातरम हे गीत म्हटले, तिथे या गीताचे सूर वारंवार उमटत होते. देशासाठी जगणाऱ्या-मरणाऱ्यांसाठी हा मोठा प्रेरणादायी प्रसंग असे. त्याच काळात बिपिनचंद्र पाल आणि महर्षी अरविंद घोष यांनी एक वर्तमानपत्र सुरू केले होते, त्या वर्तमानपत्राचे नाव देखील त्यांनी वंदेमातरम ठेवले होते. म्हणजेच पदोपदी इंग्रजांची झोप उडवण्यासाठी वंदे मातरम पुरेसं होतं आणि म्हणूनच त्यांनी हे नाव ठेवलं होतं. इंग्रजांनी या वर्तमानपत्रांवर बंदी घातली, तेव्हा मॅडम भिकाजी कामा यांनी पॅरिसमधून एक वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्याचं नावही त्यांनी वंदे मातरम असं ठेवलं.

आदरणीय अध्यक्ष महोदय

वंदे मातरम गीताने भारताला स्वावलंबनाचा मार्ग देखील दाखवला आहे. त्यावेळी काडेपेटीपासून मोठमोठ्या जहाजांवर देखील वंदे मातरम लिहिण्याची परंपराच निर्माण झाली आणि ते बाहेरच्या देशातील कंपन्यांना आव्हान देण्याचे एक माध्यम झाले, स्वदेशीचा मंत्र झाला. स्वदेशीच्या मंत्राप्रमाणे स्वातंत्र्याच्या मंत्राचा विस्तार होत गेला.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

मी आणखी एका घटनेचा देखील उल्लेख करू इच्छितो. 1907 मध्ये जेव्हा व्ही ओ चिदंबरम पिल्लई यांनी स्वदेशी कंपनीचे जहाज तयार केले तेव्हा त्यावर देखील लिहिले होते वंदे मातरम. राष्ट्रकवी सुब्रमण्यम भारती यांनी वंदे मातरम गीताचे तमिळ भाषेत भाषांतर केले, स्तुतीपर गाणे लिहिले. त्यांच्या अनेक देशभक्तीपर तमिळ गीतांमध्ये वंदे मातरमची श्रद्धा स्वच्छपणे दिसून येते. कदाचित सर्वांना वाटत असेल, तामिळनाडूच्या लोकांना माहित असेल, पण इतर सर्वांना हे माहित असेल किंवा नसेल, भारताचे ध्वजगीत देखील सुब्रमण्यम भारती यांनीच लिहिले होते. त्या ध्वज गीताचे वर्णन, ज्यावर वंदे मातरम आधारित आहे, तमिळ मध्ये या ध्वज गीताचे शीर्षक होते. Thayin manikodi pareer, thazhndu panintu Pukazhnthida Vareer! (तमिळ मध्ये) म्हणजेच देशप्रेमींनो दर्शन घ्या, विनयाने अभिनंदन करा, माझ्या मातेच्या दिव्य ध्वजाला अभिवादन करा.

आदरणीय अध्यक्ष महोदय

वंदे मातरम बद्दल महात्मा गांधीजींची काय मते होती हे देखील मी आज या सदनात सांगू इच्छितो. दक्षिण आफ्रिकेहून एक साप्ताहिक प्रसिध्द होत असे, इंडियन ओपिनियन आणि या इंडियन ओपिनियन मध्ये महात्मा गांधी यांनी 02 डिसेंबर 1905 रोजी जे लिहिले ते मी तुम्हांला सांगतो. त्यांनी लिहिले होते, महात्मा गांधींनी लिहिले होते, “बंकिम चंद्र यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत संपूर्ण बंगाल मध्ये अत्यंत लोकप्रिय झाले आहे, स्वदेशी आंदोलनाच्या काळात बंगालमध्ये विशाल सभा झाल्या, ज्यामध्ये लाखो लोक एकत्र आले आणि त्यांनी बंकिम यांचे हे गीत गायले.” गांधीजी पुढे लिहितात, की हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते लिहित होते ते वर्ष होते 1905. त्यांनी लिहिले, “हे गीत इतके लोकप्रिय झाले आहे की जसे काही हे गाणे आमचे राष्ट्रगीतच झाले आहे. यातील भावना अत्यंत महान आहे आणि हे इतर देशांच्या तुलनेत हे गीत अधिक सुमधुर आहे. आपल्यात देशभक्तीची भावना जागवणे हा या गीताचा एकमेव उद्देश आहे. हे गीत भारताला मातेच्या रुपात बघते आणि तिची स्तुती करते.”

अध्यक्ष जी,

जे वंदे मातरम गीत 1905 मध्ये महात्मा गांधींना राष्ट्रगीताच्या स्वरुपात दिसले होते, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात, जो कोणी देशासाठी जगत होता, देशासाठी जागत होता, त्या सर्वांसाठी वंदे मातरमची शक्ती फार मोठी होती. वंदे मातरम हे गीत इतके महान होते, त्यातील भाव इतके उदात्त होते, तर मग गेल्या शतकात या गीतावर इतका मोठा अन्याय का झाला? वंदे मातरमचा विश्वासघात का झाला? हा अन्याय का झाला? ती अशी कोणती शक्ती होती जी पूजनीय बापूजींच्या भावनांपेक्षा अधिक मजबूत ठरली? ज्यामुळे वंदे मातरम सारख्या पवित्र भावनेला देखील वादामध्ये ओढले गेले. मला वाटते की आज जेव्हा आपण वंदे मातरम ची 150 वर्षे साजरी करत आहोत, ही चर्चा करत आहोत, तेव्हा आपण त्या वेळच्या परिस्थितीची नव्या पिढीला कल्पना देणे ही देखील आपली जबाबदारी आहे. ज्या परिस्थितीमुळे वंदे मातरम चा विश्वासघात करण्यात आला. वंदे मातरमच्या विरोधात मुस्लीम लीगचे विरोधाचे राजकारण आणखी तीव्र होत होते. मोहम्मद अली जीना यांनी लखनौ मधून 15 ऑक्टोबर 1937 रोजी वंदे मातरमच्या विरुध्द युध्द छेडले. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांना स्वतःचे आसन डळमळीत होताना दिसले. नेहरूंनी मुस्लीम लीगच्या निराधार वक्तव्यांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होते, कठोर उत्तर द्यायला पाहिजे होते, मुस्लीम लीगच्या वक्तव्यांचा निषेध करायला हवा होता, आणि वंदे मातरम प्रती स्वतःची आणि काँग्रेस पक्षाची निष्ठा व्यक्त करायला हवी होती, असे करण्याऐवजी घडले ते विपरीतच. ते असे का करत आहेत हे विचारले नाही, सत्य जाणून घेतले नाही, त्यांनी तर वंदे मातरमचीच तपासणी सुरु केली. जीना यांनी विरोध केल्यानंतर पाचच दिवसांनी 20 ऑक्टोबर रोजी नेहरुजींनी नेताजी सुभाष बाबू यांना पत्र लिहिले. त्या पत्रात जीना यांच्या भावनेशी स्वतःची सहमती दर्शवत त्यांनी म्हटले आहे की वंदे मातरमची आनंदमठाची पार्श्वभूमी मुसलमानांना विचलित करू शकते. सुभाष बाबूंना लिहिलेल्या पत्रात नेहरूंनी ही बाब सांगितली. मी नेहरूजींचे वाक्य वाचतो, नेहरुजी म्हणतात, “मी वंदे मातरम गीताची पार्श्वभूमी वाचली आहे.” नंतर नेहरुजी लिहितात, “मला वाटते की ही जी पार्श्वभूमी आहे त्यामुळे मुसलमान लोक चिडतील.

मित्रांनो,

यानंतर, काँग्रेसतर्फे असे निवेदन देण्यात आले की 26 ऑक्टोबर पासून काँग्रेस कार्यकारिणीची एक बैठक कोलकाता येथे होईल आणि त्यात वंदे मातरम गीताच्या वापराचे समीक्षण केले जाईल. बंकिम बाबूंचा बंगाल, बंकिम बाबूंचा कोलकाता आणि त्याचीच निवड करण्यात आली आणि तेथेच समीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण देश हतप्रभ झाला, सारा देश आश्चर्यचकित झाला, देशभक्तांनी या प्रस्तावाच्या विरोधात संपूर्ण देशभर कानाकोपऱ्यातून प्रभात फेऱ्या काढल्या, वंदे मातरमचे गायन केले. मात्र देशाचे हे दुर्दैव होते की 26 ऑक्टोबर रोजी काँग्रेसने वंदे मातरमच्या बाबतीत तडजोड केली. वंदे मातरमचे तुकडे करण्याच्या निर्णयातून या गीताचे तुकडे झाले. या निर्णयाला असा मुखवटा घालण्यात आला, असा पडदा पांघरण्यात आला की हे तर सामाजिक सद्भावाचे कार्य आहे. मात्र इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे की काँग्रेसने मुस्लीम लीग समोर गुढगे टेकले आणि मुस्लीम लीगच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आणि लांगूलचालनाचे राजकारण करण्याची काँग्रेसची ही पद्धत होती.

माननीय अध्यक्ष महोदय,

तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या दबावामुळे काँग्रेसने वंदे मातरम् चे विभाजन स्वीकारले, त्यामुळे काँग्रेसला एक दिवस भारताच्या/देशाच्या फाळणीपुढे मान तुकवावी लागली. काँग्रेसने ते आउटसोर्स करून टाकले आहे, असे मला वाटते. दुर्देवाने, काँग्रेसची धोरणे जशीच्या तशीच राहिली आहेत एवढेच नव्हे तर इंडियन नॅशनल काँग्रेस हळूहळू एमएमसी होऊ लागली आहे. आजही काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष आणि ज्यांचे नावाशी काँग्रेसचे नाव जोडले गेले आहे, ते सर्व जण वंदे मातरम् वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

माननीय अध्यक्ष महोदय,

कोणत्याही राष्ट्राचे चारित्र्य आणि चैतन्य हे त्याच्या सर्वोत्तम काळापेक्षा आव्हानात्मक काळात आणि संकटाच्या काळात उघड होते, उजेडात येते आणि खऱ्या अर्थाने तेव्हा कसोटी लागते.

कसोटीचा काळ जेव्हा येतो, तेव्हा आपण किती दृढ आहोत, किती बळकट आहोत, किती सामर्थ्यशाली आहोत, हे सिद्ध होते. 1947मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर देशापुढची आव्हाने बदलली, देशाचे प्राधान्यक्रम बदलले, मात्र देशाचे चारित्र्य, चैतन्य कायम राहिले, तीच प्रेरणा मिळत राहिली. देशावर जेव्हा केव्हा संकटे आली, प्रत्येक वेळी वंदे मातरम् या भावनेसह देश पुढे जात राहिला. मध्यंतरीचा कालखंड कसा सरला ते सोडून देऊ या. पण आजही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी येतो, तेव्हा प्रत्येक घरावर तिरंगा फडकतो, चहुबाजूंना तीच भावना दिसते. तिरंगा फडकतो. एक काळ असाही होता जेव्हा देशामध्ये अन्नधान्याची टंचाई होती, तेव्हाही वंदे मातरम् ही भावना होती, माझ्या देशाच्या शेतकऱ्यांनी अन्नधान्याची कोठारे भरली आणि त्याही पाठीमागे भावना हीच होती वंदे मातरम्. जेव्हा देशाचे स्वातंत्र्य पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला गेला, संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसला, आणीबाणी लादली गेली, तेव्हा याच वंदे मातरम् ची ताकद होती, ज्याच्या बळावर देश या साऱ्याला पराभूत करत उभा राहिला. देशावर जेव्हा युद्धे लादली गेली, कोणत्याही संघर्षाची वेळ देशावर येऊन ठेपली, तेव्हाही हीच वंदे मातरम् ची भावना होती, ज्यामुळे देशाचे सैनिक सीमेवर खंबीरपणे उभे राहिले आणि भारत मातेचा ध्वज उंचावत राहिला आणि विजयश्री मिळवत राहिला. कोविडसारखे जागतिक संकट उभे ठाकले, तेव्हाही देश याच भावनेने खंबीरपणे उभा राहिला आणि त्याला पराभूत करून पुढे वाटचाल केली.

माननीय अध्यक्ष महोदय,

ही राष्ट्राची ताकद आहे, राष्ट्राच्या भावनेला जोडणारा सामर्थ्यशाली ऊर्जा प्रवाह आहे. ही जाणीव म्हणजे काळजी आहे, संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचे प्रतिबिंब आहे. वंदे मातरम् आपल्यासाठी केवळ आठवणींचा काळ नाही तर एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा घेण्याचा काळ होता आणि आपण त्यासाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे. आणि मी यापुर्वी म्हटल्याप्रमाणे वंदे मातरम् चे आपल्यावर कर्ज आहे, आज आपण जिथे पोहोचलो आहोत, त्या मार्गाची निर्मिती वंदे मातरम् नेच केली आहे; त्यामुळे आपण त्याचे ऋण मानतो.

वंदे मातरम भावनेची हीच ताकद आहे. वंदे मातरम् हे केवळ गाणे किंवा भाव गीत नाही, तर आपल्यासाठी ती एक प्रेरणा आहे, राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्याप्रती प्रेरित करते आणि म्हणूनच आपल्याला ते सातत्याने करत राहिले पाहिजे.

आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न उराशी बाळगतो आहोत, ते पूर्ण करायचे आहे. वंदे मातरम् आपल्यासाठी प्रेरणा आहे. आपल्याला स्वदेशी चळवळ बळकट करायची आहे, काळ बदलल असेल, स्वरूप बदलले असेल, मात्र परमपूज्य गांधीजींनी जी भावना व्यक्त केली होती, त्याच भावनेची ताकद आही आपल्यामध्ये आहे आणि वंदे मातरम् आपल्याला एकत्र जोडून ठेवते. देशातल्या महापुरुषांचे स्वप्न होते स्वतंत्र भारत, देशातल्या आजच्या पिढीचे स्वप्न आहे समृद्ध भारताचे, वंदे भारताच्या भावनेने स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार झाले, वंदे मातरम् ची भावना समृद्ध भारताचे स्वप्न साकार करेल, तीच भावा घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. आणि आत्मनिर्भर भारत, 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा आहे. स्वातंत्र्याच्या 50 वर्षांआधी कोणी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहू शकत होते तर 25 वर्षांपुर्वी आपणही समृद्ध भारताचे स्वप्न पाहू शकतो, विकसित भारताचे स्वप्न पाहू शकतो आणि ते स्वप्न साकारण्यासाठी स्वतःला समर्पितही करू शकतो. हा मंत्र आणि याच संकल्पासह वंदे मातरम् आपल्याला प्रेरणा देत राहो, वंदे मातरम् चे ऋण मान्य करू या, वंदे मातरम् ची भावना सातत्याने बाळगू या, देशबांधवांना बरोबर घेऊन जाऊ, सर्वजण एकत्र मार्गक्रमण करू या, हे स्वप्न पूर्ण करू या, याच भावनेसह या चर्चेला आज प्रारंभ करू या. दोन्ही सभागृहांमध्ये, देशात ही भावना रूजवण्यासाठीचा स्रोत ठरेल, देशाचा प्रेरणा स्रोत होईल, नव्या पिढीसाठी उर्जास्रोत ठरेल, याचबरोबर, आपण बोलण्याची संधी दिली यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो. आपले सर्वांचे खूप आभार.

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

सोनल तुपे/नेहा कुलकर्णी/नितीन फुल्लुके/यश राणे/सोनाली काकडे/सुषमा काणे/निलीमा चितळे/मंजिरी गानू/संजना चिटणीस/विजयालक्ष्मी साळवे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2200860) आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam