पंतप्रधान कार्यालय
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत झालेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
व्यवसाय असो किंवा मुत्सद्देगिरी, परस्पर विश्वास हा कोणत्याही भागीदारीचा पाया असतो; हाच विश्वास भारत-रशिया संबंधांची सर्वात मोठी ताकद; हा विश्वास संयुक्त प्रयत्नांना दिशा आणि गती देत असून तो नवीन स्वप्ने पाहण्यास आणि आकांक्षा बाळगण्यास प्रेरणा देणारा आधारस्तंभ ठरत आहे: पंतप्रधान
भारत-रशिया व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट 2030 च्या निर्धारित मुदतीच्या अगोदरच साध्य केले जाईल: पंतप्रधान
सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन (रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म) या मार्गदर्शक तत्त्वानुसार वाटचाल करणाऱ्या भारताची जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती सुरू: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2025 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 05 डिसेंबर 2025:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष माननीय व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीला संबोधित केले. पंतप्रधानांनी माननीय राष्ट्राध्यक्ष पुतीन, भारत आणि परदेशातील नेते आणि सर्व मान्यवर पाहुण्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्यासोबत मोठे शिष्टमंडळ घेऊन आले असल्याने भारत-रशिया व्यवसाय मंच हा त्यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकाराचे द्योतक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी बैठकीत सहभागी होत असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत त्यांच्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी आपले मित्र राष्ट्रपती पुतीन यांचे या मंचाच्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि त्यांचे मोलाचे विचार मांडल्याबद्दल मनापासून आभार मानले. व्यवसायासाठी सुलभ आणि खात्रीलायक अशी यंत्रणा तयार केली जात असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भारत आणि युरेशियन आर्थिक संघ यांच्यात मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू झाल्याचे नमूद केले.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितल्याप्रमाणे आणि राष्ट्रपती पुतिन यांनी अधोरेखित केलेल्या भविष्यातील शक्यतांच्या अनुषंगाने, भारत आणि रशियाला कमी कालावधीत खूप महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करणे शक्य असल्याचे मोदींनी नमूद केले. व्यवसाय असो किंवा मुत्सद्देगिरी असो, परस्पर विश्वास ही कोणत्याही भागीदारीचा पाया असतो आणि हा परस्पर विश्वास भारत-रशिया संबंधांची सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. हा विश्वास दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांना दिशा आणि गती देत असून तो नवीन स्वप्ने पाहण्यास आणि आकांक्षा बाळगण्यास प्रेरणा देणारा आधारस्तंभ ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या वर्षी आपण आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सच्या वर नेण्याचे संकल्प केला होता, याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. परंतु राष्ट्रपती पुतिन यांच्याशी नुकत्याच झालेल्या चर्चेत आणि एकंदर क्षमता पाहता हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी 2030 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही असे दिसून येत आहे. भारत आणि रशिया हे ध्येय वेळेपूर्वी साध्य करण्याच्या ठाम निर्धारासह पुढे जात आहेत, त्यांचा आत्मविश्वास अधिकाधिक वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदी पुढे म्हणाले की व्यापारात येणारे आयात-शुल्क आणि आयात-शुल्काव्यतिरिक्त इतर अडसर कमी केले जात आहेत. व्यवसाय क्षेत्रातील अग्रणी ही या प्रयत्नांची खरी ताकद असून त्यांची ऊर्जा, नवोन्मेष आणि महत्त्वाकांक्षा भारत आणि रशियाच्या सामायिक भविष्याला आकार देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गेल्या अकरा वर्षांत भारतात झालेल्या परिवर्तनाचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व वाढले असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन हे तत्त्व अनुसरत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. सुधारणांच्या या अकरा वर्षांच्या प्रवासात, भारत थकलेला नाही किंवा थांबलेला नाही, त्याचा संकल्प पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाला असून तो मोठ्या आत्मविश्वासाने आणि गतीने आपल्या ध्येयांच्या दिशेने जात आहे, यावर त्यांनी भर दिला. व्यवसाय सुलभतेत वाढ व्हावी यासाठी जीएसटीमध्ये पुढील पिढीच्या सुधारणा हाती घेण्यात आल्या असून अनुपालनाचे ओझे कमी करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. संरक्षण आणि अंतराळ ही क्षेत्रे खाजगी उद्योगांसाठी खुली झाली आहेत, त्यामुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, असे सांगून नागरी अणुऊर्जा क्षेत्रातही संधींची नवी दारे खुली होत आहेत असे ते म्हणाले. या केवळ प्रशासकीय सुधारणा नसून मानसिकतेतील सुधारणा आहेत, आणि हे सर्व विकसित भारताच्या संकल्पनेन प्रेरित असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या दोन दिवसांत अनेक मुद्द्यांवर उपयुक्त आणि अर्थपूर्ण चर्चा झाली असून, बैठकीत भारत-रशिया यांचे ज्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आहे, अशा सर्व क्षेत्रांना त्यामध्ये प्रतिनिधीत्व मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच चर्चेत सहभागींनी मांडलेल्या सूचना आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले. सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी अनेक कल्पना मांडण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीमध्ये या क्षेत्रात क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेण्यावर अध्यक्ष पुतिन आणि आपला भर असल्याचे मोदी यांनी नमूद केले. त्याचसोबत चेन्नई-व्लादिवोस्तोक कॉरिडॉरसह आयएनएसटीसी आणि उत्तर सागरी मार्गासारख्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहोत, त्यामध्ये लवकरच वाहतूकीचा वेळ तसेच खर्च कमी होण्याची आणि व्यवसायासाठी नवीन बाजारपेठा खुल्या होण्याची अपेक्षा आहे. सीमाशुल्क, लॉजिस्टिक्स आणि नियामक प्रणाली डिजिटल तंत्रज्ञानाच्या शक्तीशी जोडल्या जाऊ शकतात, ज्यामुळे सीमाशुल्क विभागाकडून जलद परवानग्या , कागदपत्रांची पूर्तता करण्याचे ओझे कमी होऊन अधिक सुरळितपणे मालवाहतूक करणे शक्य झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सागरी उत्पादनांमध्ये, रशियाने अलीकडेच दुग्धजन्य पदार्थ आणि सागरी उत्पादने निर्यात करण्यास पात्र असलेल्या भारतीय कंपन्यांची यादीत भर घातली आहे, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. भारतातील उच्च दर्जाची सागरी उत्पादने, मूल्यवर्धित समुद्री खाद्यपदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न यांना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. आणि शीत साखळीची वाहतूक व्यवस्था (लॉजिस्टिक्स), खोल समुद्रातील मासेमारी आणि मासेमारी होत असलेल्या बंदरांचे आधुनिकीकरण या क्षेत्रातील संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान भागीदारी रशियाची देशांतर्गत मागणी पूर्ण करू शकतात आणि त्याचबरोबर भारतीय उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठा उघडू शकतात, यावर त्यांनी यावर भर दिला.
ऑटोमोबाईल क्षेत्रात भारत आज परवडणाऱ्या आणि कार्यक्षम विजेवर चालणाऱ्या (ईव्ही) दुचाकी आणि सीएनजी मोबिलिटी वाहन उपक्रमात जागतिक स्तरावर आघाडीवर आहे, तर रशिया हा प्रगत साहित्याचा प्रमुख उत्पादक आहे आणि दोन्ही देश एकत्रितपणे ईव्ही उत्पादन, ऑटोमोटिव्ह भाग आणि सामायिक गतिशीलता यामध्ये सहकार्य करू शकतात, ज्यामुळे देशांतर्गत गरजा पूर्ण होऊन ग्लोबल साऊथ विशेषतः आफ्रिकेच्या विकासात योगदान देऊ शकतात,असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
औषधनिर्माण क्षेत्रात, भारत जगाला परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची औषधे पुरवतो, ज्यामुळे "जगाचे औषधालय " असे बिरूद देशाला प्राप्त झाले आहे. लसींचा विकास, कर्करोग उपचार, किरणीय प्रकारची-औषध निर्मिती आणि एपीआय पुरवठा साखमध्ये दोन्ही देश सहकार्य करू शकतात, ज्यामुळे आरोग्य सुरक्षा मजबूत होईल आणि नवीन उद्योग उभे राहतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.
कापड उद्योगाविषयी बोलताना,मोदी म्हणाले की, भारतात नैसर्गिक तंतूंपासून ते तांत्रिक पद्धतीने कापड बनविता येईल एवढी प्रचंड क्षमता आहे, ज्याला डिझाइन, हस्तकला आणि गालिचे यांमध्ये जागतिक स्तरावर ओळख आहे, तर रशिया हा पॉलिमर आणि सिंथेटिक कच्च्या मालाचा प्रमुख उत्पादक असल्याने दोन्ही देश एक मजबूत आणि टिकाऊ कापड मूल्यसाखळी निर्माण करू शकतात. खते, मातीकाम, सिमेंट उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातही सहकार्याच्या समान संधी उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.
सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यात मनुष्यबळाची गतिशीलता महत्त्वाची भूमिका बजावते यावर भर देऊन, पंतप्रधानांनी भारत 'जगाची कौशल्य राजधानी' म्हणून उदयास येत असल्याचे नमूद केले. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, बांधकाम आणि लॉजिस्टिक्समधील भारतातील युवा वर्गाच्या प्रतिभेमध्ये जागतिक गरजा पूर्ण करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रशियाच्या लोकसंख्या आणि आर्थिक प्राधान्यांचा विचार करता, ही भागीदारी दोन्ही देशांसाठी अत्यंत लाभदायक आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. भारतीय कर्मचारी वर्गाला रशियन भाषेचे प्रशिक्षण आणि सॉफ्ट स्किल्स देऊन, रशियासाठी तयार असलेले कार्यबल संयुक्तपणे विकसित केले जाऊ शकते, जे दोन्ही देशांच्या सामायिक समृद्धीला गती देईल, असे त्यांनी अधोरेखित केले.
दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी पर्यटन व्हिसाच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सांगितले की यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, टूर चालकांसाठी नवीन व्यवसाय संधी निर्माण होतील आणि रोजगाराचे मार्ग खुले होतील.
भारत आणि रशिया संयुक्तपणे, नवोन्मेष, उत्पादन आणि निर्मितीच्या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत हे अधोरेखित करून, मोदी यांनी यावर भर दिला की हे ध्येय द्विपक्षीय व्यापार वाढवण्यापुरते मर्यादित नाही तर जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत उपाय तयार करून मानवतेचे कल्याण सुनिश्चित करणे आहे. या प्रवासात भारत रशियासोबत खांद्याला खांदा लावून चालण्यास पूर्णपणे तयार असल्याचे सांगत पंतप्रधानांनी आवाहन केले की “चला, मेक इन इंडिया, भारतासोबत भागीदारी करा आणि एकत्र येऊन जगासाठी काहीतरी निर्माण करूया,”. तसेच त्यांनी अध्यक्ष पुतिन आणि सर्व सहभागींचे आभार मानून आपल्या भाषणाचा समारोप केला.
***
नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/ संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199761)
आगंतुक पटल : 12