युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
तंदुरुस्तीबाबत जागरुकता निर्माण केल्याबद्दल ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ उपक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ यांसारख्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लोक एकत्र येत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले
"आरोग्य आणि निरामयतेसाठी इतक्या कळकळीने आवाहन करणारे नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान पाहिले नाहीत"- कर्नल राज्यवर्धन
देशभरातील 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' या उपक्रमाच्या 51 व्या भागाचे पत्रकारांना विशेष अतिथी म्हणून घेऊन आयोजन करण्यात आले
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 2:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमात 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' या उपक्रमावर विशेष भर दिला
"अशा अनेक स्पर्धा आहेत ज्या आपल्या तरुण मित्रांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. अनेक लोक 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' सारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र येत आहेत. हे सर्व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याचे मार्ग आहेत," असे पंतप्रधान मोदी आज 'मन की बात'च्या 128 व्या भागात केलेल्या संबोधनात सांगितले.
देशव्यापी सायकलिंग चळवळीच्या 51 व्या भागाचे या रविवारी यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले, योगायोगाने ज्यात अथेन्स 2004 चे ऑलिम्पिक रौप्य पदक विजेते आणि राजस्थानचे क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी जयपूरमध्ये या कार्यक्रमाचे नेतृत्व केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तम आरोग्य आणि निरामयतेच्या संस्कृतीचा पुरस्कार करण्यासाठी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनाची देखील कर्नल राठोड यांनी प्रशंसा केली.
“जगात असे खूप कमी पंतप्रधान आहेत जे आपल्या नागरिकांचे आरोग्य आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करून इतके कळकळीचे आवाहन करत असतील. नरेंद्र मोदी जी यांनी वेळोवेळी फिट इंडियाबद्दल सांगितले आहे," असे कर्नल राठोड यांनी आज सकाळी अमर जवान ज्योती, जयपूर येथे झालेल्या 'संडेज ऑन सायकल' कार्यक्रमादरम्यान सांगितले.

"आपला तेलाचा वापर कमी करण्यापासून, भरड धान्य ( श्री अन्न) खाण्यापर्यंत आणि लठ्ठपणा कमी करण्यावर समर्पितपणे काम करण्यापर्यंत, आपल्या माननीय पंतप्रधानांनी आपल्याला नेहमीच निरोगी राहण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे, मग ते योग असो, सायकलिंग असो, धावणे असो, किंवा इतर विविध मार्ग असोत. 'संडेज ऑन सायकल'मुळे देशामध्ये निर्माण झालेली चळवळ याचे एक स्पष्ट उदाहरण आहे. आज जयपूरमध्ये, जवळजवळ 1000 मुले यात भाग घेत आहेत आणि त्यांच्यासाठी सायकली देखील उपलब्ध आहेत," असे ऑलिम्पिकमध्ये स्वातंत्र्यानंतर वैयक्तिक रौप्य पदक जिंकणारे पहिले भारतीय अशी ओळख असलेले कर्नल राठोड यांनी पुढे नमूद केले.
'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' या उपक्रमाच्या 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या भागात देशभरातील विविध राज्यांमधील पत्रकारांनी सहभाग नोंदवला.

राजस्थानमध्ये सुरु असलेल्या 'खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धां'च्या बरोबरीने जयपूर इथल्या सवाई मानसिंग स्टेडियम मध्ये एक 'फिट इंडिया विभाग' तयार केला गेला असून तिथे भेट देणाऱ्या प्रेक्षकांना त्या फिटनेस अनुभवात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होत आहे. यात एका भागात झुंबा, दोरीच्या उड्या, यांच्या छोट्या स्पर्धा , दुसऱ्या भागात सायकलिंग अनुभव, तर तिसऱ्या भागात 'अभिनव बिंद्रा टार्गेट परफॉर्मन्स' च्या सहयोगाने शारीरिक व मानसिक फिटनेस मूल्यमापनाची सुविधा दिली गेली आहे.
'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' ची सुरुवात डिसेंबर 2024 मध्ये केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.
आता हा उपक्रम दर आठवड्याला आयोजित केला जातो, व त्याद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'फिटनेस का डोस ,आधा घंटा रोज' , तसेच 'लठ्ठपणा विरोधातील लढा' यासाठीची उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' हा उपक्रम म्हणजे एक लोकचळवळ झाली असून सामान्य नागरिक यात पुढाकार घेत आहेत.
देशभरात 4000 हुन जास्त नमो फिट इंडिया सायकलिंग क्लब्ज स्थापन झाले असून त्याद्वारे लाखो नागरिक नियमितपणे सायकलिंग करून सहभागी होतात, त्यामुळे ही समुदायाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एक देशव्यापी फिटनेस क्रांती झाली आहे. यात देशभरातील नमो क्लब्ज दर आठवड्याला सायकल यात्रा आयोजित करतात.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) देशभरातील प्रशिक्षण केंद्रांवर (STCs) या सायकल ऑन संडेज उपक्रमाचे आयोजन होते. यात आसाम मधील कोकराझार, पंजाबमधील जगतपूर व बादल, मणिपूर मधील उतलोऊ, लडाख मधील कारगिल आणि इतर अनेक केंद्रांचा समावेश आहे. देशभरातील 23 SAI राष्ट्रीय गुणवत्ता केंद्रांसह (NCOEs) भद्रक , झारसुगुडा, धेंकनाल, इत्यादी अनेक खेलो इंडिया केंद्रांवर देखील दर रविवारी हा उपक्रम आयोजित केला जातो.
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2196853)
आगंतुक पटल : 5