पंतप्रधान कार्यालय
उडुपी येथील श्रीकृष्ण मठातील लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
28 NOV 2025 3:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2025
एल्लारीगू नमस्कारा !
जय श्री कृष्ण !
जय श्री कृष्ण !
जय श्री कृष्ण !
मी माझे भाषण सुरु करण्यापूर्वी — इथे काही मुलं चित्र काढून घेऊन आली आहेत. SPG चे लोक आणि स्थानिक पोलिस थोडी मदत करतील का, ती चित्रं गोळा करण्यासाठी? जर तुम्ही त्याच्या मागे तुमचा पत्ता लिहिला असेल, तर मी नक्कीच तुम्हाला आभारपत्र पाठवेन. ज्यांनी जे काही आणले असेल, ते देऊन टाका, ते गोळा करतील आणि मग तुम्ही निवांत बसू शकता. ही मुले इतकी मेहनत करतात, आणि कधी कधी, मीच त्यांच्या बाबतीत अन्याय करतो असं वाटतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.
जय श्री कृष्ण !
भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य दर्शनाने मिळालेली संतुष्टी, श्रीमद्भगवद्गीतेच्या मंत्रांची ही आध्यात्मिक अनुभूती आणि इतक्या मोठ्या संख्येने पूज्य संत, गुरुंची उपस्थिती — हे माझ्यासाठी परम सौभाग्य आहे. हे माझ्यासाठी असंख्य पुण्य प्राप्त करण्यासारखे आहे. मला दिलेल्या सन्मानासाठी, व्यक्त केलेल्या भावनांसाठी मनःपूर्वक आभार. कदाचित मला इतके आशीर्वाद मिळालेत की माझ्याबद्दल जे म्हटले जाते, त्यासाठी मी अधिकाधिक पात्र व्हावे, अधिक काम करावे आणि तुमच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण कराव्यात.
बंधु-भगिनींनो,
आत्ताच तीन दिवसांपूर्वी मी गीतेची भूमी, कुरुक्षेत्रमध्ये होतो. आणि आज, भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने आणि जगद्गुरु श्री माधवाचार्यांच्या तेजाने पावन झालेल्या या भूमीत येणे — हा माझ्यासाठी परम आनंदाचा क्षण आहे. आजच्या या कार्यक्रमात, एक लाख लोकांनी एकत्रितपणे श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण केले. यातून जगाने आज भारताच्या हजारो वर्षांच्या दिव्यतेचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे.
या कार्यक्रमात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले श्री श्री सुगुणेन्द्र तीर्थ स्वामीजी, श्री श्री सुश्रीन्द्र तीर्थ स्वामीजी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी, राज्य सरकारचे मंत्री, सांसद, आमदार, उडुपीच्या अष्टमठांचे सर्व अनुयायी, आणि उपस्थित संतगण, बंधू आणि भगिनींनो —
कर्नाटकच्या भूमीवर येणे, आणि येथील प्रेमळ जनतेच्या सान्निध्यात असणे नेहमीच एक वेगळी अनुभूती देऊन जाते. उडुपीची धरती तर नेहमीच अद्भुत अनुभव देते. माझा जन्म गुजरातमध्ये झाला, गुजरात आणि उडुपी यांच्यात एक विशेष, आत्मीय नातं राहिलं आहे. अशी मान्यता आहे की इथे प्रतिष्ठापित भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा पूर्वी द्वारकेत, माता रुक्मिणी पूजत असत. नंतर जगद्गुरु श्री माधवाचार्यांनी ही प्रतिमा इथे प्रतिष्ठापित केली. तुम्हाला माहित आहेच, गेल्या वर्षी मी समुद्राच्या खालील श्रीद्वारकाधीशांचे दर्शन घेतले — तिथूनही आशीर्वाद घेऊन आलो. त्यामुळे इथे या प्रतिमेचे दर्शन घेऊन मला काय अनुभव आला, याची कल्पना तुम्ही करू शकता. या दर्शनाने मला एक आत्मीय आध्यात्मिक आनंद मिळवून दिला आहे.
मित्रांनो,
उडुपीमध्ये येणे मला आणखी एका कारणामुळे विशेष वाटते. उडुपी हे जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या सुशासनाच्या मॉडेलची कर्मभूमी आहे. 1968 मध्ये, उडुपीच्या जनतेने जनसंघाचे नेते वी.एस. आचार्य यांना नगरपालिकेत निवडून दिले होते. याचबरोबर इथे एका नव्या प्रशासन प्रारुपाची पायाभरणी देखील झाली होती. आज आपण ज्या स्वच्छता मोहिमेचे राष्ट्रीय स्तरावरील रूप पाहत आहोत — उडुपीने ती पाच दशकांपूर्वीच स्वीकारली होती. मग ते जलपुरवठा आणि मलनिःसारण प्रणालीचे नवे प्रारुप अमलात आणणे असेल— उडुपीने याची सुरुवात 70 च्या दशकात केली होती. आज हेच अभियान देशाच्या राष्ट्रीय विकासाचा, राष्ट्रीय प्राधान्याचा भाग म्हणून आपल्याला मार्गदर्शन करत आहे.
मित्रांनो,
रामचरितमानसात लिहिले आहे —
“कलिजुग केवल हरि गुन गाहा।
गावत नर पावहिं भव थाहा॥”
अर्थात, कलियुगात केवळ भगवद् नाम आणि लीला यांचे कीर्तन हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याच्या गायन, कीर्तनामुळे भवसागरातून मुक्ती मिळते. आपल्या समाजात शतकानुशतके कीर्तन, जप, गीता पठण — यांची परंपरा आहे. पण एक लाख कंठ जेव्हा एक स्वरात हे श्लोक म्हणतात , जेव्हा इतक्या लोकांच्या मुखातून एकाच वेळी गीते सारख्या पुण्य ग्रंथाचे पठण होते , जेव्हा अशा दैवी मंत्रांचा नाद एकाच वेळी घुमतो — तेव्हा एक अदृश्य ऊर्जा निर्माण होते, जी आपल्या मनाला नवीन स्पंदन देते, बुद्धीला बळ देते. हीच उर्जा आध्यात्माची शक्ती आहे, हीच उर्जा सामाजिक एकतेची ऊर्जा आहे. आज लक्षकंठ गीता — हा कार्यक्रम एक प्रचंड ऊर्जा-पिंड अनुभवण्याची संधी ठरला आहे. तो जगाला सामूहिक चेतनेची ताकद दाखवत आहे.
मित्रांनो,
आज मी विशेषतः परमपूज्य श्री श्री सुगुणेंद्र तीर्थ स्वामीजींना प्रणाम करतो. त्यांच्यामुळे लक्षकंठ गीता ही संकल्पना एवढ्या दिव्य रूपात साकार झाली आहे. जगभरातील लोकांनी आपल्या हाताने गीता लिहिण्याचा जो विचार त्यांनी दिला. त्यांनी सुरू केलेला कोटि गीता लेखन यज्ञ — ही सनातन परंपरेची अद्वितीय जागतिक लोकचळवळ आहे. ज्याप्रमाणात आपला युवा वर्ग गीतेच्या मूल्यांशी जोडला जातो आहे — ही खूप मोठी प्रेरणा आहे. वेद, उपनिषद, शास्त्रांची परंपरा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची परंपरा भारतात हजारो वर्षांपासून सुरू आहे. हा कार्यक्रम त्या परंपरेचाच अर्थपूर्ण विस्तार आहे, ज्याद्वारे भगवद्गीतेला नव्या पिढीशी जोडण्याचा एक सार्थक प्रयत्न बनला आहे.
मित्रांनो,
इथे येण्याच्या तीन दिवस आधी मी अयोध्येत होतो. 25 नोव्हेंबरला विवाह पंचमीच्या पावन दिवशी अयोध्या रामजन्मभूमी मंदिरात धर्मध्वजाची स्थापना झाली. अयोध्येपासून उडुपीपर्यंत असंख्य रामभक्त या दिव्यतम आणि भव्यतम उत्सवाचे साक्षीदार झाले आहेत. राममंदिर आंदोलनात उडुपीची भूमिका किती महान आहे हे देशाला ठाऊक आहे. परमपूज्य स्वर्गीय विश्वेश तीर्थ स्वामीजी यांनी दशकांपूर्वी राममंदिर आंदोलनाला जी दिशा दिली — आजच्या ध्वजारोहण सोहळा त्या योगदानाच्या साक्षात सिद्धीचा समारंभ बनला आहे. उडुपीकरांसाठी राममंदिराची निर्मिती आणखी एका कारणाने विशेष आहे — नव्या मंदिरात जगद्गुरु माधवाचार्य यांच्या नावाने एक विशाल द्वार उभारण्यात आले आहे. भगवान रामांचे अनन्य भक्त असलेल्या माधवाचार्यांनी लिहिले आहे —
“रामाय शाश्वत सुविस्तृत षड्गुणाय,
सर्वेश्वराय बल-वीर्य महार्णवाय”
म्हणजेच, भगवान श्रीराम — सहा दिव्य गुणांनी विभूषित, सर्वेश्वर, आणि अपरंपार शौर्य आणि साहसाचे सागर आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने राममंदिरात एक द्वार असणे — हे उडुपी, कर्नाटक आणि संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब आहे.
मित्रांनो,
जगद्गुरु माधवाचार्य हे भारताच्या द्वैत दर्शनाचे प्रणेते आणि वेदांताचे तेजस्वी दीपस्तंभ आहेत. त्यांनी निर्माण केलेली उडुपीच्या अष्टमठांची व्यवस्था — संस्थांच्या आणि नव परंपरांच्या निर्मितीचे मूर्त उदाहरण आहे. इथे भगवान श्रीकृष्णाची भक्ति आहे, वेदांताचे ज्ञान आहे, आणि हजारो लोकांसाठी अन्नसेवेचा संकल्प आहे. एका प्रकारे हे स्थान म्हणजे ज्ञान, भक्ति आणि सेवा यांचा संगमतीर्थ आहे.
मित्रांनो,
ज्या काळात माधवाचार्यांचा जन्म झाला — त्या काळात भारत अनेक अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना सामोरे जात होता. त्या कठीण काळात त्यांनी अशी भक्तीचा असा मार्ग दाखवला की समाजातील प्रत्येक वर्ग, प्रत्येक व्यक्ती त्या मार्गाशी जोडली जाऊ शकत होती.
आणि याच मार्गदर्शनामुळे आज अनेक शतकांनंतर देखील त्यांच्याद्वारे स्थापित मठ दररोज लाखो लोकांच्या सेवेत कार्यरत आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे द्वैत परंपरेमध्ये अशा अनेक विभूती जन्मल्या आहेत, ज्यांनी नेहमी धर्म, सेवा आणि राष्ट्र उभारणीचे कार्य पुढे नेले. आणि जनसेवेची ही शाश्वत परंपराच उडुपीचा सर्वात मोठा वारसा आहे.
मित्रहो,
जगद्गुरु मध्वाचार्य यांच्या परंपरेने हरिदास परंपरेला ऊर्जा दिली. पुरंदर दास , कनक दास यांच्या सारख्या महापुरुषांनी साध्या, सुरेल आणि सुलभ कन्नड भाषेत भक्तीचा प्रसार केला.
त्यांच्या या रचना समाजातील प्रत्येकाच्या हृदयापर्यंत , अगदी सर्वात गरीब घटकांपर्यंत पोहोचल्या, त्यांना धर्म तसेच सनातन मूल्यांशी जोडले, या रचना आजच्या पिढीत देखील तशाच आहेत. आजही आपले युवक जेव्हा समाज माध्यमांवर रिल्समध्ये श्री पुरंदर दास द्वारा रचलेली चंद्रचूड शिव शंकर पार्वती ही रचना ऐकतात, तेव्हा ते एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात जातात. आजही जेव्हा उडुपीमध्ये माझ्यासारख्या एखाद्या भक्ताला जेव्हा एका लहान झरोक्यातून भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होते, तेव्हा ती त्याच्यासाठी कनक दास यांच्या भक्तीसोबत जोडले जाण्याची एक संधीच ठरते. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो , मला यापूर्वीही हे भाग्य लाभले आहे. कनक दास जी यांना वंदन करण्याचे भाग्य लाभले आहे.
मित्रहो,
भगवान श्रीकृष्णाचा उपदेश, त्यांची शिकवण , प्रत्येक युगासाठी व्यवहार्य आहे. गीतेतील शब्द केवळ व्यक्तीलाच नव्हे तर देशाच्या धोरणालाही दिशा देतात. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सर्वभूतहिते रता: असे सांगून ठेवले आहे. गीतेतही म्हटले आहे - लोक संग्रहम् एवापि, सम् पश्यन् कर्तुम् अर्हसि ! या दोन्ही श्लोकांचा अर्थ हाच आहे की आपण लोककल्याणासाठी काम करायला हवे. आपल्या संपूर्ण जीवनात जगदगुरु मध्वाचार्यजी यांनी याच भावना जपत भारताच्या एकतेला बळकटी दिली.
मित्रहो,
आज सबका साथ, सबका विकास, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय, या आपल्या धोरणांमागे देखील भगवान श्रीकृष्णाच्या याच श्लोकांची प्रेरणा आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्याला गरिबांची मदत करण्याचा मंत्र देतात आणि याच मंत्राची प्रेरणा आयुष्मान भारत आणि पीएम आवास यांसारख्या योजनांचा आधार बनते. भगवान श्रीकृष्ण आपल्याला महिलांची सुरक्षा, महिला सशक्तीकरणाची शिकवण देतात आणि त्याच ज्ञानाच्या प्रेरणेतून देश नारी शक्ती वंदन अधिनियमासारखा ऐतिहासिक निर्णय घेतो. श्रीकृष्ण आपल्याला सर्वांच्या कल्याणाची शिकवण देतात आणि हीच गोष्ट व्हॅक्सीन मैत्री, सौर आघाडी आणि वसुधैव कुटुंबकम् यांसारख्या आपल्या धोरणांचा आधार बनते.
मित्रहो,
श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश युद्धभूमीवर दिला होता. आणि भगवद्गीता आपल्याला हे शिकवते की शांतता आणि सत्य प्रस्थापित करण्यासाठी अत्याचार करणाऱ्यांचा अंत देखील आवश्यक आहे. देशाच्या सुरक्षा धोरणाची मूळ भावना देखील हीच आहे, आम्ही वसुधैव कुटुंबकम देखील म्हणतो आणि आम्ही धर्मो रक्षति रक्षित: हा मंत्र देखील पुन्हा पुन्हा उच्चारतो. आम्ही लाल किल्य्याच्या तटबंदीवरुन मिशन सुदर्शन चक्र ची घोषणा देखील करतो. मिशन सुदर्शन चक्र, म्हणजे, देशाच्या प्रमुख स्थानांचे , देशाच्या औद्योगिक आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या सुरक्षेची अभेद्य भिंत उभारणे जी शत्रू देखील भेदू शकणार नाही आणि जर शत्रूने दुःसाहस करून दाखवले, तर आपले सुदर्शन चक्र त्याला उध्वस्त करेल.
मित्रहो,
ऑपरेशन सिंदूर कारवाईत देखील देशाने आपला हा दृढ संकल्प पाहिला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात अनेक देशवासीयांना आपले प्राण गमवावे लागले. यातील बळींमध्ये कर्नाटकातील माझे बंधू-भगिनी देखील होते. मात्र पूर्वी जेव्हा असे दहशतवादी हल्ले होत असत तेव्हा सरकारे शांत बसायची. मात्र हा नवा भारत आहे, ते कोणापुढे झुकत नाही आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचे कर्तव्यही टाळत नाही. आम्हाला शांतता प्रस्थापित करणे देखील माहित आहे आणि शांततेचे रक्षण कसे करायचे हे देखील आम्हाला माहित आहे.
मित्रहो,
भगवद्गीता आपल्याला कर्तव्यांची ,आपल्या जीवन संकल्पांची जाणीव करून देते आणि याच प्रेरणेने मी आज तुम्हा सर्वांना काही संकल्प करण्याचे आवाहन करणार आहे. हा आग्रह, 9 संकल्पांप्रमाणे हे, जे आपले वर्तमान आणि भविष्यासाठी खूप आवश्यक आहे. संत समाज जेव्हा या आवाहनांना त्यांचे आशीर्वाद देतील तेव्हा ते लोकांपर्यंत पोहचण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही.
मित्रहो,
आपला पहिला संकल्प जल संवर्धन, पाण्याची बचत आणि नद्यांचे संरक्षण करण्याविषयी असला पाहिजे. आपला दुसरा संकल्प आपण झाडे लावणे हा असायला हवा, देशभरात एक पेड़ मां के नाम अभियानाला गती मिळत आहे. या अभियानाला जर सर्व मठांच्या ताकदीची जोड मिळाली तर त्याचा प्रभाव अधिक व्यापक असेल . आपला तिसरा संकल्प आपण देशातील किमान एका गरीब व्यक्तीचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, मी फार काही करायला सांगत नाही. चौथा संकल्प स्वदेशीची संकल्पना स्वीकारणे हा असायला हवा. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे. आज आपला भारत देश आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीच्या मंत्रासह आगेकूच करत आहे. आपली अर्थव्यवस्था, आपले उद्योग आणि आपले तंत्रज्ञान स्वबळावर स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत. म्हणूनच आपण सर्वांनी संपूर्ण शक्तीनिशी आवाहन करायला हवे - व्होकल फॉर लोकल, व्होकल फॉर लोकल, व्होकल फॉर लोकल.
मित्रहो,
पाचवा संकल्प म्हणून आपण नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यायला हवे. आपला सहावा संकल्प असायला हवा आपण निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करणे, भरड धान्याचा आहारात वापर करणे, आणि जेवणात तेलाचे प्रमाण कमी करणे. आपला सातवा संकल्प योगसाधनेचा अंगिकार करणे आणि त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवणे हा असायला हवा. आठवा संकल्प- मॅन्युस्क्रिप्ट, हस्तलिखितांचे जतन करण्यात सहकार्य करणे. आपल्या देशाचे बरेचसे प्राचीन ज्ञान हस्तलिखितांमध्ये दडलेले आहे. या ज्ञानाचे जतन करण्यासाठी भारत सरकार ज्ञान भारतम अभियानावर काम करत आहे. तुमचे सहकार्य हा अनमोल वारसा वाचवण्यात मदत करेल.
मित्रहो,
आपला नववा संकल्प आपल्या वारशाशी संबंधित देशातील किमान 25 ठिकाणांना भेट देण्याचा असायला हवा . मी तुम्हाला काही सुचवतो. 3-4 दिवसांपूर्वी कुरुक्षेत्रमध्ये महाभारत अनुभव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले . भगवान श्रीकृष्णांचे जीवन तत्वज्ञान पाहण्यासाठी लोकांना या केंद्राला भेट देण्याचे आवाहन मी करतो. गुजरातमध्ये दरवर्षी भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या विवाहाला समर्पित माधवपूर मेळा आयोजित केला जातो. देशभरातून, विशेषतः ईशान्य भागातून मोठ्या संख्येने लोक या मेळ्याला भेट देतात. तुम्ही देखील पुढच्या वर्षी या मेळ्याला उपस्थित राहण्याचा अवश्य प्रयत्न करा.
मित्रहो,
भगवान श्रीकृष्णांचे संपूर्ण जीवन , गीतेचा प्रत्येक अध्याय कर्म, कर्तव्य आणि कल्याणाचा संदेश देतो. भारतीयांसाठी 2047 चा काळ केवळ अमृत काळच नाही तर विकसित भारताच्या उभारणीसाठी कर्तव्यदक्ष काळ देखील आहे . प्रत्येक नागरिक, प्रत्येक भारतीयाची स्वतःची एक जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक संस्थेचे स्वतःचे एक कर्तव्य आहे . आणि ही कर्तव्ये पार पाडण्यात कर्नाटकातील मेहनती लोकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे . आपला प्रत्येक प्रयत्न राष्ट्रासाठी समर्पित असला पाहिजे . कर्तव्याच्या या भावनेचे पालन करतानाच विकसित कर्नाटक आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. उडुपीच्या भूमीतून निघणारी ऊर्जा विकसित भारताच्या संकल्पात आपले मार्गदर्शन करत राहो या इच्छेसह पुन्हा एकदा या पवित्र आयोजनात सहभागी असलेल्यांना माझ्याकडून अनेक-अनेक शुभेच्छा. आणि सर्वांना जय श्री कृष्णा ! जय श्री कृष्णा ! जय श्री कृष्णा !
* * *
सुषमा काणे/शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2196517)
आगंतुक पटल : 7