पडद्यावरची पात्रे 'बेतून शिवताना'-: इफ्फीमध्ये बोलताना एका लखानी यांनी चित्रपटांच्या वेशभूषेची किमया केली स्पष्ट
पोन्नियिन सेलवन ते ओके जानू पर्यंतचा वेशभूषा रचनेचा चित्रपटीय प्रवास
वेशभूषेच्या संदर्भातून नंदिनी, तारा आणि रॉकी उलगडताना एका यांनी प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2025
इफ्फीमध्ये "वेशभूषा आणि व्यक्तिरेखेचा पल्ला- सिनेसृष्टीतील ट्रेन्डसेटर्स" नावाच्या मुलाखत सत्राने पुढे मास्टरक्लासचे वळण घेतले आणि यावर मार्गदर्शन केले की- 'वेशभूषा पात्रांना फक्त कपडेच चढवते असे नाही तर, मूकपणे त्यांना घडवते, दिशा देते आणि कधी कधी तर त्यांच्या कथांचे चक्क पुनर्लेखनही करते.' निर्माते जयप्रद देसाई यांनी संभाषणाची सूत्रे हाती घेत ख्यातनाम वेशभूषाकार एका लखानी यांना रंगमंचावर बोलते केले, एका यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि चित्रनिर्मितीत वस्त्रांचे धागे गुंफणाऱ्या अनोख्या जगाची सफर प्रेक्षकांना करता आली.
एक सोपेसे सत्य सांगत जयप्रद यांनी विषयाला हात घातला आणि सत्राची सुरुवात केली -: "एखादे पात्र बोलायला लागण्यापूर्वीच त्याच्या वेशभूषेने खूप काही सागितलेले असते". या एका वाक्याने एका यांचा 15 वर्षांचा प्रवास उलगडू लागला - फॅशनच्या दुनियेतील उच्च संधींची स्वप्ने बघत सुरू झालेला हा प्रवास अखेर पोहोचला तो चित्रपटांच्या गजबजलेल्या, रंगीबेरंगी आणि वेड लावणाऱ्या सृजनशील जगापर्यंत!
मणीरत्नम यांची किमया

एका यांनी मणीरत्नम यांच्या 'रावण'च्या सेटवरील सुरुवातीच्या काळातील आठवणी जागवल्या. तेव्हा त्या सब्यसाची मुखर्जी यांच्याबरोबर इंटर्नशिप करत होत्या. "मला वाटायचं, फॅशनचा संबंध सुंदर सुंदर वस्त्रप्रावरणं तयार करण्याशी आहे ", त्या हसून सांगतात- "पण सौंदर्य हे भावनेबरोबर उमटलं पाहिजे, हे मला 'रावण'ने शिकवलं." सब्यसाची यांच्या हाताखाली त्यांना, 'एखाद्या चौकटीत/ फ्रेममध्ये रंग श्वास कसे घेतात, आणि वेशभूषारचना हा निव्वळ एक विभाग नसून ती एक भाषा कशी आहे' हे शिकायला मिळाले. एका लखानी यांच्या कामाने सिनेमॅटोग्राफर संतोष सीवन प्रभावित झाले आणि त्यांनी एका यांना 'उरुमी' साठी काम देऊ केले. त्यावेळी त्या अवघ्या 23 वर्षांच्या होत्या. "आणि तिथेच माझा खरा प्रवास सुरू झाला", त्या म्हणतात.
एका यांची सृजनाची प्रक्रिया दिग्दर्शकांशी प्रदीर्घ संवाद साधून सुरू होते आणि पुढे त्या कथेचा सखोल अभ्यास करतात, हे ऐकून प्रेक्षकांना नवल वाटले. मणीरत्नमसारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करताना हा सहयोग आणखी आधीच्या पायरीवर - क्वचित प्रसंगी लेखन सुरू असतानाही सुरू होतो, असे त्यांनी सांगितले. "पटकथा-संवाद लिहिले जात असतानाच मणी सर मला सहभागी करून घेतात. "एखादे पात्र कशा पद्धतीने कपडे घालते हे मला समजत जाते, नि त्याचवेळी ते पात्र कसे वागते हे त्यांना समजत जाते", असे सांगून त्यांनी 'कथनाच्या पद्धतीला वेशभूषारचनेमुळे कसा आकार मिळतो' ते अधोरेखित केले.

"सिनेमा हे एक टीमवर्क आहे - सगळ्यांनी मिळून संघभावनेने करण्याचे काम आहे" यावर त्या भर देतात. "सर्वात सुंदर नव्हे, तर सर्वात बरोबर, सर्वात योग्य पोशाख तयार करण्याचा माझा प्रयत्न असतो. पोशाख असा हवा की ज्याच्यामुळे अभिनेत्याला आपल्या व्यक्तिरेखेत सहज प्रवेश करता येईल." मग त्यासाठी त्या आपल्या पथकाबरोबर एकत्र काम करून निरनिराळे संदर्भ शोधतात, दृश्यांचा अभ्यास करतात, तपशीलवार टिपणे काढतात.
पोन्नियिन सेलवन- वस्त्रांमध्ये लिहिलेला इतिहास
पोन्नियिन सेलवन चित्रपटाच्या वेळी, एका यांनी पहिले स्केच काढण्याच्याही आधी मणीरत्नम यांनी त्यांना तंजावूरला पाठवले. त्यांच्या त्या चित्रपटाविषयीच्या विचारांना या दौऱ्याने एक कलाटणी दिली. त्या दौऱ्यात एका यांना मंदिरांच्या कांस्यमूर्तींमधून, शिल्पांमधून, आणि आकृतिबंधांतून चोल साम्राज्याची भव्यता प्रत्ययाला आली, ती त्यांनी मनोमन टिपून घेतली आणि त्यामुळेच चित्रपटाच्या दृश्यजगताला आकार आला.

पुढे बोलताना एका लखानी यांनी त्यातील व्यक्तिरेखा कशा कशा दिसतात, हे मुद्देसूद पद्धतीने मांडले आणि मुलाखतीच्या सत्राला एका छोट्याशा चित्रपटशाळेचे स्वरूप प्राप्त झाले-: यातील नंदिनी कशी आहे? तर मोहित करण्याच्या आणि सत्तेच्या भाषेतूनच ती व्यक्तिरेखा उभी राहते. स्वाभाविकच, ती आकर्षकता आणि ती सत्तेची भूक तिच्या वेशभूषेत दिसून येते. याउलट कुंदवईचा जन्मच सत्तेच्या घराण्यात झाला. त्यामुळे तो अंगभूत अधिकार तिच्यात प्रतिबिंबित झालेला दिसतो, संयत आणि शांत पद्धतीने. आदित्य करिकालन याच्या व्यक्तिरेखेच्या रंगात त्याच्या अंतरंगातील खळबळ मिसळली आहे. त्याचा राग, वेदना आणि भावनिक अस्वस्थता उमटते ती लाल आणि काळ्या रंगांच्या गडद, उदासवाण्या छटांमधून. याच्या अगदी उलट अरुलमोळी वर्मन हा शांत, लोकांचा लाडका नेता म्हणून कल्पिला गेला. त्यामुळे एका लखानी यांनी त्याची वेशभूषा प्रसन्न हस्तिदंती रंगात आणि सोनेरी छटा मिसळून तयार केली, जेणेकरून त्याच्या विचारांची स्पष्टता, करुणा आणि शांत, राजबिंडे, उमदे व्यक्तिमत्त्व प्रतीत होईल.
दोन तारा, दोन विश्वे आणि संजूचा पुनर्जन्म
'ओके कन्मणी' आणि 'ओके जानू' या दोन चित्रपटांच्या वेळी ताराच्या एकाच व्यक्तिरेखेला पूर्णपणे वेगळ्या कपडेपटाची गरज कशी भासली, याचे एका यांनी वर्णन केले. "तमिळमध्ये तारा प्रेक्षकांच्या जवळची वाटायला हवी होती, तर हिंदीत महत्त्वाकांक्षी." असे सांगून त्यांनी प्रेक्षकांच्या संवेदनांचा वेशभूषेवर कसा प्रभाव पडतो हे स्पष्ट केले. श्रद्धा कपूरच्या आता गाजलेल्या 'हम्मा हम्मा शॉर्ट्स' ची निर्मिती अगदी शेवटच्या क्षणी उशीच्या आभ्र्यांपासून कशी झाली याची मजेदार कथाही त्यांनी सांगितली.
'संजू' वर काम करताना एका यांनी अधिक संशोधन आणि विचार केला. जवळपास अचूकतेने संदर्भ जुळवले. त्या व्यक्तिरेखेचे बाह्य व्यक्तिमत्त्व उभे करण्यात रंगभूषाकार आणि केशभूषाकार, निर्मिती रचनाकार (production designer), आणि छायाचित्रण दिग्दर्शक (DoP) यांनाही एका लखानी श्रेय देतात. "DoP हे वेशभूषाकारांचे खूप चांगले मित्र असतात. एखादा रंग पडद्यावर दिसताना तुमची फसगत करेल का, हे तेच तुम्हाला सांगू शकतात", असे रहस्य त्या सांगतात.
एका लखानी यांनी मुलाखतीच्या शेवटी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चे उदाहरण दिले. यामध्ये रॉकीचा बदलत जाणारा कपडेपट, त्याच्या व्यक्तिमत्त्वात घडून येणारी उत्क्रांती दाखवतो. रॉकी कसा दिसतो हे त्यांनी त्यांच्या भाषेत उलगडून दाखवले, ही गोष्ट प्रेक्षकांना आवडली. वेशभूषेतून एखाद्या व्यक्तिरेखेची परिभाषा कशी केली जाते, ते प्रेक्षकांना समजले. सत्राच्या समाप्तीपर्यंत हे स्पष्ट झाले की, केवळ दृश्यात्मक अनुभव सुंदर करण्यापलीकडे जाऊन वेशभूषा हे पात्रांमध्ये प्राण फुंकणारे कथनात्मक साधन असते. एका लखानी यांच्या विश्वात प्रत्येक टाक्यामागे उद्देश असतो आणि प्रत्येक रंगाला अर्थ.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सोनाली काकडे/जाई वैशंपायन/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2195263
| Visitor Counter:
23