मंत्रिमंडळ
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात खराडी-खडकवासला (चौथी मार्गिका) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग (मार्गिका क्र. 4 ए )यांच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
26 NOV 2025 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या जाळे अधिक विस्तारण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र, 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र.2 ए (वनाज ते चांदणी चौक) आणि मार्गिका क्र. 2बी (रामवाडी-वाघोली-विठ्ठलवाडी) यांना मिळालेल्या मंजुरीनंतर आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत मंजूर झालेला हा दुसरा महत्त्वाचा प्रकल्प आहे.
28 उन्नत स्थानकांसह एकूण 31.636 किमी विस्तार असलेल्या या मार्गिका क्र.4 आणि 4ए पुण्याच्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भागांतील माहिती तंत्रज्ञान केंद्रे, व्यावसायिक विभाग, शैक्षणिक संस्था आणि निवासी समूह यांना परस्परांशी जोडतील. हा प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण केला जाणार असून त्यासाठी 9,857.85 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार तसेच बाह्य द्विपक्षीय/ बहुपक्षीय वित्तपुरवठा संस्था यांच्यातर्फे हा खर्च उचलला जाईल.
या मार्गिका पुण्याच्या व्यापक गतिशीलता योजनेचा महत्त्वाचा भाग असून त्या खराडी बाह्यवळण आणि नळ स्टॉप (मार्गिका क्र. 2) आणि स्वारगेट (मार्गिका क्र. 1) येथील कार्यान्वित आणि मंजुरीप्राप्त मार्गिकांशी सुलभतेने जोडण्यात येतील.मेट्रो, रेल्वे आणि बस यांच्या जाळ्यांमध्ये सुरळीत बहुपद्धतीय जोडणी व्यवस्था सुनिश्चित करत या मार्गिकांसाठी हडपसर रेल्वे स्थानकामध्ये अदलाबदलीची सुविधा देण्यात येणार असून लोणी काळभोर आणि सासवड रोड यांच्या दिशेने भविष्यात जाणाऱ्या मार्गांना जोडतील.
खराडी आयटी पार्क ते खडकवासल्याचा निसर्गरम्य पर्यटक पट्टा आणि हडपसरमधील औद्योगिक केंद्र ते वारज्यातील निवासी समूह यांना जोडणाऱ्या मार्गिका क्र. 4 आणि मार्गिका क्र.4ए पुण्यातील विविध भागांना एकत्र जोडतील. सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे मार्ग आणि मुंबई-बेंगळूरू महामार्ग या रस्त्यांवरून जाणारा हा प्रकल्प सुरक्षिततेत वाढ करत आणि हरित, शाश्वत वाहतुकीला चालना देत पुण्यातील सर्वात वर्दळीच्या मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करेल.
विद्यमान अंदाजानुसार, वर्ष 2028 मध्ये मार्गिका क्र. 4 आणि मार्गिका क्र.4ए चा दैनंदिन वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या 4.09 असेल, वर्ष 2038 मध्ये ही संख्या सुमारे 7 लाखांपर्यंत वाढेल, वर्ष 2048 मध्ये 9.63 लाख लोक या मार्गांचा वापर करतील तर 2058 मध्ये 11.7 लाखांपेक्षा अधिक प्रवासी हे मार्ग वापरतील. असा अंदाज आहे. यापैकी, 2028 खराडी-खडकवासला मार्गिकेचा वापर करणाऱ्यांची संख्या 3.23 लाख असेल ती 2058 मध्ये 9.33 लाखांपर्यंत वाढेल, याच कालावधीत तर नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग मार्गाचा वापर करणाऱ्यांची संख्या 85,555 वरुन 2.41 लाखांपर्यंत पोहोचेल. हे अंदाज येत्या दशकांमध्ये मार्गिका क्र. 4 आणि मार्गिका क्र.4ए चा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ अधोरेखित करतात.
हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळातर्फे (महा-मेट्रो) राबवण्यात येणार असून महामंडळ बांधकाम, वीज पुरवठा यांत्रिक बाबी आणि प्रणालींशी संबंधित सर्व प्रकारचे काम करून घेणार आहे. स्थलाकृतिक सर्वेक्षणे आणि तपशीलवार संरचनाविषयक सल्ला यांसारखी बांधकाम-पूर्व कार्ये याआधीच सुरू करण्यात आलेली आहेत.
सदर मंजुरीमुळे पुण्यातील मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार 100 किमीचा टप्पा पार करेल आणि ही अधिनिक, एकात्मिक तसेच शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने शहराच्या वाटचालीतील महत्त्वाचे पाऊल ठरेल.
मार्गिका क्र. 4 आणि मार्गिका क्र.4ए चे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे शहराला अधिक मेट्रो मार्ग उपलब्ध होतीलच पण त्याचसोबत या शहराला अधिक वेगवान, हरित आणि जास्त जोडणी असलेले भविष्य लाभेल. या मार्गिका प्रवासाचा वेळ बचत होईल, वाहतूक कोंडीची समस्या कमी करतील आणि नागरिकांना सुरक्षित, विश्वसनीय आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देतील. येत्या काही वर्षांत, शहरी वाहतूकीला नवा आकार देत आणि शहराची विकासगाथा नव्याने परिभाषित करत हे मार्ग पुणे शहराच्या खऱ्या जीवन वाहिन्या म्हणून उदयाला येतील.

सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2194836)
अभ्यागत कक्ष : 8