संकलन टेबलावरील एक प्रवासः श्रीकर प्रसाद यांनी उलगडले सिनेमॅटिक लयीमागील कलेचे गमक
भावना, कलात्मकता आणि कथाकथनाचे कसब सादर करतात संकलकाचा दृष्टीकोन
सादरीकरण, कथानक आणि दृश्यांना आकार देणाऱ्या कलेचा घेतला कार्यशाळेने शोध
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये, प्रख्यात संकलक श्रीकर प्रसाद यांनी "मनातून पडद्यावर: दृष्टिकोन ते अंमलबजावणी - एक संपादन कार्यशाळा" या शीर्षकाखाली एका कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेने प्रेक्षकांना चित्रपटातील सर्वात शांत, तरीही सर्वात निर्णायक ठिकाणी—म्हणजे जिथे दृश्ये संतुलन साधतात आणि कथांना अंतिम रूप मिळते त्या संकलन टेबलावर आणले. 650 कलाकृती आणि 18 भाषांच्या माध्यमातून घडलेल्या चित्रपट कारकिर्दीमुळे, त्यांच्या उपस्थितीत एक धीरगंभीर विद्वत्तेचा अनुभव येत होता ज्यांनी प्रदीर्घ काळ, संस्कृती आणि असंख्य संपादन कक्षांमध्ये कथांना आकार दिला आहे. सैकात एस. रे यांनी सूत्रसंचालन केलेल्या या सत्रात, कथेला तिच्या पहिल्या संकलनातून अंतिम कटपर्यंत घेऊन जाणाऱ्या निवडींची मूलभूत माहिती देण्यात आली.
सत्र सुरू होण्यापूर्वी, रवी कोट्टारकारा यांनी या मास्टर एडिटरचा सत्कार केला आणि त्यांच्या विशाल कार्याचे तसेच "काय करायचे नाही" हे जाणून घेण्याच्या त्यांच्या अद्वितीय क्षमतेचे कौतुक केले. हे गुण म्हणजे संकलकाच्या अंतर्ज्ञानाचे खरे सार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या चार दशकांच्या प्रवासाबद्दल बोलताना, श्रीकर प्रसाद यांनी संकलनाला केवळ एक तांत्रिक प्रक्रिया मानण्याच्या सामान्य समजुतीला आव्हान देऊन सुरुवात केली. संकलन हे भावनेमध्ये रुजलेले आहे, आणि प्रत्येक कट प्रेक्षकांना काय वाटेल, याचे मार्गदर्शन करणारा असावा, असे ते म्हणाले.
संपादकाकडून सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या प्रचंड फुटेजच्या प्रमाणावर चर्चा करताना, कथाच चित्रपटाला एकत्र ठेवत असल्याने फुटेजला अशा प्रकारे आकार द्यावा ज्यामुळे कथा उद्देशपूर्वक आणि स्पष्टतेने पुढे सरकेल, यावर त्यांनी भर दिला.

संपादकाने सुरुवात करण्यासाठी सर्वात चांगले ठिकाण म्हणजे पटकथेचा स्तर आहे, कारण या स्तरावरील सहभाग संपूर्ण चित्रपट निर्मिती प्रक्रियेला आकार देतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुरुवातीच्या काळात संकलन त्यांना यांत्रिक वाटत असले तरी, वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम केल्याने नवीन दृष्टिकोन खुले झाले. त्यांचे कोणतेही दोन दिवस सारखे नसतात, असे ते म्हणाले. आशयआणि सर्जनशीलता यामधील या सततच्या बदलामुळे, संकलक हळूहळू चित्रपट निर्मात्यामध्ये रूपांतरित होतो म्हणजे एक अशी व्यक्ती जी केव्हा माहिती दडवून ठेवायची, केव्हा ती उघड करायची आणि कथानकातील तणाव कसा राखायचा हे जाणून असते.
प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या एका भागात त्यांनी चित्रपट "संकलन टेबलावर बनवला जातो" या व्यापक समजुतीबद्दल विवेचन केले. त्यांनी चित्रपट तयार करण्याच्या टप्प्यांचे वर्णन केले, म्हणजे वैयक्तिक दृश्ये तयार करण्यापासून ते संक्रमणांमधून मार्गक्रमण करणे आणि शेवटी पूर्ण लांबीच्या कथेला आकार देणे. 1998 च्या 'द टेररिस्ट' चित्रपटातील दृश्यांद्वारे त्यांनी दाखवून दिले की मौन हे स्वतःच कथाकथनाचे एक साधन कसे बनले, या शोधाने नंतर 'वानप्रस्थम' सारख्या चित्रपटांना आकार दिला. त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक दृश्य इतके अखंडपणे प्रवाहित असले पाहिजे की प्रेक्षकांना कोणतीही काटछाट लक्षात येऊ नये.

समांतर कथा आणि बहु-पात्रांसंदर्भात बोलताना त्यांनी भावनिक संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले, प्रेक्षकांचे कधीही मुख्य कथेकडे दुर्लक्ष होता कामा नये याची आठवण करून दिली. त्यांनी स्पष्ट केले की संकलकाला नेहमीच कामगिरीचे संरक्षण करावे लागते, मात्र ती दाखवून नव्हे तर कधीकधी वाईट कामगिरी काळजीपूर्वक झाकून टाकून तिचे संरक्षण करण्याची वेळ येते. जेव्हा एखादे पात्र सत्य वर्तनापासून दूर जाते किंवा तारांकित कामगिरी करते, तेव्हा संकलकाने ते हळुवारपणे दुरुस्त केले पाहिजे, दृश्याला अशा प्रकारे आकार दिला पाहिजे की पात्राची अखंडता अबाधित राहील.
विकसित होत जाणाऱ्या साधनांबद्दल बोलताना मध्यस्थ सैकत यांनी एआयकडे संभाषण वळवले आणि हलकेच टिप्पणी केली की अशी प्रणाली कदाचित सर्वात आधी श्रीकर प्रसाद यांच्या "शैलीची" नक्कल करण्याचा प्रयत्न करेल. खोलीत हास्य पसरले आणि हा क्षण विरण्यापूर्वीच श्रीकर यांनी हलक्या स्मितहास्याने उत्तर दिले. ते म्हणाले की, एआय नक्कीच कामाच्या यांत्रिक भागाची जागा घेऊ शकते, परंतु ते भावना जाणू शकत नाही, ठोका जाणवू शकत नाही किंवा अंतःप्रेरणेतून कापाकापीची जागा ठरवू शकत नाही. त्यांच्यासाठी संकलन ही अंतर्ज्ञानाने आकारलेली एक कला आहे, जे कोणतेही यंत्र बदलू शकत नाही.
संयम, आणि दृश्याचा शेवट आकारण्याची जबाबदारी यावर चिंतन करून सत्राचा समारोप करताना श्रीकर प्रसाद यांनी सिनेमाचे वर्णन एक सामाजिक टिप्पणी, एक अभिव्यक्ती, मागे सोडलेली एक पाऊलखूण असे केले. त्यांच्यासाठी कथाकथन ही केवळ निर्मिती नाही, तर ते एक योगदान आहे.
शेवटी कार्यशाळेने दाखवून दिले की संकलन म्हणजे चित्रपटाचे सत्य शोधणे - मात्र जे जोडले जाते त्यावरून नव्हे, तर जे निवडले जाते, परिष्कृत केले जाते आणि शांतपणे सोडून दिले जाते त्यावरून हे सत्य आकार घेते.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | निलिमा चितळे/शैलेश पाटील/ नंदिनी मथुरे/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2193871
| Visitor Counter:
4