इफ्फीमध्ये उलगडले 'निलगिरीज', 'मु. पो. बॉम्बिलवाडी' आणि 'शिकार' या तीन चित्रपटांचे सिने विश्व
'शिकार'चे कलाकार आणि चमूने जुबीन गर्ग यांचा केला गौरव, विविध देशांमध्ये केलेल्या प्रवासाची दिली माहिती
'निलगिरीज' चित्रपट निर्मात्यांनी सांगितल्या संयमाच्या कथा; सह अस्तित्वाचे केले आवाहन
'बोंबीलवाडी'च्या दिग्दर्शकांनी युद्धकालीन उपहासामागची जादू केली उघड
#IFFIWood, 23 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ( इफ्फी)आज एक आंतरसांस्कृतिक, आंतर श्रेणी संवाद रंगला. निलगिरीज: अ शेअर्ड वाईल्डरनेस', 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' आणि 'शिकार' या तीन प्रभावशाली चित्रपटांचे कलाकार आणि चमूंने एकत्रितपणे पत्रकार परिषदेत संवाद साधला. आपल्या चित्रपटातील समृद्ध आणि वैविधतेने गुंफलेल्या कथानकातील भावना, अंतर्दृष्टी, आणि मार्मिकता त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.

'शिकार': एक आदरांजली, एक प्रवास आणि आसामचा सिने अनुभव
एका भावनिक वातावरणात या संवाद सत्राचा प्रारंभ झाला. सत्राच्या प्रारंभी 'शिकार' चित्रपटाचे दिग्दर्शक देबांगकर बोरगोहेन यांनी, अलिकडेच पावलेले चित्रपटाचे मुख्य अभिनेते आणि संगीतकार जुबीन गर्ग यांचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. आपण दोखांनी जवळजवळ दोन दशके एकत्र काम केल्याचे त्यांनी सांगितले. आपण सुरुवातीला जुबीन यांना केवळ संगीतासाठी संपर्क साधला होता. त्यांनी कथा ऐकली आणि चित्रपटात आपल्याला अभिनय करायची इच्छा व्यक्त केल्याची आठवण त्यांनी सांगितली. ते आपल्यात असताना प्रदर्शित झालेला हा त्यांचा अखेरचा चित्रपट आहे, त्यांना जाऊन 64 दिवस झाले आहेत. आज ते येथे उपस्थित असते तर त्यांना आनंद झाला असता अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

देबांग यांनी 'शिकार' च्या रंजक निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगितले. हा मोठ्या प्रमाणावर परदेशात चित्रित झालेला पहिला आसामी चित्रपट असून, जवळजवळ 70 टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झाले असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या चमूमधील बहुतेक जण प्रवास करू शकले नसल्याने, दिग्दर्शकांनी गुवाहाटीतून दूरस्थपणे काम केले, अनेकदा शूटिंगसाठी लाइव्हस्ट्रीमिंगद्वारे मार्गदर्शन करताना ते मच्छरदाणीत असत, असे त्यांनी सांगितले. त्यावर सभागृहात हास्यकल्लोळ उमटला.
या चित्रपटाला इफ्फीत मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाचा उल्लेखही त्यांनी केला. शो हाऊसफुल असल्याचे, आणि देशाच्या विविध भागांतील लोक त्याचे कौतुक करत असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाल्याचे ते म्हणाले. आसामचे सामर्थ्य आणि प्रतिष्ठा दिसून येईल असे, आसामचे खरे चित्रण आपल्याला मांडायचे असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
ओटीटी व्यासपीठांवर प्रादेशिक चित्रपटांच्या दृश्यामानतेच्या समस्यांबद्दलही त्यांनी आपली मते मांडली. या व्यासपीठांममुळे चित्रपट जगभर पोहोचले असले, तरी ते अनेकदा प्रादेशिक चित्रपटांना फारसे महत्व देत नाहीत अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
'निलगिरीस: अ शेअर्ड वाईल्डरनेस' मध्ये जिवंत, दैवविविधतेचे चित्रण
या संवाद सत्रात शिकार सिनेमाच्या चमूने उपस्थितांना भावनिक केले, तर 'निलगिरीस – अ शेअर्ड वाईल्डरनेस' च्या चमूने उपस्थितांना विस्मयचकीत व्हायला लावले. चित्रपटाचे सहाय्यक निर्माते आदर्श एन सी यांनी अनेक अब्ज वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या दुर्मीळ प्रजातींचे 8K आणि 12K गुणवत्तेत छायाचित्रीकरण करण्यासाठी दाखवलेल्या संयमाबद्दल उपस्थितांना सांगितले. वन्यजीव हेच या चित्रपटाचे खरे नायक आहेत, ते वेळेवर येत नाहीत, रिटेक नसतात, अशी गमतीशीर बाब त्यांनी नमूद केली. कधीकधी एकाच दृश्यासाठी तीनेक महिने लागू शकतात या वास्तवाची जाणिवही त्यांनी उपस्थितांना करून दिली.

त्यांनी पुढे सांगितले की, हा माहितीपट सहअस्तित्वाच्या संकल्पनेचाही शोध घेतो. आपल्या घरांच्या अंगणात असलेल्या वन्यजीवांशी आपण कसे जगतो, याची ही गोष्ट आहे. विविध प्रजाती अगदी शेजारी राहतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही लोकांच्या घरांपर्यंत पोहोचलो, असे ते म्हणाले.
पथकातील सदस्य हर्ष यांनी अशा प्रकारच्या चित्रपट निर्मितीच्या अनिश्चिततेचे वर्णन करताना सांगितले की, आमच्या समोर काय चित्रित होणार आहे, याची आम्हाला पूर्वकल्पना नव्हती. प्राणी नेमके कुठे आहेत, हेही माहीत नव्हते. कॅमेऱ्यामागे वन्यजीवांच्या हालचालींबाबत सातत्याने माहिती देणारी मोठी संशोधन टीम आमच्यासोबत होती. हळूहळू आम्ही तयार करत असलेल्या कथानकाची दिशा स्पष्ट होत गेली.
जागतिक माहितीपट क्षेत्रातील मोठ्या संस्थांचा या चित्रपटावर काही प्रभाव पडला का? असा प्रश्न विचारल्यावर स्पष्ट केले की, ‘नीलगिरीज’ हा मेक-इन-इंडिया चित्रपट आहे. त्यात काम करणारा प्रत्येक जण भारतीय आहे. दरम्यान, हर्षा यांनीही त्यात भर घालत म्हणाले की, आम्ही जागतिक तंत्रज्ञान आणि कौशल्य यापासून शिकतो आणि ते भारतीय पद्धतीत आणतो. एक दिवस आपणच जागतिक उद्योगासाठी आदर्श ठरू, अशी आमची आशा आहे.
आदर्श यांनी पुढे सांगितले की OTT प्लॅटफॉर्मकडून चौकशी मोठ्या प्रमाणावर येत असली तरी ‘नीलगिरिज’ मोठ्या पडद्यावरच अनुभवावा, अशी पथकाची इच्छा आहे. “अनेक माहितीपट थिएटरपर्यंत पोहोचत नाहीत, पण ‘नीलगिरिज’ला चांगला प्रतिसाद मिळाला. OTT महत्त्वाचे आहे, पण नंतर,” असे त्यांनी नमूद केले.
आदर्श यांनी सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून चौकशी मोठ्या प्रमाणात होत असली तरी ‘नीलगिरीज’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांनी अनुभवावा, अशी टीमची इच्छा आहे. ते म्हणाले, अनेक माहितीपटांना थिएटरपर्यंत पोहोचता येत नाही, परंतु ‘नीलगिरीज’ला मिळणार उत्तम प्रतिसाद पाहता, ओटीटी महत्त्वाचे आहेच, पण त्याची सध्या तरी वेळ नाही, असे त्यांनी सांगितले.
‘मुक्काम पोस्ट बॉम्बीलवाडी’ : विनोद आणि वसाहतीकालीन गोंधळ यांचा संगम
प्रसंगाला नवी उर्जा देत, ‘मुक्काम पोस्ट बॉम्बिलवाडी’च्या टीमने विनोद आणि इतिहासाचे अप्रतिम मिश्रण सादर करून संपूर्ण सभागृह आनंदाने भरून टाकले. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माते भारत शितोळे यांनी आपल्या मूळ नाटकाला 1942च्या पार्श्वभूमीवरील चित्रपटात रूपांतरित करताना भेडसावलेल्या आव्हानांचे आणि मिळालेल्या आनंदाचे वर्णन केले की, महाराष्ट्रातील एक शांत खेडेगाव स्वातंत्र्यलढ्याच्या उंबरठ्यावर आणि दुसऱ्या महायुद्धाच्या गोंधळात अडकते.

गंभीर विषयांमध्ये विनोद साधण्याविषयी बोलताना परेश यांनी नमूद केले, गरिबी सारख्या विषयांवर आधारित अनेक उत्तम विनोदी कलाकृती निर्माण झाल्या आहेत. विनोद सत्याला कधीच लपवून ठेवू शकत नाही, अनेकदा तोच सत्य अधिक प्रभावीपणे प्रकट करतो, असे त्यांनी सांगितले. ओटीटी प्रादेशिक चित्रपटांना कसे बदलत आहे, यावर बोलताना परेश म्हणाले की, प्रवास घरापासूनच सुरू होतो. प्रादेशिक सिनेमाने जागतिक स्तर गाठावा असे वाटत असेल तर स्थानिक प्रेक्षकांकडूनच त्याला आधी पाठिंबा मिळायला हवा. निर्माते भरत शितोळे यांनीही सहमती दर्शवत सांगितले की, ओटीटी मुळे संधी वाढल्या आहेत, परंतु प्रादेशिक चित्रपटांना या माध्यमांवर अजूनही पाहिजे तितके दाखवले जात नाही.
या पत्रकार परिषदेत भारताच्या चित्रपटसृष्टीचे बहुविध पैलू प्रभावीपणे उलगडले. नीलगिरींच्या स्वच्छ, निसर्गसमृद्धतेपर्यंत, बॉम्बीलवाडीची उत्साही विनोद-नाट्यमय शैली; आणि जगभर पसरलेली आसामी जीवनातील भावस्पर्शी कथनशैली. प्रत्येक पथकाने प्रामाणिकपणा, आत्मीयता आणि सर्जनशील स्पष्टतेने संवाद साधत, ईफ्फीत साजऱ्या होत असलेल्या मूल्यांचा सन्मान होत असल्याचे पुन्हा प्रकर्षाने सिध्द केले. येथे प्रत्येक कथा महत्त्वाची, प्रत्येक प्रदेशाची ओळख जपली जाते आणि प्रत्येक दिग्दर्शक आपले वेगळे जग घेऊन येतो.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/तुषार पवार/राज दळेकर/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2193275
| Visitor Counter:
8