56 व्या इफ्फीसाठी इंडियन पॅनोरमा नॉन-फीचर विभागातील स्पर्धेसाठी आलेल्या 500 प्रवेशिकांमधून 20 चित्रपटांची निवड करणे परीक्षकांसाठी एक कठीण, परंतु आनंददायी अनुभव ठरला
"सर्वात महत्व आशयाला, याचा विचार करून आम्ही आशयावर लक्ष केले केंद्रित"- इंडियन पॅनोरमा नॉन-फीचरचे ज्युरी अध्यक्ष धरम गुलाटी
"आम्ही भारताची निवड केली" - प्रदर्शनासाठी चित्रपटांची निवड करण्याच्या प्रक्रियेबाबत आयपी नॉन-फीचर ज्युरी सदस्य अशोक कश्यप यांचे मत
56 व्या इफ्फी नॉन-फीचर ज्युरीने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची विविधता केली अधोरेखित
#IFFIWood, 21 नोव्हेंबर 2025
"500 प्रवेशिकांमधून 20 चित्रपट निवडणे खरोखरच कठीण काम होते!" असे 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा नॉन-फीचर ज्युरीचे अध्यक्ष धरम गुलाटी यांनी सांगितले. सर्व परीक्षक सदस्यांनीही त्याला दुजोरा दिला . अध्यक्ष धरम गुलाटी यांच्यासह सहकारी परीक्षक सदस्य अंजली पंजाबी, अशोक कश्यप, बॉबी शर्मा बरुआ, रेखा गुप्ता, ए. कार्तिक राजा आणि ज्योत्स्ना गर्ग यांनी आज गोव्यात पत्रकार परिषदेत संबोधित केले. हे सर्व चित्रपट पाहताना आनंद मिळाला, अशी भावना त्यांनी एकमताने व्यक्त केली.
नॉन-फीचर्स ज्युरीच्या अध्यक्षांनी नमूद केले की सर्व ज्युरी-सदस्यांचे "आम्ही निवडलेल्या कोणत्याही चित्रपटांसाठी एकमत होते". "मुळात, आम्ही आशय पाहत होतो, जो इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे", असे ते म्हणाले. ज्या निर्मात्यांचे चित्रपट आयपी नॉन-फीचर्ससाठी निवडले गेले नाहीत अशा चित्रपट निर्मात्यांना त्यांनी त्यांचे चित्रपट मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ ) आणि इतर महोत्सवांमध्ये पाठवण्याचे आवाहन केले.
चित्रपट निवडताना, ज्युरींना देखील वाटत होते की, त्यांनी वेगवेगळ्या प्रदेशातील आणि वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपट निवडावेत, असे ते म्हणाले.

इतर ज्युरी सदस्यांनी देखील आयपीच्या नॉन-फीचर्स श्रेणीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या 20 चित्रपटांच्या निवडीमागील अनुभवाबद्दल आणि त्यांना सर्वात जास्त आवडलेल्या प्रकल्पांबद्दल आपली मते मांडली.
धर्म गुलाटी यांनी 'बॅटलफिल्ड' या माहितीपटाचा उल्लेख केला. हा माहितीपट मणिपूरमध्ये चित्रित करण्यात आला आहे आणि तो दुसऱ्या महायुद्धातील इम्फाळच्या लढाईवर आधारित आहे. ही लढाई 1944 मध्ये झाली होती आणि, दुसऱ्या महायुद्धातील सर्वात रक्तरंजित लढायांपैकी एक होती. या लढाईमुळे मणिपूरला उद्ध्वस्त झाले होते, आणि लढाईने तिथल्या जनतेच्या मनावर खूप मोठा घाव घातला होता.
परीक्षक मंडळाच्या सदस्य अंजली पंजाबी यांनीही मनोगत मांडले. इंडियन पॅनोरमाअंतर्गतचा कथाबाह्य चित्रपटांचा विभाग हा लघुपटांचा एक अद्भुत खजिनाच असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी आलेल्या चित्रपटांमध्ये एक विलक्षण विविधता पाहायला मिळाली, आणि हे आपण भाग्यच मानत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लघुपटांमुळे पूर्ण लांबीच्या चित्रपटांच्या मांडणीची चौकट आणि विशेषतः निधीच्या बंधनापासून मुक्तीचीसंधी मिळते ही बाब त्यांनी अधोरेखित केली. यंदा आलेल्या चित्रपटांमध्ये अनुभवी चित्रपटकारांचे तसेच नवोदित विद्यार्थी चित्रपटकारांचेही चित्रपट आहेत. त्यांनी या महोत्सवातील कथात्मक मांडणीच्या समृद्ध खजिन्यात मोलाची भर टाकली असल्याचे त्यांनी नमूद केले. 'काकोरी' (Kakori) या उद्घाटनीय कथाबाह्य चित्रपटात कथाबाह्य सिनेमा आणि मुख्य धारेतल्या सिनेमाचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाल्याचेही अंजली पंजाबी यांनी अधोरेखीत केले.
बॉबी सरमा बरुआ यांनी या महोत्सवातील ईशान्य भारताच्या प्रतिनिधीत्वाविषयी माहिती दिली. त्यांनी 'शांग्रीला' (Shangrila) या सिक्कीमी तसेच, 'पत्रलेखा' (Patralekha) या आसामी चित्रपटातील सर्जनशिलता आणि सांस्कृतिक गहिरेपणाची प्रशंसा त्यांनी केली.
रेखा गुप्ता यांनी 'काकोरी' (Kakori) या चित्रपटाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले. काकोरीच्या घटनेचे शताब्दी वर्ष सुरू असतानाच आलेल्या 505 प्रवेशिकांपैकी 'काकोरी' या एकमेव चित्रपट असा होता, ज्यात भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आपल्या अज्ञात, अनाम नायकांचा इतिहास अधोरेखित केलेला आहे, अशी माहिती रेखा गुप्ता यांनी दिली. 'आदि कैलास' या चित्रपटाचाही त्यांनी उल्लेख केला. हा चित्रपट भारतातून मानसरोवर आणि आदि कैलास पर्यंत जाणाऱ्या मार्गावर आधारित आहे, आणि आदि कैलास हे मानसरोवरच्या मार्गावर येते अशी माहितीही त्यांनी दिली.
ज्योत्स्ना गर्ग यांनी सर्वांना 'पिप्लंत्री' (Piplantri) हा चित्रपट आवर्जून पाहण्याची शिफारस केली. हा चित्रपटात राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील एका द्रष्ट्या सरपंचाची कथा मांडली आहे. त्यांनी स्त्री भ्रूणहत्या, पाण्याची घटती पातळी आणि जंगलतोड यांसारख्या सामाजिक समस्यांवर अनोख्या पद्धतीने उपाययोजना राबवत मार्ग काढल्याचे या चित्रपटात दाखवले आहे. 'नीलगिरी' या चित्रपटाच्या उत्कृष्ट छायाचित्रणाचीही त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
परीक्षक मंडळासमोर आलेल्या असंख्य प्रवेशिकांमधून परिक्षकांनी 20 उत्तम चित्रपट निवडले असल्याचे ए. कार्तिक राजा यांनी आत्मविश्वासाने नमूद केले.
अशोक कश्यप यांनी परीक्षक मंडळाने पार पाडलेल्या जबाबदारीचे सार सर्वांसमोर मांडले. परीक्षक मंडळाला आशय, निर्मितीमूल्ये, सादरीकरण आणि भाषेचा विचार करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. निर्णय घेणे कठीण होते. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभाग म्हणजे भारताच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व आहे, आणि आम्ही भारताची निवड केली आहे! अशा शब्दांत त्यांनी चित्रपटांच्या निवडीमागची भावना व्यक्त केली.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2192748
| Visitor Counter:
7