56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पणजी इथे कार्निव्हल स्वरुप ऐतिहासिक भव्य पथसंचलन अर्थात ग्रँड परेडने उद्घाटन
#IFFIWood, 20 नोव्हेंबर 2025
56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI 2025) गोव्यात पणजी इथे काल दि. 20 नोव्हेंबर रोजी एका ग्रँड परेड अर्थात भव्य पथसंचलनाने उद्घाटन झाले. या महोत्सवाचा अशा प्रकारचा हा पहिलाच ऐतिहासिक उद्घाटन सोहळा ठरला आहे. या पथसंचलनामुळे पणजीमधील डीबी मार्गाला एका चैतन्यमयी सांस्कृतिक हमरस्त्याचे रुप आले होते. या संचलनात सहभागी झालेल्या चित्रपट निर्मिती संस्था, विविध राज्ये आणि सांस्कृतिक पथकांच्या चित्ररथांनी जुने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीपासून कला अकादमीच्या दिशेने मार्गक्रमण केले. या पथसंचलनात सहभागी झालेल्या जवळपास 24 पेक्षा जास्त चित्ररथांमध्ये गोवा राज्य सरकारचे 12 चित्ररथ सहभागी झाले होते. या चित्ररथांच्या माध्यमातून प्रेक्षकांना भारताचा चित्रपट वारसा, ऍनिमेशन आणि स्थानिक वैशिष्ट्यांची ओळख करून दिली. प्रसारण आणि दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय संचार ब्युरोची निर्मिती असलेले भारत एक सूर या भव्य लोकनृत्याचे सादरीकरण या पथसंचलनाचे मोठे आकर्षण ठरले. या लोकनृत्यात 100 पेक्षा जास्त कलाकारांनी पारंपरिक नृत्ये सादर केली, तसेच छोटा भीम, मोटू पतलू आणि बिट्टू बहानेबाज यांसारखी लोकप्रिय ऍनिमेटेड पात्रांचाही यात समावेश होता. या पात्रांनाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
या पथसंचलनामुळे संपूर्ण पणजीभर जणू कार्निव्हलसारखे वातावरण निर्माण झाले होते, आणि यामुळेच या महोत्सवाचे उद्घाटन एका बंदिस्त सोहळ्यात न होता, एका समावेशक सार्वजनिक सोहळ्याचे स्वरुप या उद्घाटन कार्यक्रमाला लाभले. हे पथसंचलन पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक, पर्यटक आणि महोत्सवाचे अभ्यागत रस्त्याच्या दुतर्फा जमले होते. या सगळ्यांनी पथसंचलनातील चित्ररथ, सांस्कृतिक सादरीकरणे आणि संगीत सादरणीकरणाचा आनंद लुटला. या चैतन्यमयी सोहळ्यामुळे, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा हा आजवरचा सर्वात संस्मरणीय उद्घाटन सोहळा ठरला. या सोहळ्यातून गोव्यातील कार्निव्हलचा उत्साह आणि या महोत्सवाची चित्रपटविषयक भव्यता यांचा अनोखा मिलाफ साधला गेला, आणि यातून यापुढच्या नऊ दिवसीय सोहळ्यासाठी उत्साही वातावरणाचा पाया रचला गेला.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, गोव्याचे राज्याचे राज्यपाल पुष्पक अशोक गजपती राजू यांच्यासह पणजी इथे एका चैत्यमयी भव्य पथसंचलनाचा (ग्रँड परेड) आरंभ करून IFFI 2025 चे उद्घाटन केले

अनुपम खेर, शेखर कपूर आणि नंदमुरी बालकृष्णन पणजी मधील IFFI 2025 च्या भव्य पथसंचलनासाठी उपस्थित होते

IFFI 2025 च्या भव्य पथसंचलनात सहभागी झालेल्या छोटा भीम आणि चुटकी या लोकप्रिय ऍनिमेटेड पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले

हरियाणाच्या कलाकारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक सादरीकरणाने हरयाणाच्या समृद्ध लोकपरंपरांचे दर्शन घडवले

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने एका सर्जनशील संकल्पनेवर साकारलेल्या चित्ररथाद्वारे आपला सहभाग नोंदवला

श्री शांतादुर्गा बाबरेश्वर युवक संघानेही सांस्कृतिक सादरीकरणातून पथसंचलनात सहभाग नोंदवला

काश्मीरमधील कलाकारांनी IFFI 2025 च्या पथसंचलनातील बहारदार सादरीकरणाने मोहिनी घातली

वेव्ह्ज ओटीटी ने देखील या उद्घाटनीय पथसंचलनात आपला सहभाग नोंदवला

या संपूर्ण पथसंचलनातून संस्कृती आणि चित्रपटसृष्टीच्या संगम झळाळत होता

उत्तराखंडमधील कलाकारांनी IFFI 2025 च्या उद्घाटनीय पथसंचलनात रंगत आणली
* * *
PIB IFFI CAST AND CREW | शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2192427
| Visitor Counter:
8